महाराष्ट्रासह कर्नाटकमधून मोठय़ा प्रमाणात आवक होऊ लागल्यामुळे फळांचा राजा आंबा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. एपीएमसीत रोज सरासरी ६0 हजार पेट्यांची आवक होऊ लागली आहे. मार्चमध्ये ८00 ते १000 रुपये डझन दराने विकला जाणारा आंबा आज १५0 ते ६00 रुपये दराने विकला जात आहे.
मुंबई मार्केटमध्ये फेब्रुवारीच्या अखेरपासून आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे. परंतु खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने आवक कमी होत होती. याचा परिणाम बाजारभावावर होऊन फळांचा राजा सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फक्त १७ हजार पेट्यांची आवक झाली
होती.