तारापूर किल्ला
तारापूर किल्ल्याच्या तटबंदीला वर्तुळाकार बुरुज होते व किल्ल्यामध्ये डॉमिनिकन प्रार्थनामंदिर, मठ, रुग्णालय व मिझरिकोर्दिया (दु:खितांचे आश्रयस्थान) इत्यादी वास्तू होत्या. एक कप्तान, एक नाईक, दहा शिपाई, एक बरकंदाज, एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याची चार प्यादी, दुभाष्या, लेखनिक, मशालजी आणि एक छत्र धारण करणारा अशी किल्ल्याची शिबंदी होती. या शिबंदीव्यतिरिक्त किल्ल्यामध्ये पॅरिशवरील धर्मोपदेशक, पन्नास पोर्तुगीज, 200 स्थानिक ख्रिश्चन आणि शंभर गुलाम होते. हे सर्व गुलाम उत्तम लढवय्ये असून त्यांच्याकडे तलवारी, बंदुका व भाले अशी शस्त्रे होती. इ.स. 1670 सालच्या ओजिबे याच्या नोंदीनुसार तारापूर हे समुद्रकिनाऱ्यावरील नगर होते. तर 1695 सालच्या करेरीच्या नोंदीनुसार या नगरामध्ये डॉमिनिकन आणि फ्रान्सिसकन पंथीयांचे मठ व शाळा होत्या.
तारापूर शहराचा सुरत व दीवशी मोठा व्यापरउदीम होता. तारापूर ही एका पोर्तुगी प्रांताची राजधानी असून दमण इलाख्यातील ते सर्वात श्रीमंत नगर मानले जात होते. पोर्तुगीज अंमलातील तारापूरच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे या प्रांतावर छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली स्वारी, छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर जेव्हा मोगलांचे आक्रमण स्वराज्यावर येऊ घातले तेव्हा पोर्तुगीजांनी मोगलांचा पक्ष घेऊन मोगलांना सर्वतोपरी मदत केली म्हणून संभाजी राजांनी इ.स. 1683 ते इ.स. 1687 या काळात फिरंगाणावर आक्रमण करुन फिरंगाणातील निरनिराळ्या ठिकाणी युद्धे केली. दातोर लुईस गोंसाल्व्हिस कोत याने इ.स. 1684 च्या सुरवातीस गोव्याच्या विजरईस पाठवलेल्या पत्रानुसार त्यासुमारास संभाजीचे लष्कर तारापूर किल्ला जिंकण्यासाठी लढत होते. तथापि त्याला तारापूरचा किल्ला जिंकता आला नाही असे दिसते.
सद्यस्थितीत तारापूर किल्ल्याची आता फक्त तटबंदी उरली असून त्यावर झाडी मातली आहे. तारापूरचा किल्ला वसईइतका विशाल नसला तरी आकारमानाच्या बाबतीत त्याची तुलना वेसावा व शिरगाव येथील किल्ल्यांशी होऊ शकेल. या किल्ल्यात एक चर्च, मिझरीकोर्दिया, व इतर निवासी इमारती होत्या असे मानन्यास वाव आहे. तथापि, आज आतील इमारतींपैकी काही शिल्लक नाही.भारतातील पहिल्या अणुशक्ती वीजकेंद्राचे ठिकाण. लोकवस्ती ५,४५० (१०७१). हे ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेस २५ किमी. व पश्चिम रेल्वेच्या बोयसर स्थानकाच्या पश्चिमेस ६ किमी. आहे. येथील अणुशक्ती वीजकेंद्र १ एप्रिल १९६९ रोजी सुरू करण्यात आले. त्याची १९७६ मध्ये क्षमता ४·२ लक्ष किवॉ. होती. अणुवीज केंद्रातील त्याज्य पदार्थ जमिनीखालील खोल नळांतून दूर समुद्रात नेऊन सोडले असल्यामुळे प्रदुषणाचा धोका अद्याप संभवलेला नाही. येथील वीज ५०% महाराष्ट्राला व ५०% गुजरातला पुरविली जाते. अन्यथा हे गाव कोकणातील भातशेती व मासेमारी करणारे खाडीच्या मुखावरचे शांत खेडे आहे.
हे चिंचणी–तारापूर खाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले छोटेसे बंदर असून येथून मासे, लाकूड इ. पदार्थ निर्यात होतात व मीठ, साखर, घासलेट आणि लोहधातू इ. पदार्थ आयात होतात. खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या चिंचणीमुळे हे ठिकाण तारापूर–चिंचणी या संयुक्त नावानेही ओळखले जाते. येथील वस्ती मुख्यतः पारशी लोकांची असून प्रसिद्ध पारशी कंत्राटदार विकाजी मेहरजी याने सु. १८२० मध्ये पारशांचे मंदिर बांधले. येथील किल्ला फार जुना असून पेशव्यांना तो अतिशय महत्त्वाचा वाटे. ‘तारापूर हे निम्मी वसई आहे’ असे पेशवे समजत. चिमाजी आप्पाने हा किल्ला १७३९ साली सर करून समुद्राकडील बाजूचा चांगला बंदोबस्त केला. येथे दवाखाने, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, डाक व तार यांच्या सोयी आहेत.