सुवर्णदुर्ग किल्ला
इतिहास
शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला, १६व्या शतकात आदिलशहाकडे होता. १६६० च्या सुमारास शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याची फेरउभारणी करुन बळकट केला. किल्ल्याचे लपवलेले प्रवेशद्वार ह्याची साक्ष देत उभे आहे. राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी सूवर्णदूर्गच्या किल्लेदाराची फितूरी मोडून काढली. पेशवे व तुळाजी आंग्रे ह्यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इ.स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने सुवर्णदुर्गावर हल्ला केला व सूवर्णदूर्ग जिंकून घेतला.१८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने सैरावैरा पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सूवर्णदूर्गाच्या सुरक्षित आश्रयाला राहिला, नंतर स्वत:चा कुटुंबकबिला तिथेच सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला.
हर्णे हे प्राचीनकाळी बंदर म्हणून प्रसिध्द होत. ह्या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत येथे दुर्ग चौकडी बांधण्यात आली. त्यापैकी समुद्रातील बेटावर बांधण्यात आलेला सूवर्णदूर्ग मुख्य किल्ला व त्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले उपकिल्ले कनकदूर्ग, गोवाकिल्ला व फत्तेगड हे होत. १६८८ मध्ये मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला. ही गोष्ट कान्होजी आंग्रे ह्या २० वर्षाच्या तरूणाला कळल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकार्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. पण हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्याचे सहकारी मोघलांच्या कैदेत पडले. कान्होजीने शिताफीने मोघलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकार्यांत उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दीने वेढा उठविला. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचा किल्लेदार बनला. ‘‘समुद्रावरील शिवाजी’’ म्हणून ओळखल्या जाणार्या कान्होजींची कारकीर्द याच सुवर्णदुर्गावर चालू झाली.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. हा दरवाजा जरी उत्तराभिमुख असला तरी तो पूर्वेकडील बाजूस आहे. दरवाज्यासमोर वाळूची पूळण व त्यात पडलेल्या तोफा आहेत. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी केलेल्या बांधकामाचे अवशेषही दरवाज्याच्या अलिकडे आहेत. मुख्य दरवाजाच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्ती आहे. किल्ल्याच्या पायरीवर कासव कोरलेले आहे. गडाला १५ बुरुज असून गडाची तटबंदी बर्यांपैकी शाबूत आहे. किल्ल्यावर पाणी पुरवठ्यासाठी विहीर व पावसाचे पाणी साठवणारा तलाव आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूच्या तटाजवळ विहीर आहे. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे लागतात. किल्ल्याच्या अरुंद नैऋत्य टोकावरील बुरुजावरुन हर्णेच्या किनार्यांवरील कनकदूर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला हे किल्ले दिसतात. गडाच्या पश्चिमेस चोर दरवाजा व जवळच तटाला लागून पावसाचे पाणी साठवण्याचा तलाव आहे. किल्ल्याच्या वायव्य टोकावर पाण्याच टाक, दारुचे कोठार व उध्वस्त वास्तु आहे. किल्ल्याच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे व मधल्या उंचवट्यावर किल्ला बांधला आहे.