राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याखेरीज देशातील इतरही थोर व्यक्तींना भारताच्या चलनी नोटात स्थान द्यावे, या समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातील लोकांकडून करण्यात आलेल्या शिफारशींना रिझर्व्ह बँक व केंद्र सरकारने अनुकूलता दाखविली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांची छबीही चलनी नोटांवर झळकण्याची शक्यता आहे. अत्यंत साधेपणाने राहणार्या महात्माजींना त्यांचे चित्र चलनी नोटांवर छापण्याची कल्पना कितपत आवडली असती हा प्रश्न अलाहिदा. पण १९८७ मध्ये सर्वप्रथम ५00 रुपयांच्या नोटांवर व १९९६ पासून सर्व चलनी नोटांवर त्यांचे छायाचित्र छापले जायला लागल्यापासून आजपर्यंत या बाबतीतील त्यांची मक्तेदारी अबाधित आहे. महात्मा गांधींच्या आधी भारताच्या चलनी नोटांवर कोणाही व्यक्तीचे छायाचित्र नव्हे तर अशोक स्तंभ छापला जायचा. रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, चलनी नोटांच्या ‘वॉटरमार्क’मध्ये /नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र छापण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाने १९९३ मध्ये केली व नंतर भारत सरकारने त्यास संमती दिली. भारतासारख्या नानाविध वैविध्याने नटलेल्या भारताच्या चलनी नोटांवर महात्माजींच्या चित्राखेरीज अन्य काहीही न छापणे हे अन्यायाचे आहे, असे रॉय यांना वाटते.