– बाबासाहेबांच्या आक्षेपार्ह व्यंग्यचित्रावरून संसदेत गदारोळ
– एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकातून व्यंग्यचित्र काढणार
– पुस्तकाच्या विक्री आणि वितरणावर बंदी
राष्ट्रीय शिक्षण शोध आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) अकरावीच्या पुस्तकात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह व्यंग्यचित्र प्रकाशित झाल्याबद्दल आज अभूतपूर्व गदारोळात संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. गदारोळातच मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी या चुकीबद्दल माफी मागितली तसेच हे व्यंग्यचित्र पुस्तकातून काढण्याचे आदेश दिले.
हे व्यंग्यचित्र २00६ मध्ये प्रकाशित झाले होते. त्यावेळी मी मानव संसाधन विकास मंत्री नव्हतो, असा खुलासाही त्यांनी केला. मात्र समाजवादी पक्ष, बसपा, भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी या व्यंग्यचित्रावरून सरकारवर हल्ला केला. जोरदार घोषणाबाजी करीत सदस्यांनी कामकाज थांबविले. सिब्बल यांना बाजू मांडण्याची त्यांनी संधीच दिली नाही.
गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारपर्यंत व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेत मायावती, लोकजनशक्ति पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह विरोधकांनी हे व्यंग्यचित्र हटविण्यासह अभ्यासक्रमात ते समाविष्ट करणार्या समितीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
काँग्रेसचे खासदार पुनिया यांनी सिब्बल यांच्या राजीनाम्याची मागणी करीत मुद्दा ताणून धरला. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा, भाजपचे थावरचंद गहलोत, माकपचे
टी.के. रंगराजन आणि राजदचे रामकृपाल यादव यांनीही या व्यंग्यचित्राची निंदा केली.
सभापती कुरियन यांनी हे व्यंग्यचित्र निंदनीय असल्याचे आणि या मुद्यावर संपूर्ण सभागृह एक झाल्याचे स्पष्ट केले. |