क्रिकेटमधला ‘देव’ अशी जगभर ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरला राज्यसभेची खासदारकी मिळू लागली आहे. क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजविणारा सचिन राजकारणातून लोकांच्या मनात ठसा उमठवू शकेल का? या प्रश्नाने सध्या देशभरात कल्लोळ उठला आहे. त्याचा प्रभाव सोशल मीडियावर दिसून येत आहे. फेसबुकवर सचिनच्या खासदारकीवरून सध्या मोठे वादळ उठले आहे. फेसबुकवर असलेल्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये या प्रश्नावरून अनेक जण आपली मते नोंदवत आहेत. सचिनच्या असंख्य चाहत्यांनी फेसबुकच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या चिखलाने बरबटलेल्या राजकारणात न उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘टॉप हॉट’ चर्चा
सोशल नेटवर्किंंगसाठी जगभरात मोठय़ा प्रमाणात वापरल्या जाणार्या फेसबुकवर सध्या सचिनचा हा विषय ‘टॉप हॉट’ विषय म्हणून प्रत्येकाच्या अकाउंटमधून दुसर्यांच्या अकाउंटमध्ये उड्या घेत आहे. अनेक जण या प्रश्नावर आपली मते व्यक्त करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तरुणांनी मोठय़ा प्रमाणात आपली मते व्यक्त केली आहेत.