नवी दिल्ली- भारत- पाकिस्तानदरम्यान सीमित अणुयुद्ध झाले तरी जागतिक दुष्काळ पडून सुमारे एक अब्ज लोकांपेक्षा अधिक लोकांवर उपासमारीची वेळ येईल, असे भाकीत “इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ न्युक्लियर वॉर’ या अमेरिकास्थित संस्थेने व्यक्त केले आहे. शिकागो येथे झालेल्या नोबेल पारितोषक विजेत्यांच्या सभेत या संदर्भातला अहवाल जारी करण्यात आला आहे.
या अहवालाच्या लेखिका डॉ. इरा हेल्फॅंड यांनी सांगितले, की संभाव्य युद्ध दक्षिण आशियापुरते मर्यादित राहिले तरी त्यामुळे होणाऱ्या विनाशकारी शस्त्रास्त्रांच्या प्रदूषणामुळे जागतिक तापमानात लक्षणीय बदल होईल. त्यातून चीन, अमेरिका व अन्य देशांतील धान्योत्पादनात मोठी घट होईल. नव्या पुराव्यांनुसार, भारत व पाकिस्तानकडे सीमित अण्वस्त्रे आहेत; मात्र, अशा युद्धाचे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर गंभीर व दूरगामी परिणाम होऊन कुपोषणाचे बळी ठरलेल्यांवर आकाश कोसळेल.
एक अब्ज लोकांचा मृत्यू, हे मानव जातीवरील सर्वांत मोठे संकट असेल. मानवजातीची ऱ्हासाकडे वाटचाल सुरू होऊन आधुनिक संस्कृतीचा विनाश होईल, अशी भीतीही हेल्फॅंड यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अहवालातील तपशील “क्लायमेट चेंज’ नियतकालिकातही प्रसिद्ध केले जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय साठेबाजीची भीती
अध्ययनात असे दिसून आले, की युद्धानंतर दहा वर्षांत अमेरिकेतील मका व सोयाबीनचे उत्पादन सरासरी प्रत्येकी दहा टक्क्यांनी घटेल. त्याचप्रमाणे चीनमधील तांदळाचे उत्पादन पहिल्या चार वर्षांत 21 टक्क्यांनी व पुढील सहा वर्षांत दहा टक्क्यांनी घटेल. परिणामतः निर्माण होणाऱ्या धान्य तुटवड्याने सर्वत्र भयगंड निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय साठेबाजी झाल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील. – सकाळ न्यूज नेटवर्क