औरंगाबादचे प्रसिद्ध ठिकाण
1) वेरुळ लेणी -कैलास मंदिर -घृष्णेश्वर मंदिर
वेरुळला इंग्रजांनी दिलेले नाव एलोरा (Ellora) आहे व त्याच नावाने हे जगप्रसिध्द आहे. येथे जगप्रसिध्द ३४ लेणी आहेत. क्र. १ ते १० बौद्ध धर्माची, क्र. १३ ते २० हिंदू धर्माची व क्र. ३० ते ३४ जैन धर्माची आहेत. यातील लेणी क्र. १०, १४, १५, १६, २१, २९, ३२, ३३ व ३४ उत्कृष्ट आहेत. क्रमांक १६ चे लेणे कैलास लेणे आहे. डोंगरात वरुन सुरवात करुन खालपर्यंत पुरे केलेले हे ह्या लेण्याचे शिल्पकलेचे हे वैशिष्ट्य आहे. याची लांबी १६४ फुट, रुंदी १०९ फुट व उंची ९६ फुट आहे. हे खोदातांना ३० लाख घनफूट दगड वेगळा करावा लागला. हे मंदिर बांधण्याचे कामं तीन पिढ्यात इ.स. ५७८ मध्ये पूर्ण झाले. शिल्पकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. याचीच प्रतिकृती २२ क्रमांकाच्या लेण्यात आहे. ही लेणी राष्ट्रकुट राजा कृष्ण यांच्या काळात खोदली गेली. २६ व्या लेण्यात महापरिनिर्वाण म्हणजे बुद्ध मरण पावल्यावरही ते निजलेल्या स्थितीत दिसत आहे. जवळच घृष्णेश्वराचे पवित्रस्थान व कुंड आहे. हे महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (बारावे) आहे. हे शिवमंदिर असले तरी येथे पूर्ण प्रदक्षिणा घालतात. घृष्णेश्वराचे मंदिर अहिल्यादेवींनी उभारले. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.
2)बीबी का मक़बरा
बीबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहालाची प्रतिकृतीच आहे. या महालात औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम (राबीया-उद-दुर्रानी) ची कबर असून ती मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात बनविण्यात आली होती. परंतु मकबरा मलिकाचा मुलगा शहजादा आजम शाहकडून सन १६५१ ते १६६१ या काळात आईच्या स्मरणार्थ बांधला गेला असा असे इतिहासात आढळते. कबरीवर दिवसा सूर्यकिरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. येथे औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणाऱ्या वस्तू जसे चटई, भांडे, लाकडी फर्निचर, वस्त्र असून त्यांच्या राहण्याचे साधेपण प्रकट होते. बीबी-का-मकबरा स्थापत्य शास्त्रातील अप्रतिम वास्तू असून मकबऱ्याची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालासारखे आहे. मकबऱ्याच्या उत्तरेस १२ लेण्या असून त्या ६ व्या किंवा ८ व्या शतकातील आहेत.
3)दौलताबादचा(देवगिरी)किल्ला
दौलताबाद याचे जुने नाव देवगिरी. येथील प्रसिध्द किल्ला यादवांनी बांधला. रामदेवरावांच्या काळात तो अल्लाउद्दीन खिलजीने सन १२९६ मध्ये जिंकला. तर महंमद तुघलक याने सन १३२८ मध्ये राजधानी दिल्लीहून येथे आणली. किल्ल्याभोवती खंदक आहे व भुयारी मार्गाने जावे लागते. किल्ला चढतांना मध्यभागी अंधाराने व्यापलेला आहे. शत्रुला मारण्यासाठी येथे एक गरम तवा ठेवलेला असे.किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट, शिल्पसंग्रह, बुरुज, हाथीहौद, भारतमाता मंदिर, चांद मिनार, हेमाडपंथी मंदिर, कालकोट चीनी महाल, मेढा तोफ, खंदक, भुयारी रस्ता, गणेश मंदिर, बारादरी, जनार्दन स्वामींच्या पादुका, दुर्गातोफ अशा कितीतरी गोष्टी बघण्यासारख्या आहेत.येथे यादवांनी बांधलेला शंभर फुट उंचीचा मनोरा चांद मिनार किल्ल्याजवळ आहे.
4)अजिंठा लेणी
औरंगाबादपासून सुमारे १०२ किलोमीटर अंतरावर घळीच्या आकारातील पर्वतात अप्रतिम अजिंठा लेण्या कोरण्यात आल्या आहेत. बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तीचित्रे आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैत्य दालने आणि प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिख्खु वापरत असलेले विहार आणि आश्रम आहेत. लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते.सुमारे ७०० वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे १००० वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ १८३९ मध्ये शिकारीसाठी निघाला होता. यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.
5)पानचक्की
औरंगाबाद येथील पानचक्की हे पर्यटनस्थळ निजामकालीन आहे.इथे पाण्यावर चालणारी चक्की (पिठाची चक्की) असल्याने याला पानचक्की म्हणतात. इथे येणारे पाणी शहराच्या बाहेरुन ६ किमी वरुन एका नहरीद्वारे जमिनीखालून आणले जाते. व हेच पाणी २० फुट उंचीवरुन एका धबधब्याच्या स्वरुपात एका मोठ्या हौद मध्ये सोडले जाते. पानचक्की म्हणजे मध्ययुगीन अभियांत्रिकी चे एक उत्तम उदाहरण आहे.
6)जायकवाडी धरण व पैठण तीर्थक्षेत्र
जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे. हा एक बहुद्देशीय प्रकल्प आहे. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरी च्या तीरावर आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतींसाठी हे प्रकल्प पाणी पुरवते. तसेच हे पाणी या भागातील लोकांना पिण्यासाठी व औरंगाबादेतील विविध MIDC मधील उद्योगांना पुरविण्यात येते. धरणाच्या सभोवताली पक्षी अभयारण्य व उद्यान आहे. तसेच पैठण हे मराठी संत एकनाथ यांचे जन्मस्थान आहे. तसेच पैठण येथेच त्यांनी समाधी घेतली होती. त्यांचे समाधीस्थळ हि येथे आहे.