महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांस साष्टांग भावे वंदन !
महाराष्ट्राच्या पुण्यवान मातीत देवानं जन्माला घातलं याहून थोर ते काय. मग या मातीच देणं आम्ही लागतो. वीरांच्या रक्ताने शिंपलेलं हे स्वराज्य आम्हाला सहज मिळालं , इथे आमचं काय गेलं ? गेलं ते स्वातंत्र्यासाठी लढले त्यांचं ! त्यांनी सार काही करून ठेवलं आपल्यासाठी. मग पुढच्या पिढीसाठी आम्ही काय केलं ? जर नसेल केलं तर करायला हवं ! पुढाकार घ्यायला हवा. ज्याने त्याने अगदी खारीचा वाटा तरी उचलायला हवा. आज नको त्या व्यसनात आजची लहान आणि तरुण पिढी अडकत चालली आहे. त्या पिढीला योग्य ती दिशा मिळायला हवी. त्यासाठी आपण आपल्या घरातून , स्वतःपासून हि सुरुवात करायला हवी ! योग्य विचार योग्य दिशा दाखवतात आणि योग्य दिशेने चालणारा माणूस कधीच चुकत नाही.
तेव्हा शिवजयंती निमित्त काही स्फुरण पावलेल्या ओळी इथे मांडत आहे.
चुकले असेल काही शब्द तर नक्की सांगावे, सुधारण्यास वाव मिळेल.
हे शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे
रंध्रातूनी सळसळते सामर्थ्य आज वाहू दे
हे शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे
हि रांग सह्याद्रीची , जीरवली जिने हिम्मत गनिमांची
गोष्ट ना इतिहासाची , हि गाथा कडे कपाऱ्यांची
ह्या सह्याद्रीच्या कुशीत , विजयाचे स्वप्न मज पाहूदे
हे शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे
वीर आमुचे कित्येक लढले आणि अमर इथेच जाहले
आम्हास ठाऊक नाही , त्यांनी कित्येक घाव साहले
वीरगाथा हि धग धगती , आजच्या तान्ह्यास पाजुदे
शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे
नको दवडूस बलिदान , स्वातंत्र्याची राख मान तू
तूच आजचा सूर्य , चैतन्याची आहेस खाण तू
उधाण येउदे सामर्थ्यास , उफाळून क्रांती गर्जुदे
शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे
समशेरीसम आज धार शब्दास तुझ्या राहूदे
समरशंख फूंक आता , सिहंगर्जना निनादूदे
स्वराज्याच्या हिताचे बाळकडू तुज पाजते
संरक्षक हो मातृभूमीचा इतकेच तुझं जवळी मागते