मुल्हेर किल्ला
इतिहास
मुल्हेर बागुल वंशाच्या राज्यांनी बांधला होता. बागूल वंशाच्या राठोर घराण्याने १३१० ते १६३८ दरम्यान बागलाणवर राज्य केले. मुल्हेर किल्ला ही त्यांची राजधानी होती. त्यानंतर मोगलांनी बागलाणवर ताबा मिळवला.१६६४ च्या जानेवारी आणि ऑक्टोबर १६७० च्या सूरत लूट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी बागलानातून सुरत जाण्यासाठी ह्या मार्गाचा उपयोग केला होता. पहिल्यांदा पुण्यापासून सुरतपर्यंतचा संपूर्ण प्रदेश मुघलांच्या ताब्यात होता तर दुसर्या प्रसंगी बागलाण प्रामुख्याने त्यांच्या ताब्यात होता. परतीच्या प्रवासात मोगलांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला परंतु महाराजांनी त्यांचा कांचन खिंडीत पराभव केला. त्यानंतर लवकरच शिवाजी महाराजांनी या भागात मोहीम सुरू केली. जानेवारी १६७१ मध्ये पहिल्या हल्ल्यामुळे साल्हेर किल्ला मराठा राजवटीखाली आला. त्यानंतर त्यांनी मुल्हेर किल्ल्यावर हल्ला केला पण मोगल किल्लेदार यांनी हा हल्ला परतावून लावला. तथापि, मराठ्यांनी चौल्हेर किल्ला ताब्यात घेतला. ऑक्टोबर १६७१ मध्ये मोगलांनी साल्हेर किल्ल्याला वेढा घातला. पण शिवाजी महाराजांनी मोरोपंत व प्रतापराव यांना वेढा मोडून काढण्यासाठी पाठविले. त्यांनी केवळ साल्हेरला वेढा घातला नाही तर फेब्रुवारी १६७२ मध्ये मुल्हेरवर हल्ला केला आणि ताब्यात घेतला. या पराक्रमामुळे संपूर्ण बागलाण प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला.
मुल्हेर किल्ल्यावर बघायची ठिकाणे
गणेश मंदिर
गणेश मंदिर हे मुल्हेर माचीवर बांधलेले आहे.
सोमेश्वर मंदिर
गणेश मंदिरातून दोन मार्ग निघतात. डाव्या दिशेने सोमेश्वर मंदिर हे एक शिवकालीन मंदिर आहे. सोमेश्वर मंदिराच्या वाटेवर चंदन बाव म्हणून ओळखल्या जाणारी तीन मजली विहीर आहे.
मोती टाकी
सोमेश्वर मंदिरातून परत जाताना आपल्याला एक दुभाजक लागतो ज्यापासून सरळ मार्गाचा अनुसरण केल्यास आपण पठारावर पोहोचतो जिथून आपल्याला थंड पिण्याच्या पाण्याची मोती टाकी दिसते.
राजवाडा
पठारावरून सरळ वाटेने निघालो की आपल्याला राजवाडा दिसतो, ज्याचे आता अवशेष बाकी आहेत.
राम-लक्ष्मण मंदिर
राजवाड्यापासून जवळच आपण प्रसिद्ध राम-लक्ष्मण मंदिरात पोहोचतो.
बाले किल्ला
मोती टँक येथून उजव्या मार्गाने आपण गडाच्या महादरवाजा येथे पोहोचतो. आत जाताना उजवीकडे एक बुरुज दिसतो, तर डाव्या बाजूला एक गुहा दिसते. गडाच्या पठारावर आपल्याला भडंगनाथचे मंदिर,९-१० कुंड, वाड्यांचे अवशेष इत्यादी दिसतात. भडंगनाथ मंदिराच्या वरती असलेल्या छोट्या टेकडीवर चढताना आणि दुसर्या बाजूने खाली जाताना, मोरा, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड असे किल्ले, तसेच मांगी-तुंगीचे शिखर देखील पाहण्यासाठी मिळते.