जयगड
इतिहास
किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून जयगड किल्ला ओळखला जातो. निसर्गसंपन्न आणि सौंदर्य हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
सध्या या बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षीत केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येवून भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेले आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे.दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारा वर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे.
दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामधे पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असेही म्हणतात.या वाडय़ाशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. मात्र ती झाडी झुडुपांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळेजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जीवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपूर्ण बलीदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे.
तटबंदीवरुन पूर्ण गडफेरी करता येते. गडावरुन समुद्राकडील देखवा उत्तम दिसतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी मार्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते मात्र तोफां आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीडतासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायर्या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खाली जांभ्या दगडा कोरलेली गुहा आहे. या गुहेत मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुज ही पहायला मिळतात. समुद्राकाठचा पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी सडकेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो.