देवगड किल्ला
इतिहास
देवगड किल्ला कोणी व कधी बांधला याची माहिती उपलब्ध नाही. इतिहासातही या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळत नाही.इ.स.१७७२ मध्ये वॉल्टर ब्राऊन याने वाडीकर सावंतांच्या मदतीने देवगड किल्ल्यावर हल्ला चढविला होता, पण त्या हल्ल्यात त्यांचा पार धुव्वा उडाला होता.इ.स.१८१८ मध्ये कर्नल इम्लाफ याने हा किल्ला जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे
देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. गावातून टेकडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. टेकडीच्या सुरुवातीच्या भागात दाट वस्ती आहे. या वस्तीतच डाव्या बाजूला एक गल्ली जाते, या गल्लीच्या टोकाला सुटा बुरुज आहे. वस्ती संपल्यावर बालेकिल्ल्याकडे जातांना उजव्या बाजूला २ सुटे बुरुज आहेत. हे तीनही टेहळणी बुरुज असून त्यांचा उपयोग समुद्रावर, बंदरावर व आजूबाजूच्या परीसरावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे.टेकडीवरील पठारावरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपल्याला प्रथम बालेकिल्ल्याची पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी व त्यातील ३ बुरुज दिसतात. देवगड किल्ल्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. चौथ्या म्हणजेच टेकडीच्या बाजूने संरक्षण देण्यासाठी कातळात ३ मीटर रुंद व २.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे. या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची उंची वाढलेली आहे. इतर किल्ल्यांच्या खंदकाप्रमाणे या खंदकात पाणी साठवले जात नव्हते. कातळात खोदलेल्या या खंदकातील दगड (चिरे) वापरून गडाची तटबंदी व बुरुज बांधलेले आहेत.
तटबंदीच्या पूर्व टोकाला २ बुरुजांच्या मध्ये गोमुखी दरवाजा लपवलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस तटबंदीतच हनुमानाची मूर्ती बसवलेली आहे. त्याच्या शेजारीच प्रवेशव्दाराच्या बुरुजावर जाणारा जीना आहे. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. येथून किल्ल्याच्या अर्ध्या भागात असलेली पोर्ट ट्रस्टची कार्यालये व दिपस्तंभ दिसतात. प्रवेशव्दाराच्या समोरच गणपतीचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. त्यातील पूरातन गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन तटबंदीच्या कडेकडेने बालेकिल्ला पहाण्यास सुरुवात करावी.प्रथम उजव्या बाजूस एक छोटी दोन खणी चिरेबंदी वास्तू दिसते. पुढे गेल्यावर कातळात खोदलेली २ सुकी टाकी दिसतात. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या बुरुजा वर चढण्यासाठी रुंद पायर्या आहेत. या बुरुजात जंग्या आहेत, तसेच तोफा ठेवण्यासाठी झरोके देखिल आहेत. याच बुरुजावर झेंडा लावण्या साठी सोय केलेली आहे. बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर घरांचे चौथर्यांचे अवशेष दिसतात.पुढे एक चिर्यात बांधून काढलेली चौकोनी विहिर आहे, तिच्या भोवती चिर्याचे कंपाऊंड केलेले आहे. विहिरीच्या पुढील भागात पोर्ट ट्रस्टची कार्यालये व दिपस्तंभ आहे. या भागात जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशव्दारापाशी परत यावे.
प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर डावीकडील आमराईत सिमेंट मध्ये बांधलेल्या पायर्या दिसतात. या पायर्यांनी ५ मिनिटात आपण समुद्राला लागून असलेल्या रस्त्यावर पोहोचतो. येथे कस्टमचे कार्यालय आहे; त्याच्या विरूध्द बाजूस म्हणजे डावीकडे वळून ( उजव्या बाजूस समुद्र व डाव्या बाजूस डोंगर ठेऊन) चालत राहील्यास ५ मिनिटात आपण पोर्ट ट्रस्टच्या गेटपाशी पोहोचतो. गेटच्या अलिकडे समुद्राच्या बाजूला एक भिंत आहे. या भिंतीच्या मागे किल्ल्याचे समुद्राकडील प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर एकदम प्रवेश करता येऊ नये म्हणून प्रवेशव्दारा समोरच भिंतीची रचना करण्यात आली आहे व डाव्या बाजूस चिंचोळी वाट ठेवलेली आहे. पूर्वीच्या काळी या प्रवेशव्दारा समोरच समुद्रात बोटींसाठी धक्का असावा. येथून पुन्हा रस्त्यावर येऊन कार्यालयांपाशी पोहोचावे. येथे दोन तोफा समुद्राकडे तोंड करून ठेवलेल्या आहेत. या दोन तोफांमधून जेटीवर जाण्यासाठी पायर्या आहेत. जेटीवरून समुद्रात बांधलेले किल्ल्याचे चार बुरुज दिसतात. कार्यालय ओलांडून पुढे गेल्यावर शेवटच्या टोकावर एक मोठा बुरुज आहे. येथून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या आहेत तसेच तटबंदी आहे.(या भागात जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशव्दारापाशी परत यावे). येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने परत बालेकिल्ल्यावर जावे किंवा सरळ रस्त्याने गेल्यास आपण ३० मिनिटात देवगड गावात पोहोचतो.