तोरणा (प्रचंडगड)
१७ व्या शतकात ज्याच्या ताब्यात किल्ला त्याच्या ताब्यात भोवतालचा प्रदेश अशी वस्तुस्थिती असल्याकारणाने शिवाजीमहाराजांनी आपल्या अधिकारात असलेल्या प्रदेशातील अनेक जुन्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला व काही किल्ले नव्याने बांधले. यामध्येच महाराजांनी तोरण्याचा जीर्णोद्धार करून त्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले होते.शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याचा एक प्रमुख शिलेदार म्हणून तोरणा किल्ल्याची इतिहासात नोंद आहे. महाराष्ट्रातील सर्व गडांचा स्वतःचा असा विशिष्ट इतिहास आहे. त्याचप्रमाणे तोरणा किल्ल्यावर देखील इतिहास घडलेला आहे. शिवाजीमहाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, त्यावेळी सर्वप्रथम तोरणा किल्ला सर केला, असे इतिहास सांगतो. विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे या किल्ल्यास ‘तोरणा’ असे नाव दिले गेले, असे काही इतिहासकार सांगतात. तर काही अभ्यासकांच्या मते गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव ‘तोरणा’ असे ठेवण्यात आले होते. गड काबीज केल्यानंतर शिवाजीमहाराजांनी गडाची पहाणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून, गडाचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले होते.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बंगलोरकडे जात असताना नसरापूरहून वेल्हे या गावी पोहोचता येते. वेल्हे हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेटहून वेल्हय़ाला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा आहे. तसेच पुण्याहून खडकवासला धरणापासून पुढे खानापूर गावाकडे जात असताना एक वाट पाबेघाटमार्गे वेल्हय़ाकडे जाते. या वाटेने देखील वेल्ह्यास पोहोचता येते. स्वतःचे वाहन असेल तर या मार्गे जात असताना सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत वेल्ह्याकडे जाता येते.
इतिहासामध्ये तोरणा किल्ला कोणी आणि इ. स. च्या कोणत्या षतकात बांधला? याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु गडावर असलेल्या मंदिरांच्या जीर्ण अवशेषांवरून किल्ल्याच्या इतिहासाबाबत काही गोष्टी सांगण्यात येतात. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर कालांतराने हा किल्ला निजामशाही आणि आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काही निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. त्यावेळी तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर करून मुरुंबदेवाच्या डोंगरावर असलेल्या राजगडाची उभारणी करण्यात आली होती. हाच राजगड पुढे अनेक वर्ष शिवाजी राजांच्या स्वराज्याची राजधानी होता. तसेच कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर तोरणा किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी देखील करण्यात आला होता.
तोरणजाई देवी मंदिर (कोठी दरवाजा) आणि मेंगाई देवी मंदिर :
कोठी दरवाज्यासमोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदिर आहे. त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे. याच ठिकाणी खोदाई करत असताना, मावळ्यांना मोहरांचे हंडे सापडल्याची इतिहासात नोंद आहे. गडाकडे पुढे जात असताना वाटेवर तोरण टाके आणि खोकड टाके आहेत. त्यापुढे जवळच मेंगाई देवीचे मंदिर आहे. रात्री मुक्कामी येणारे दुर्गप्रेमी या ठिकाणी राहतात. तसेच नवरात्र उत्सव काळात, वेल्हे गावातील लोक गडावरती देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात. मेंगाई देवी मंदिरापासून झुंजार माचीकडे जात असताना हनुमान बुरुज, भेल बुरुज, सफेली बुरुज, माळेचा बुरुज, फुटका बुरुज आणि लक्कडखाना आहे.
झुंजार माची : मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यानंतर, बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते. झुंजार माचीकडे जाणारी वाट सोपी नाही. तसेच पावसाळ्यात झुंजार माचीकडे जाणे धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहून झुंजार माचीकडे जाणे गरजेचे आहे. झुंजार माचीवर पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात धुके असते. तसेच उन्हाळ्यात माचीवरून दूरवरचा प्रदेश नजरेत येतो.
तोरणेश्वर महादेवाचे मंदिर : मेंगाई देवी मंदीर परिसरामध्ये भग्न वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. याच ठिकाणी बुधला माचीकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या परिसरात देखील पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात धुके असते. समोरचा माणूस देखील दिसू शकत नाही. तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर तोरणा परिसरातील राजगड, केंजळगड, रोहीडा,सिंहगड, पुरंदर, वज्रगड पर्यंतचा परिसर दिसतो.
बुधला माची : गडाच्या पश्चिमेला बुधलामाची आहे. बुधला माचीच्या टोकाला चित्ता दरवाजा आहे. बुधला माचीकडून गडाकडे येत असताना कोकण दरवाजा, टकमक बुरुज, शिवगंगा, पाताळगंगा टाके दिसते. बुधला माचीवरून एक वाट भगत दरवाज्याकडे, तर दुसरी वाट घोडजिन टोकाकडे जाते. भगत दरवाजाच्या वाटेने राजगडाकडे जाता येते. पावसाळ्यात या वाटेने जाणे धोक्याचे ठरू शकते, या ठिकाणी अतिशय कठीण वाट आहे. आणि एकदम उभा कातळ कडा आहे.
बालेकिल्ला : बालेकिल्ला ही तोरणा गडावरील सर्वात उंचावरची जागा आहे. बुधला माची परिसरातील सह्याद्रीचे सौंदर्य पाहून पुन्हा परतीच्या वाटेने मेंगाई देवीच्या मंदिराकडे आल्यानंतर बालेकिल्ल्याचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्यापासून गडाचा भलामोठा विस्तारही नजरेस पडतो. खरेतर त्याच्या या विस्तारावरूनच शिवाजी महाराजांनी तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले होते.
तोरणा किल्ल्यावर पुणे आणि परिसरातील पर्यटक सुट्ट्यांमध्ये येत असतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या या गरुडाच्या घरट्यावर येणाऱ्या पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा देखावा नजरेत साठवताना, स्वतःच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून, जास्त उत्साही न होता, गड पाहणे गरजेचे आहे. कारण तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत चढाईस अवघड आहे.