रांगणा किल्ला (Rangana Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

रांगणा किल्ला

रांगणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील एक किल्ला आहे.किल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो.महाराष्ट्रातील शिवकालीन एक प्रसिद्ध किल्ला. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कुडाळ तालुक्यात, कोल्हापूरच्या नैऋत्येस सु. ७८ किमी. वर सह्याद्रीच्या पर्वतरांगांत आहे.याची उंची सस. सु. ८०० मी. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. त्याची लांबी १,६०० मी. असून रुंदी ९०० मी. आहे. त्याच्या पूर्वेच्या बाजूने या किल्ल्यावर जाता येते. यास कोल्हापूर, पाटगाव,तांबडेवाडी, चिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येते; पण पावसाळ्यात हा मार्ग बंद पडतो. चिक्केवाडीहून रांगण्यास प्रायः चढ नाही.उलट सु. ७ मी. उतरल्यावर किल्ल्याचा माथा येतो. त्याचा तट अनघड दगडांनी बांधलेला होता. किल्ल्याला पूर्वेकडून एका मागून एक तीन दरवाजे व पश्चिमेस एक दरवाजा आहे. पाण्यासाठी माथ्यावर एक तलाव व दोन विहिरी आहेत. गडावर रांगणाई (महिषमर्दिनी), मारुती, महादेव यांची देवालये असून एका वाड्याचे जुने अवशेषही तेथे दिसतात.रांगणाईसमोर एक पडझड झालेली दीपमाळ आहे. शिवाजीनी पन्हाळ्याप्रमाणे हा किल्लाही १६५९ मध्ये हस्तगत करून त्याची डागडुजी केली. छ. शाहूंबरोबरच्या युद्धात महाराणी ताराबाईंनी याचा आश्रय घेतला होता (१७०९). १८४४ मधील कोल्हापूरच्या बंडानंतर इंग्रजांनी ह्या किल्ल्याची तटबंदी पाडून टाकली आणि तो ताब्यात घेतला. प्रसिद्धगड म्हणूनही तो ओळखला जातो.

इतिहास
रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’.बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्य्राला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वतःजिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्त्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आग्य्राच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.

औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू – ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यानी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला. सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्त्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येईपर्यंत करवीरकरांकडे राहिला.

पहाण्याची ठिकाणे
सहयाद्रीतील प्रत्येक गडात प्रवेश करण्यासाठी डोंगरावर चढाई करावे लागते. परंतु रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क उतार उतरुन गडात प्रवेश करावा लागतो. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरुन जाणार्‍या छोटया वाटेने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो. प्रवेशद्वार परिसराची रचना युध्दशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे.

पहिल्या प्रवेशाद्वारातून पुढे गेल्यावर बुरुजाचे संरक्षण देऊन लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडया आहेत. या दरवाज्याच्या उजव्या अंगाने जाणार्‍या पायवाटेने गेल्यावर एक कोरडा तलाव लागतो. येथून पुढे जांभ्या दगडात बांधलेली जोती दिसतात. गडाच्या या भागात दोन्ही बाजूने भक्कम तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. शेवटी भव्य बुरुजात एक हनुमंताचे शिल्प कोरलेला चोर दरवाजा आहे. परंतु तो दगडांनी चिणलेला आहे. येथून पुन्हा माघारी दुसर्‍या दरवाज्याजवळ यायचे. समोरच उजव्या हातास वाडयाची चौकट दिसते. चौकटीतून आत गेल्यावर विहिर लागते. वाडयाच्या भिंतीजवळ फारसी शिलालेख आहे. वाडा पाहून पुढे गेल्यावर समोरच गडाचा तिसरा भक्कम दरवाजा लागतो. त्याला चार कमानी आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर सरळ पायवाटेने पुढे गेल्यास बारमाही भरलेला तलाव लागतो. तलावाच्या दुसर्‍या बाजूस अनेक समाध्या दिसतात. एका कोपर्‍यात भग्न शिवमंदिर दिसते. यानंतर ओढा पार करुन आपण रांगणाई मंदिराजवळ येतो.रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे. मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे.रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दीपमाळ आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. जवळच कोरडी विहिर आहे.

यापुढे दाट जंगल असल्याने आपण पुन्हा तिसर्‍या दरवाज्यापर्यंत माघारी यायचे. तलावाकडे तोंड उभे राहिल्यास डाव्या हाताने जाणार्‍या पायवाटेने चालू लागायचे. वाटेत छोटेसे गणेशमंदिर लागते. तटबंदीच्या बाजूने चालू लागल्यावर एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. पिंडीस दोन लिंगे आहेत. हे पाहून तटाच्या बाजून पुढे चालू लागल्यावर काही पायर्‍या उतरल्यावर एक दरवाजा लागतो. या दरवाजाच्या डाव्या बाजूस तटबंदीमध्ये गोल तोंडाची विहिर आहे. पुढे चालून गेल्यावर आपण गडाच्या हत्तीसोंड माचीवर पोहोचतो. ही संपूर्ण माची राजगडाच्या संजिवनी माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायर्‍याही आहेत. तटाच्या उजव्या हाताच्या उतारावर चिलखती बुरुज आहे. हा बुरुज पाहून आपण वर यायचे व सोंडेच्या टोकावर असलेल्या चोर दरवाज्यात उतरायचे. माथ्यावर बारा कमानी असलेला दगडात खोदून काढलेला हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून उतरण्यासाठी पायर्‍या असून त्या उतरल्यावर आपण दरीच्या तोंडावर येतो, तेव्हा सावधपणा बाळगावा. तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपणास आणखी एक भव्य दरवाजा लागतो. या दरवाज्यातून उतरणारी वाट केरवडे गावात जाते. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे.तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपण पश्चिमेकडील कोकण दरवाजाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. या दरवाज्यावर गोल बुरुज आहे. या दरवाज्यातून उतरणारी वाट कोकणातील नारुर गावास जाते. कोकण दरवाजा रांगणाई देवी मंदिराच्या बरोबर मागे असल्याने आपण पायवाटेने १५ मिनिटात मंदिरात येऊन पोहोचतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा