पेमगिरी किल्ला (Pemgiri Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

पेमगिरी किल्ला

इतिहास:
पेमगिरी किल्ला हा इतिहासाच्या दृष्टीने तसा खुप महत्वाचा किल्ला! का ते पुढे कळेलच. किल्ल्याची निर्मिती ही पेमाई देविच्या मंदिरापासुन झाली असे गावकरी सांगतात. इ.स. २०० मध्ये यादव काळात राजांनी हे मंदिर बांधले. आणि इथे गड त्यांनी उभारला की इतर कोणी यात अजुन संभ्रम आहे. गडावर सातवहान काळातील टाके आहेत त्यामुळे काही इतिहासकार सातवाहन काळातील बांधकाम असल्याचे देखील बोलतात.स्वराज्याचे विचार या गडावरुन रुजले हे म्हणायला देखील काही हरकत नाही. इ.स. १६३२ मध्ये निजामशाहीची राजधानी असलेल्या दौलताबादच्या (देवगिरी) किल्ल्यावर मोगल सरदार महाबतखानाने वेढा दिला. निजामशहाचा यात पराभव झाला व मोगलांनी हुसेम निजामशहा व त्याचा वजीर फत्तेखान यांना अटक केले व निजामशाही चा शेवट झाला. परंतु निजामशाहीचे मातब्बर सरदार शहाजीराजे भोसले यांनी हुसेन निजामाचा मुलगा मुर्तिजा निजामाला कैदेतुन सोडवुन आणले. मुर्तिजाला मांडिवर घेऊन शहाजीराजे निजामशाहीचे मुख्य वजीर बनुन राज्य चालवु लागले. या कामात आदिलशाही सरदार व शहाजीराजांचे मित्र मुरारजगदेव याची राजांना मदत झाली. पुढे ६ मे १६३६ रोजी राज्य चालवने कठिण झाल्याने शहाजीराजांनी मोगल आणि आदिलशहा शी तह केला आणि या दिवशी निजामशाही संपली. स्वराज्याचे पहिले स्वप्न इथेच बघितले गेले हे म्हनायला काही हरकत नाही.शहाजीराजे निजामशाहीत होते आणि गड निजामशाहीत म्हणुन राजमाता जिजाऊ यांचा संबंध या गडाशी येतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काही काळ राजमाता जिजाऊ या गडावर वास्तव्यास होत्या. परंतु खुद्द जिजाऊ मासाहेबांचे वडिल श्री लखुजीराजे जाधव हे भोसले-जाधव वैरामुळे जावई शहाजीराजे व मुलगी जिजाऊ यांच्यावर चाल करुन आले व त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे जिजाऊंना गड सोडावा लागला. आणि मग शहाजीराजे व जिजाऊ जुन्नरच्या दिशेने रवाना झाले. विचार करा जर लखुजीराजे चाल करुन आले नसते किंवा भोसले-जाधव हे वैर नसतं तर आज अहमदनगर जिल्ह्याला महराजांची जन्मभुमी म्हणुन ओळखले गेले असते. आज आपल्याला गडावर जे पेमादेविची २ मंदिर दिसतात त्यातील एक राजमाता जिजाऊ यांनी बांधलेले आहे.(एक इतिहासाला समजनार नाही अशी कथा इथे सांगितली जाते की जिजाऊ १८ फेब्रुवारी १६३० ला इथे होत्या! मलाही याचं आश्चर्य वाटत. थोडा विचार करुयात यावर, पेमगिरी ते शिवनेरी अंतर जवळपास ६० कि.मी. , अंतर पार करायला घोड्याला किती वेळ लागनार? १२ तास चला १० तासच धरुयात, राजमाता गरोदर होत्या, ९ महिन्यांची गरोदर स्त्री चालु शकत नाही आणि घोड्यावर कसे जाणार? त्या घोड्यावर जाऊच शकणार नव्हत्या. त्याना पालखीने घेऊन जावे लागणार होते. तुम्ही कितीही भोई असतील असा विचार केला तरी १ दिवस तर नक्‍की लागनार होता. परंतु हा प्रवास देखील तितकाच कठिण असतो. हे सोडा पण सगळे इतिहासकार असं लिहितात की राजमाता शिवनेरी अगोदर विश्वासरावांच्या घरी होत्या आणि जवळपास ३ महिने तरी शिवजन्माअगोदर त्या शिवनेरी वर होत्या. यावरुन १८ तारखेच्या कथेची सत्यता तुम्ही स्वतः तपासा)

किल्ल्यावर प्रवेश
गड वनविभागाच्या ताब्यात आहे त्यामुळे गडावरील निसर्गाचा र्‍हास होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. गडावर कचरा होणार नाही आणि गडावर मद्यपान आणि धुम्रपान होनार नाही याची जबाबदारी आपण देखील घ्यावी.पेमगिरी गावात पोहोचल्यानंतर गावातील पाण्याच्या टाकी शेजारुन वर चढनार्‍या वाटेने आपण किल्ल्याकडे कुच करायची. आपल्याला गावकर्‍यांनी बांधुन दिलेल्या दगडी पायर्‍यांनी वर जायचे. या पायर्‍या संपल्यानंतर लागतात कातळात कोरलेल्या पायर्‍या! या पायर्‍या पहायच्या आणि पोहोचायचं ते पर्वत माथ्यावर. इथुन एक बाजुनी तासलेला आणि तीन बाजुनी गोलाकार असलेला पेमगिरीचा डोंगर शिवलिंगा सारखा दिसतो. पुढे गेल्यावर उजव्या हाताला देवीचे एक छोटेखानी मंदिर लागते. या मंदिराला बांधन्यामागचे कारण म्हणजे जे लोक त्या काळात गडावर जाऊ शकत नव्हते त्यांच्यासाठी बांधलेले होते.पेमाईदेवी हे येथील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असल्याने आज गावकर्‍यांनी गडाचा प्रवेशमार्गच फोडुन अगदी तळपायथ्यापासुन गडाच्या सर्वोच्‍च माथ्यावर जाणारा डांबरी रस्ता केलाय. स्वतःच्या सोईसाठी आपण ऐतिहासिक ठेवा देखील जपतोय की आणखी काही? या सरळ रस्त्याने दक्षिण बाजुने आपण गडावर खाजगी गाडीने पोहोचाल. अलीकडे महाराष्ट्रात दुर्गविकासाच्या नावाखाली नको ते करनारे घातक पर्व सुरु झाले आहे. या पर्वात सर्वात प्रथम काय केले जात असेल ते म्हणजे गडपायथ्यापासुन अगदी मध्ये येनारा गडाचा तट जमिनदोस्त करुन सरळ गडमाथ्यावर पोहोचनारा सुखदाय प्रवासी डांबरी रस्ता तयार करने. हाच घातक प्रकार या पेमगिरी किल्ल्यासोबत झालेला आहे. कालाय तस्मै नमः, दुसरे काय? इतकच नव्हे अजुन भरपुर चुका आहेत त्या आपण शेवटी बोलुच हा डांबरी रस्ता आपल्या सारख्या भटक्यांसाठी नव्हेच, अस मी म्हणेल. गडाचा विस्तार हा दक्षिणोत्तर आहे. आपण ज्या मार्गाने आलो तिथुन गडाच्या दक्षिण बाजुस आपण पोहोचतो. इथे कदाचित बुरुज असेल असे मला वाटते, कारण या ठिकाणावरुन संपुर्ण परिसराचे दर्शन आपल्याला घडते. डांबरिकरनाच्या पर्वात गडाच्या तटबंदी देखील उरल्या नाहीत याचे दुःख मनाला गड बघुन झाल्यानंतर देखील रहाते. नंतर गडावर केलेल्या विकासापैकी एक लोखंडी पुलावरुन गडाच्या उत्तर भागात पोहोचायचं.त्या पुलावरून किल्ल्यावर गेल्यास सर्वप्रथम आपल्याला पेमाई देवीचे मंदिर दिसते. गडाच्या दक्षिण भागात वाड्याचे काही अवशेष म्हणजेच चौथरा आणि भिंतीचे काही अवशेष पाहायला मिळतात. वाटेत आपल्याला तीन पाण्याची टाके पाहायला मिळतात यातील पाणी उपशाअभावी पिण्यायोग्य नाही. आपण गड माथ्यावर पोहोचताच एकंदरीत किल्ल्याचा छोटेखानी आकार पटकन आपल्या दृष्टीस पडतो. किल्ल्याच्या मध्यभागी पेमाई देवीचे छोटे मंदिर आहे. मंदिरात देवीचा मुख्य तांदळा व त्याच्या शेजारीच देवीची शस्त्रसज्ज मूर्ती आपणास पहावयास मिळते. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला या देवीची मोठी यात्रा गडावर भरते.आपण देवीचे दर्शन घ्यायचे आणि बाकी गड बघायला सुरुवात करायची. देवीच्या मंदिरासमोर आपल्याला पाण्याचे चार कातळकोरीव लांबलचक आयताकृती टाके पाहायला मिळतात. हे जणू खंदक आहेत असेच भासते.यातील मधली दोन टाकी ही खांब टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असून इथे दोरी व बादली आहे जिच्या मदतीने आपण आपली तृष्णा भागवू शकतो. गडाच्या दक्षिणेकडून आपण आलो आणि उत्तरेकडे जाताना वाटेत देवीचे नवीन मंदिर लागते. त्याच्या पुढे उत्तर टोकाला आपल्याला काही कोरडी पडलेली टाकी बघायला मिळतात. वाटेत जे मोठं पाण्याचं तळ लागतं ते बाळंतनीचे टाके होय. गडावर काही इमारतींचे अवशेष सोडता सध्या काही पाहायला उरलेले नाहीये.मी जे लिहिलंय त्यात मी आणखी काही खंत मांडणार आहे. जसे रस्ता बनवून ह्रास केलाय त्याच प्रमाणे आता आपला वनविभाग इथे बसायला जागा करतंय ,झाडे लावतय, इतकंच काय मंदिराच्या भोवतीचा प्रदेश सपाट केला जातोय. कशासाठी हा अट्टहास? दारुड्यांच्या सोयीसाठी की दुर्गप्रेमींसाठी? दुर्गप्रेमींना सुविधा नसल्या तरी चालतील परंतु गडावर, माझ्या इतिहासात ज्या स्थळांना महत्व आहे तिथे या गोष्टी नकोत. तुम्ही गडावर कधी मध्ये गेलात तर काही प्रेमीयुगल गडावर आपल्याला अश्लीश चाळे करताना दिसेल. यांच्यासाठी आहेत का या सुविधा? जस प्रशासनाची चूक आहे त्यापेक्षा जास्त चूक ही तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे, का आपण हे असं वागतोय?, गडांना घर मानून जर तिथे अस कोणी करताना दिसलं तर त्याला हटकने ही आपली देखील जबाबदारी आहे. गडसंवर्धन जमत नसेल तर आपल्याला समाजाचं काही तरी देणं लागतो म्हणून तरी गडांची काळजी घ्या. तिथे असे प्रकार होऊ देऊ नका, याची शपथ आज वाचताना घेऊया! स्थानिक संस्था जर हे वाचत असतील तर त्यांना एकंच सांगणं आहे गडावर जिथे ऐतिहासिक महत्व आहे तिथे माहिती फलक जास्तीत जास्त लावा आणि अशा प्रकारचा दुर्गविकास करण आता तरी थांबवा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा