नरनाळा किल्ल्या ( Narnala Fort )
Like
Like Love Haha Wow Sad Angry

नरनाळा किल्ल्या

इतिहास प्रेमींना महाराष्ट्रातील किल्ल्यांनी नेहमीच भुरळ पडली असून त्यांना या गडांचे कायम आकर्षण वाटत आले आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहेत अगदी त्याच पद्धतीचे किल्ले अवघ्या महाराष्ट्रात सर्वदूर विखुरले आहेत परंतु इतिहास प्रेमींना त्या किल्ल्यांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ते तिथवर आजपर्यंत पोहोचू शकले नाहीत. विदर्भात देखील बऱ्याच पुरातन किल्ल्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे, आणि त्यातलाच एक महत्वाचा आणि पर्यटकांच्या दृष्टीकोनातून दुर्लक्षित राहिलेला किल्ला म्हणजे अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला होय.

महाराष्ट्रातील एक जिल्हा अकोला आणि या अकोला जिल्ह्यातील एक तालुका अकोट. अकोट तालुका निसर्गरम्य ठिकाणांनी नशीबवान ठरला आहे वारी हनुमान हे ठिकाण असो, की पोपटखेड चे धरण, जवळच असलेला मेळघाट परिसर, सर्वदूर पसरलेली हिरवाई. सातपुड्याच्या पर्वत रांगांमुळे येथे पाऊस देखील भरपूर पडतो. या अकोट तालुक्याच्या उत्तरेला सुमारे 24 की.मी. अंतरावर एक ऐतिहासिक किल्ला पहावयास मिळतो.तो हा नरनाळा किल्ला समुद्र सपाटीपासून हजार मीटर ऊंचीवरच्या किल्ल्याला पर्यटक वर्षभर भेट देतात. हा किल्ला गोंड राजाने बांधल्याचे सांगितले जाते किल्ल्याचा ताबा वेगवेगळ्या राजवटींकडे राहिल्याने त्या त्या राजवटीचा स्थापत्य कलेचा प्रभाव किल्ल्यावरील बांधकामात पाहण्यास मिळतो. त्यातल्या शहानूर (वाघ दरवाजा), मेहंदी, महाकाली (नक्षी दरवाजा), अकोट, आणि दिल्ली दरवाजा यावर बहमनी स्थापत्य शैलीचा प्रभाव पडलेला प्रकर्षाने जाणवतो. महाकाली (नक्षी दरवाजा) दरवाजाच्या वरच्या भागात बहमनी काळातील दोन शिलालेख कोरलेले दिसतात. त्यातल्या वरच्या शिलालेखात तो दरवाजा घडविल्याची तारीख हिजरी सन ८९२ (इ.स.१४९७) असा उल्लेख आहे तर खालच्या लेखात गाझी सुलतान शहाब-उद-दुनिया वाद-दिन महमूद शाह याच्यासाठी आशीर्वचन लिहिलेले आहे.

किल्ल्यावरील महत्त्वाच्या बांधकामांमधे गजशाळा, अंबर महाल, जनानखाना, जामा मशिद, तेलाचे आणि तुपाचे टाके, नगारखाना, खुनी बुरुज, कारखाना यांचा समावेश होतो.. किल्ल्यावर काही नवगज तोफा पडलेल्या आढळतात. त्यांची शैली आणि घडविण्याचे तंत्र वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे जाणवते.
हा किल्ला 392 एकर जमिनीवर वसला आहे. त्याला 36 कि.मी.ची तटबंदी आहे. 22 दरवाजे आहेत आणि 36 बुरूज आहेत. पावसाच्या पाण्याची साठवण करण्याची आणि ड्रेनेजची उत्तम व्यवस्था इथे दिसून येते. एकूण 22 मोठ्या टाक्या अशा पद्धतीने बांधल्या आणि एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत की ज्यामुळे ऊंचावरच्या टाकीतले पाणी खालच्या ऊंचीवरील टाकीत आपणहून पडत राहाते, साठते. पावसाच्या पाण्याचा थेंबही वाया जाणार नाही अशी रचना इथे करण्यात आली आहे जी खूप कौतुकास्पद आहे.

इतिहास
नरनाळा किल्ला कुणी आणि कधी बांधला या विषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही पण गडाविषयी असलेले स्थापत्य आणि ऐतिहासिक पुरावे पहाता ‘गोंड राजांनी‘ हा किल्ला बांधला असावा असा अंदाज आहे. नरनाळा किल्ल्यावर लगेच लक्ष वेधून घेणारे नागपूरकर भोसले काळातील तुळशी वृंदावन आणि मारुतीरायाचे देऊळ आहे.गडावर राम तलाव आणि धोबी तलाव यांसहित तब्बल 22 तलाव आहेत. किल्ल्यावरचे बुरुज मोजायला निघालात तर तब्बल 64 बुरुज भरतात. मजबूत तटबंदी आणि दुर्गम पहाडांच्या आधाराने हा किल्ला सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडच्या विशेषतः माळव्यातुन येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. नरनाळा किल्ल्याविषयी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
नरनाळा किल्ल्यावर प्रवेश करतांना एकूण पाच दरवाजे लागतात. या दरवाज्यांना पाहून गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना येते. सुरुवातीला नजरेस पडतो तो शहानुर दरवाजा त्यापुढे आहे मोंढा दरवाजा.त्यानंतर अतिशय सुरेख कलाकुसर केलेला महाकाली दरवाजा त्या काळातील कलात्मकतेचा परिचय करून देतो.

या दरवाज्यातून आत गेल्या नंतर आपण किल्ल्यावर पोहोचतो. गडाच्या मध्यभागी सक्कर तलाव नावाचा मोठा जलाशय आहे. या तलावात बाराही महिने पाणी असते. औषधी गुणांसाठी या तलावाची ख्याती आहे, असं म्हणतात की जर कुणाला कुत्रा चावला तर त्याने या तलावातील पाण्याने अंघोळ करून इथे असलेल्या दर्ग्यावर गुळ फुटाणे वाहून लगेच गड उतरावा आणि उतरतांना मागे वळून पाहू नये, त्याने बाधा उतरते. (आख्यायिका) गड आज जीर्णावस्थेत उभा असला तरी देखील राणी महाल आणि मशीद अस्तित्वात आहे. येथे उभे असलेले स्तंभ त्याकाळातील भव्य सभामंडपाची जाणीव करून देतात. सरळ पुढे गेल्यावर तेला-तुपाच्या मोठ्या टाक्या लागतात युद्धाच्या वेळी तेल-तूप साठवण्यासाठी या टाक्यांचा उपयोग करण्यात येत असे.

गडावर मोठ्या आकाराची ‘नऊगजी तोफ’ आहे, अष्टधातूची ही तोफ इमादशहाच्या काळात किल्ल्यावर आणली गेली असावी. या तोफेवर पारशी भाषेत लेख लिहिला असून तोफेचे तोंड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानुर गावाच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चौफेर दाट चंदनाचे खोरे असून सागाची आणि चंदनाची असंख्य वृक्षवल्ली इतस्ततः पसरलेली आहे. नरनाळा किल्ल्याला 7 जून ई.स. 1916 ला राष्ट्रीय सरंक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu