मांजरसुंबा
इतिहास
अहमदनगर शहरात निजामशाहीची स्थापना झाल्यानंतर घाटमार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला आहे. अहमद निजामशहा च्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते, परंतु इतिहासात तसे काही सबळ पुरावे सापडत नाहीत.वांबोरी घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला असावा.किल्ल्याला भेट द्यायला जाण्यासाठी जवळील प्रसिद्ध शहर म्हणजे अहमदनगर आणि वांबोरी गाव! पुण्याहून शिरूर सुपे अहमदनगर करत जवळपास हा किल्ला १४२ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. नाशिक वरून येत असाल तर तळेगाव दिघे, राहुरी करत वांबोरी घाट ओलांडला कि हा मांजरसुभा किल्ला (१४५ किमी अंतरावर) आहे.
किल्ल्यावर प्रवेश करताना
कायम सांगतो त्याप्रमाणे गडावर जाताना जी बाटली आणि खाण्याचे पाकीट जड होत नाही ते येताना देखील जड होऊ देऊ नका.वांबोरी घाटातील पायथ्याच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पुढे घाटातील विहंगम दृश्य अनुभवून आपण मांजरसुभा या आदर्शगावात प्रवेश करतो. मांजरसुभा गावातून डोंगरगण कडे जाणाऱ्या मार्गावर किल्ल्याकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. पुढे शनी मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या आसपास गडाच्या खालच्या तटबंदीचे काही अवशेष सापडतात. काही काळापूर्वी इथे चुन्याचा घाना देखील बघायला मिळत होता परंतु आत्ता तो सध्या तिथे नाहीये. शनी मारुतीच्या पुजारीबुवांना विचारले असता त्यांनी सांगितले कि ते शाळेच्या कामाच्या वेळी गावात घेऊन गेले होते आता तिथेच आहे.गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी वाट चांगली केली आहे त्यामुळे १५ मिनिट मध्ये आपण गडावर सहज पोहोचतो. गडाचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेर २ देवड्या आहेत आणि आत प्रवेश केल्यावर भव्य २ दालने आहेत. या दालनांना प्रकाश येण्यासाठी खिडक्या/झरोके आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला प्रवेशद्वारावर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने आपण प्रवेशद्वारावर जाऊन परिसर न्याहाळू शकतो. प्रवेशद्वाराची रचना हि निजामशाही स्थापत्याचा उत्तम असा नमुना आहे. प्रवेशद्वारातून ९० अंशाच्या कोनातून वळून गडावर प्रवेश करावा लागतो. समोरच आपल्याला एक तुटलेल्या अवस्थेत इमारत बघायला मिळते. या इमारतीत मोठी वास्तू असेल तिथे लाल दगडांचा तळ दिला आहे. कदाचित हा रानीमहाल अथवा खास लोकांची जागा असावी. या इमारतीच्या अगदी समोर प्रचंड मोठा हौद अथवा पाण्याची टाकी आहे. जवळपास ५ ते ६ फुट या टाकीची खोली आहे.राणीमहालाच्या भिंतीच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत. एका दालनात दर्गा आहे. हा दर्गा कोणाचा आहे याविषयी मतभिन्नता आहे. हा निजामशाहीमधील एखाद्या राणीचा दर्गा असावा अथवा एक बाबा तिथे राहायचे असे लोक सांगतात त्यांचा असावा. या दर्ग्याच्या समोर हौदांची रचना आहे त्यात तांब्याच्या पाईपलाईन केलेल्या दिसतात.
तिथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक इमारत बघायला मिळते जी कदाचित बुरुज असावा किंवा पाण्याची मोट. दुमजली इमारत इथे आपल्याला बघायला मिळते ज्यामध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. इमारतीमध्ये खाली आल्यावर आपल्याला तीन बाजूने सर्व परिसर न्याहाळता येतो. इथे मध्ये एक चौरस आकाराचे भगदाड देखील आहे. आता याला बुरुज का म्हणावे तर इथून संपूर्ण वांबोरी घाटावर आणि घाटमार्गावर लक्ष ठेवता येऊ शकते. आता मोट म्हणण्याचे कारण सांगतो, इथे जे भगदाड आहे त्याच्या खाली पाण्याचे टाके आहे. या पाण्याच्या टाक्यामधून मोटेने पाणी वर खेचण्यासाठी या इमारतीचा उपयोग केला जात असावा. या इमारतीच्या अगदी सरळ रेषेत पुढे त्या तलावाच्या बाजूला एक कमानीची रचना आहे त्यामुळे कदाचित ती जागा त्या मोटिशी निगडित असावी.
दुमजली इमारतीपासून पुढे पूर्वेला गेल्यावर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने गडाकडे येतात. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. या पायऱ्यांनी आपण गडाच्या पोटात असणाऱ्या टाक्यांजवळ येऊन पोहोचतो. या टाक्यांची रचना ही खांब टाक्यांसारखी आहे यातील पाचव्या टाकी पर्यंत आपण पोहोचतो परंतु पुढचा मार्ग खडतर असल्याने आपण तिकडे जाणे टाळावे.