काळदुर्ग किल्ला
वसईपासून डहाणू ते तलासरीपर्यंत दुर्गाची एक श्रृंखलाच पाहण्यास मिळते. वसईचा किल्ला, त्याच्या पुढे वज्रगड, कामणदुर्ग, तुंगरेवरचा किल्ला, अर्नाळा किल्ला, विरारचा जिवधन किल्ला, भालवलीचा टकमक, कोहोज, तांदूळवाडी, आसावा, काळदुर्ग, अशेरीगड, सेगवागड हे व यासारखे अनेक गड-किल्ले रांगेत उभे असलेले पाहण्यास मिळतात. या परिसरातले बरेचसे गड-किल्ले पाहून झाले होते. पण यातील काळदुर्ग मात्र सतत हुलकावणी देत होता. काही केल्या काळदुर्ग पाहण्याचे जमत नव्हते. पण एकदाचा तो योग जुळून आला.ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त किल्ले आहेत. इतिहास संकलक आप्पा परब यांच्याकडून अनेकदा ही सर्व माहिती ऐकायला मिळते. त्यांनी नुसते तोंडी सांगितले नाही तर या किल्ल्यांची नावासकट तशी सुचीच मला एकदा सुपूर्द केली. यातील अध्र्यावर किल्ल्यांची माहिती सरकार दरबारीही उपलब्ध नाही. काही किल्ले तर पडझड होऊन नष्ट झालेले आहेत हे आमचे दुर्भाग्य आहे. अशा दुर्गाचा आपण शोध घ्यायला हवा. अशीच एक मोहीम किल्ले काळदुर्गाची करायचं ठरलं. जानेवारीच्या दहा तारखेला शनिवारी आम्ही या गडाचा ट्रेक यशस्वी केला.
शनिवारी सकाळी सात वाजता काळदुर्गाच्या ट्रेकसाठी आम्ही दोघेच संजयच्या चारचाकी वाहनाने विरारहून निघालो. थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरणात मस्त गारवा होता. सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली होती. थंडीमुळे सूर्य नारायणही आळसावले होते. त्यांचे आगमनही अजून झालेले नव्हते. रस्त्यावरही वाहनांची तुरळक रहदारी होती. पंधरा मिनिटातच आम्ही विरार फाटा महामार्ग क्र. ८ ला येऊन पोहोचलो. महामार्गाचे रस्ते चांगले असल्यामुळे अर्ध्या तासातच आम्ही मनोर फाटय़ावर येऊन पोहोचलो. येथून डाव्या हाताला पालघरला जाण्यासाठी गाडी आत घेतली. मनोर फाटा ते पालघर रस्त्याच्या मधोमध वाघोबा िखडीत वाघोबा मंदिराकडे आम्हाला जायचे होते. पण तत्पूर्वी मनोर फाटय़ालगत एका उपाहारगृहात सकाळची न्याहारी आटोपली. सोबत गरमागरम चहाचा आस्वाद घेऊन आम्ही पालघरला जाणा-या मार्गाने वाघोबा खिंडीकडे निघालो.
आता पालघरही बदलू लागलेले दिसत होते. मनोर फाटय़ापासून पालघरला जाणा-या मार्गाच्या दोन्ही बाजूंना लहान-मोठे उद्योगधंदे, कारखाने उभे राहिलेले दिसत होते. त्यामुळे ठिकठिकाणी माणसांची प्रचंड वस्ती वाढलेली दिसत होती. जंगल कटाई होऊन निसर्गाची मोठी हानी झालेली दिसत होती. रहदारीही वाढल्यामुळे मासवण धरणाच्या जुन्या पुलाशेजारीच नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरू होते. त्याचे काम जवळ संपतच आले होते. मासवणच्या पुढे मात्र दोन्ही हाताला हिरवे घनदाट जंगल पाहण्यास मिळते. दोन्ही हाताला डोंगराच्या मधोमध वाघोबा खिंडीचे सौंदर्य मात्र अप्रतिम आहे. शासनाने येथे या िखडीच्या एका वळणावर निसर्गप्रेमींसाठी तसा फलकही लावलेला आहे. खिंड पार करून जरा पुढे येताच रस्त्यालगतच डाव्या हाताला सुंदर वाघोबा मंदिर पाहण्यास मिळते. वाघोबा मंदिरात जाऊन नारळ फोडून काळदुर्ग गडावर जाताना या मंदिरात वाघोबाला नारळ फोडूनच गडावर जाण्याचा प्रघात आहे. गड तसा गच्च वनराईने सजलेला होता. गडावर जाताना वाट चुकू नये म्हणून उपाहारगृहाच्या मालकीण बाईंच्या तरुण मुलाला राजेंद्र शेट्टीला आमच्या सोबत घेऊन आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.काळदुर्ग गडावर जाणारी वाट ही वाघोबा मंदिराच्या शेजारी हातपंपाच्या पाठीमागूनच सुरू होते. गडावर जाण्यासाठी सुरुवातीस कोणीतरी आठ-दहा दगड, मातीच्या पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. काळदुर्गावर जाण्यासाठी छोटय़ा तीन टेकडय़ा पार कराव्या लागतात. सर्वत्र गच्च रान दाटलेले आहे. बरीच मोठमोठी झाडे, गच्च झुडुपे, दाट वेली ठिकठिकाणी पाहण्यास मिळतात. कारवीचे रान तर एवढे गच्च आहे की ते पाहून नवख्या किंवा एकटय़ा ट्रेकरला येथे यायची हिम्मत होणार नाही. आणि कोणी अशी हिम्मत करूही नये. कारण हे रान श्वापदांनी भरलेले आहे.
गडाच्या सुरुवातीपासूनच दाट रानाला सुरुवात होते ते गडाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घनदाट जंगल पाहण्यास मिळते. आमच्या गाईडला राजेंद्रला या गडाची चांगलीच माहिती होती. जरा कुठे खसखस झाली तरी तो आम्हाला शांत राहण्यास सांगून काही दिसते का, ते पाहण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळा त्याने असेच झाडीत लपलेले कोंबडीच्या आकाराचे पक्षी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ते पक्षी एवढे चपळ होते की त्यांचे आम्हाला फक्त ओझरतेच दर्शन झाले. बाहेर सर्रास पाहायला मिळते तशी जंगलतोड येथे पाहायला मिळाली नाही. गडावर जाणारी पायवाट मळलेली व नित्याचीच आहे. पण काही ठिकाणी मात्र गडावर जाणा-या वाटेसोबत इतरही वाटा फुटलेल्या दिसतात. त्यामुळे गडावर जाणारी मुख्य वाट कोणती हे कळत नाही व वाट चुकण्याची शक्यता निर्माण होते.गडावर चढते समयी फक्त दोन वेळाच आम्हाला मोकळा काळा कातळ पाहण्यास मिळाला. येथूनच आम्हाला मोकळे आकाशदर्शन व काळदुर्गाच्या शिखराचे दर्शन झाले. अन्यथा मोकळे आकाशदर्शन दुर्लभ आहे. गडाच्या शेवटच्या दोन टप्प्यांची चढण मात्र खूप अवघड आहे. वाट निमुळती असून निसरडी आहे. वाटेवर बारीक वाळू पसरलेली आहे. सभोवती घनदाट जंगल आहे पण येथे आधारासाठी गवतही शोधून सापडत नाही. त्यातच उजव्या हाताला खोल दरी. जरा पाय निसटला तर घरंगळत सरळ खाली धरणीच्या दरीच्या पोटात गडप होण्याची शक्यता आहे.
निसर्गाची मजा लुटत जंगलाचा आनंद घेत, झाडाझुडुपांची माहिती घेत दीड तासाची चढण चढून एकदाचे आम्ही गडाच्या मुख्य शिखरापाशी येऊन पोहोचलो. अवघड मार्ग पार करत आम्ही गडाच्या जवळ पोहोचताच आम्हाला गडाच्या उजव्या हाताला जरा खाली पाण्याचे टाक पाहण्यास मिळाले. येथे गड आहे हे सांगणाऱ्या दोनच वास्तू या दुर्लक्षित गडावर पाहण्यास मिळतात. एक म्हणजे पाण्याचे टाक व दुसरे म्हणजे काही ठिकाणी खडकातच खोदून काढलेल्या दगडी पायऱ्या. गडाचे पुरातन वैभव पाण्याचे टाक पाहून आमच्या आनंदास पारावार राहिला नाही. या टाकातले पाणी मात्र अतिशय खराब झालेले होते. पाण्यात सर्वत्र शेवाळ पसरलेले होते. त्यातच इतरही कचरा साठलेला होता. हे पाण्याचे टाक इतक्या अवघड जागेत खोदून काढलेले होते की तेथे जाण्यास मार्गच नव्हता. टाकाच्या खाली सरळ खोल दरी होती.दुरूनच दर्शन घेऊन आम्ही चार, पाच पावलातच गड माथ्यावर प्रवेश केला. येथे सर्वत्र काळा कातळ होता. अजिबात झाडी नव्हती. डाव्या हाताला अजून एक छोटा उंचवटा होता. त्यावर चढण्यासाठी दगडातच तीन दगडी पाय-या खोदून काढलेल्या होत्या. या पायऱ्या चढून आम्ही काळदुर्गाच्या सर्वोच्च शिखरावर येऊन पोहोचलो. वर मोकळे आकाश, सभोवताली दूरवर पसरलेले दाट जंगल, त्याही पुढे पालघर शहर स्पष्ट दिसत होते. येथे भन्नाट गार वारा अंगाला मोहरून टाकत होता. येथून पूर्वेला असणारा कोहोजचा किल्ला तर उत्तर दिशेस असणारा आसावा किल्ला, अशेरी व अडसूळचा किल्ला नुसत्या नजरेने ठळकपणे दिसत होते. तसेच गडाच्या खाली उत्तर दिशेस देवखोप पाण्याच्या धरणाचे विहंगम दृष्य दिसते. जर वातावरण ढगाळ नसेल तर दक्षिणेला असणारा तांदूळवाडीचा किल्ला, पूर्वेचा टकमकचा किल्ला स्पष्टपणे पाहता येतो. येथून आम्ही बरेच छायाचित्रण केले. सोबत आणलेल्या भगव्या ध्वजांचे ध्वजारोहण केले. येथेही कातळाच्या मधोमध पाण्याचे टाक खोदलेले पाहण्यास मिळते पण काळाच्या ओघात टाकात पाणी राहात नाही, त्यामुळे टाक पूर्णपणे कोरडे होते.
काळदुर्गाच्या माथ्यावर थोडा वेळ थांबून आम्ही खाली उतरून उत्तर दिशेच्या कातळ कडय़ावर जाण्यास निघालो. पाहतो तर मुख्य शिखराच्या खालून कडेकडेने एक पाऊलवाट पूर्व दिशेस शिखराच्या मागे जात होती. आम्ही कुतूहलापोटी त्या वाटेने पुढे आठ-दहा पावले जातो न जातो तोच आमच्यासमोर एक आयताकृती भलेमोठे पाण्याचे टाक दृष्टीस पडले. त्याला जोडून अजून एक चतुष्कोनी आकाराचे टाक पाहण्यास मिळाले. या टाकात थोडेफार पाणी शिल्लक होते. टाकात सर्वत्र मेठमोठे दगड पडून टाक उद्ध्वस्त झालेले आहे. येथून आमच्या गाईडने आम्हाला गडाच्या पूर्वेस गडाच्या खाली उतरण्यास सांगितले. ही वाटही भरगच्च जंगलातून अवघड अशी निसरडी वाट होती. पंधरा मिनिटांत गड उतरून खाली येताच आम्ही कारवीच्या पर्णकुटीवजा झोपडीसारख्या दिसणाऱ्या मंदिरात येऊन पोहोचलो. या मंदिराच्या चहुबाजूंनी वाटोळे दगड रचून मंदिराची सीमा आखली होती. मधोमध भंग पाऊन झिजलेली नंदीची, नागाची मूर्ती व शिवपिंड पाहण्यास मिळते.तसेच माझ्या मते विरगळाचे काही झिजलेले दगड रचून ठेवलेले आहेत. या स्थानाला स्थानिक गावकरी मेघदेवता असे म्हणतात. जर पाऊस पडण्यास उशीर झाला किंवा दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली तर सभोवतालच्या गवातील आदिवासी येथे येऊन पाऊस पडेपर्यंत राहून देवाची भक्ती करतात. येथे थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा गड चढून वर आलो. थोडी पोटपूजा करून विसावा घेतला. विसावा आटोपताच गड उतरण्यास सुरुवात केली. दुपारी तीन वाजता सुखरूप गड उतरून खाली आलो. थोडा वेळ वाघोबा मंदिरात विश्राम करून परतीच्या प्रवासाला लागलो तेव्हा मनात एकच समाधान होते की आज काळदुर्ग सर करून या परिसरातले माझे सगळे गड पाहून झाले. वाईट एवढेच वाटते की आज या गडाचा काहीच इतिहास उपलब्ध नाही.