कलानिधीगड
कलानिधी गड, कलानंदीगड किंवी काळानंदीगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूर पासून १४० कि. मी. व बेळगांव पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. हा किल्ला काळ्या पाषाणाचा असून तो एका नंदी प्रमाणे दिसतो म्हणून यास काळानंदी गड असे नाव पडले. शिवाजी महाराजांनी गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला आहे. आजही या गडावर तटबंदी व गोमुखी दरवाजा चांगल्या स्वरुपात असून गडावर भवानी मंदिर ,सदर, दारु कोठार, शौचकुप, पाण्याची टाकी इ. वस्तु पहावयास मिळतात.विशेष उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु. ल. देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.
पहाण्याची ठिकाणे
कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे व उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. दरवाज्यासमोर डाव्या बाजूला आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात. यातच दोन मंदिरे आहेत. पहिल्या मंदिरात शिवलिंग असून, त्यामागे भैरवाची मुर्ती आहे. दुसऱ्या मंदिरात गडाची अधिष्ठाता भवानी देवीची लहान परंतु सुबक व शस्त्रसज्ज मुर्ती आहे. या मंदिराच्या दारात वेगळया शैलीतील गणेशाची कलात्मक मुर्ती आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायऱ्यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली आहे, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायऱ्या, देवळया व चौथरे इत्यादी दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली दिसते. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच मनोहारी दृष्य दिसते. दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.