गोरखगड
गोरखगड किंवा °गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरुन गोरखगड असे ठेवण्यात आले आहे.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. म्हसा या गावाजवळ असलेले मच्छिंद्र गड आणि गोरक्षगड हे जोडकिल्ले आहेत. २१३५ फूट उंची असलेल्या गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते.खोदलेली शिल्पे, पाण्याची टाकी, विहीर, शिलालेख, भुयारी जिने अशा गोष्टी आपल्याला किल्ल्यावर पहायला मिळतात. निसर्गसंपन्न दऱ्या आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतो.गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवार्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर वर तीन पाण्याची टाकं लागतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पायर्यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत. पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणार्या वाटेने पुढे जावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पायर्या खोदलेल्या आहेत. ५० पायर्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चढावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो.