गंभीरगड
ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेक गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठय़ा दिमाखात उभा आहे.येथील कातळकडय़ावर एक विवर दिसते. ते खूप खोल आहे, असे गावकरी सांगतात. त्याबाबत एक लोककथा या भागात प्रचलित आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत दुसऱ्यांदा लुटली तेव्हा परतीच्या प्रवासात महाराज गंभीरगडाजवळ आले होते. तेव्हा शत्रू पाठलागावर आला. जवळ असलेली संपत्ती घोडय़ांवर, खेचरांवर, बैलांवर लादलेली होती. त्यामुळे महाराजांना चटकन वेगाने हालचाल करता येईना, म्हणून महाराजांनी त्या संपत्तीचा काही भाग या विवरामध्ये टाकला आणि त्या धोकादायक परिस्थितीमधून सहीसलामत निसटले.पुढे महाराजांना पुन्हा गंभीरगडावर येवून ती संपत्ती नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. या संपत्तीचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी अयशस्वी प्रयत्न केले.
पाहण्यासारखे
व्याहाळीकडून गंभीरगडाचे दर्शन चांगले होते. गडाचा कातळमाथा आपले लक्ष वेधून घेतो. कातळमाथ्याचे दोन भाग दिसतात. डावीकडील म्हणजे पश्चिमेकडील माथ्यावर सुळक्यासारखे स्तंभ उभे राहिलेले दिसतात. तर पश्चिमेकडे सलग कातळमाथा दृष्टीस पडतो. या माथ्यांच्या मध्यावरचा दांड पकडून त्यावरील वाटेने गड चढावा लागतो. या दांडाने ३५ ते ४० मिनिटांमध्ये आपण तटबंदीपाशी येवून पोहोचतो. तटबंदी ओलांडल्यावर उजवीकडील कातळमाथ्याच्या पायथ्याला जाता येते. वाटेजवळ लहानसे मंदिर आहे. हे चांदमाता देवीचे मंदिर आहे. कडय़ाच्या पोटात पाण्याची टाकी कोरलेली आहेत. तीन पैकी दोन टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्यावर गडाच्या गडपणाच्या खाणाखुणा तुरळक प्रमाणात आहेत. कातळकडय़ाच्या माथ्यावर चढल्यावर दूरपर्यंतचा प्रदेश पहायला मिळतो. माथ्यावर गडाची देवी जारवमाता आहे. तिचे दर्शन घेवून सभोवार नजर फिरवली की निसर्गाची रौद्रता मनात धाक भरविते. गडाच्या पश्चिमेकडील असिताष्म प्रकारचे स्तंभ उत्तम दिसतात.गडावरून सिल्व्हासाचे दर्शन चांगले होते. पूर्वेकडे जव्हार, भास्कर, उतवड, हर्षगड ही दिसतात. पश्चिमेकडे तलासरी पासून समुद्रापर्यंतचा भाग दृष्टीपथात सामावतो. गडावर दोन तोफांही आहेत.
गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अमदावाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक्याचे पूर्व आणि पश्चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात गंभीरगडाचा गिरीदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंचीच्या गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका-कासा-सायवानमार्गे येवून गडूचा पाडा या छोटय़ाशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो.गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी मधून जाणारा मार्ग धोपटमार्ग असून चढाईही सोपी आहे. गडाच्या पश्चिमेकडूनही एक वाट आहे. ती जंगलामधून असून चढाईही तुलनेत जादा आहे. मात्र व्याहाळीची वाट सोयीची आहे.