धारावी काळा किल्ला(Dharavi Black Fort)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

धारावी काळा किल्ला

‘धारावी’ आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी. या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासिक किल्ला आपलं लक्ष वेधून घेतो.इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव ‘फोर्ट रिवा किंवा रेवा’ असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला ‘काळा किल्ला’ या नांवानेच ओळखला जातो. या इतिहास पुरुषाचं आजचं वय वर्ष २८० मात्र धारावीच्या ‘महाराष्ट्र निसर्ग उद्याना’च्या समोर ‘बीईएसटी’चे धारावी व काळा किल्ला असे शेजारी शेजारी दोन बस डेपो आहेत. या बस डेपोच्या पूर्वेकडील भिंतीला अगदी लागून हा ‘काळा किल्ला’ उभा आहे. बस डेपोच्या उगवतीच्या दिशेच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या तीन-चार फुटाच्या पॅसेजमधून थेट या किल्ल्याकडे जायला वाट आहे.

हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आत प्रवेश करण्यासाठी याला दरवाजा नाही. आता मुळात दरवाजाच नव्हता की आजुबाजूला पडलेल्या झोपड्यांच्या गराड्यात याचा दरवाजा गायब झाला हे समजण्यास मार्ग नाही. पण किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास शिडीवरून अथवा एके ठिकाणी तुटलेल्या तटबंदीवरून आंत प्रवेश करता येतो.किल्ल्याची तटबंदी मूळची अती मजबूत असल्याने अजून शाबूत आहे. तटबंदीच्या दर्शनी भागावर “सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला” अशी दगडात कोरलेली पाटी असून सदर मजकुराखाली ‘इंजिनिअर’ म्हणून कोणाची तरी आद्याक्षरे कोरलेली आहेत.

किल्ल्याची तटबंदी व वरील तोफा रोखण्याच्या जागा अजुनही सुरक्षित आहेत. किल्ल्याच्या आतील भागाचे फोटो काढण्यासाठी आम्ही किल्ल्याला लागून अभ्या असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेलो. वरुनही किल्ला झोपड्यांच्या व झाडांच्या गराड्यात हरवून गेला होता. वरुन दिसणारा किल्ल्याचा बाणाच्या फाळासारखा आकार लक्षात येत होता.इमारतीच्या गच्चीवरून समोर उत्तरेला मिठी नदीचे पात्र, पश्चिम दिशेला काही अंतरावर असलेला माहीमचा किल्ला आणि पूर्वेच्या टेकडीवरचा सायनचा किल्ला अस्पष्टसा दिसत होता. सायन ते माहीमच्या दरम्यान मिठी नदी (माहीमची खाडी) पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने वाहते. एके काळी या मिठी नदीचं पात्र विस्तीर्ण असून ते या काळ्या किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत होतं अशी इतिहासात नोंद आहे. धारावी बस डेपो, डेपोपलीकडील मोठा रस्ता व निसर्ग उद्यान या सगळ्या आजच्या काळातील गोष्टी मिठी नदीच्या पात्रात भरणी टाकून केलेल्या आहेत हे त्या इमारतीच्या गच्चीवरून बघताना सहज लक्षात येत होतं.’काळा किल्ला’ मिठी नदीच्या दक्षिण तिरावर असून माहीमचा किल्ला मिठी नदी समुद्रास जिथे मिळते त्या ठिकाणी आहे तर पूर्वेचा सायनचा किल्ला याच मिठी नदीच्या दक्षिण तटावर सायनच्या टेकडीवर उभा आहे. हे तिन्ही किल्ले ‘ब्रिटीश मुंबई’च्या उत्तर सीमेचे खंदे रखवालदार होते.

ब्रिटीशांच्या ताब्यात तेव्हा मिठीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन पर्यंतचा इलाखा होता तर मिठीच्या उत्तर तीरापलीकडील प्रदेश, ‘साष्टी’ इलाखा, म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण इत्यादी पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. पोर्तुगिजांनी त्यांच्या ताब्यातील भूभागाचे सागरी शत्रूंपासून रक्षण व्हावे या हेतूने वांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावर (आताच्या ‘ताज लॅण्ड्स एंड’ किंवा ‘हॉटेल सी रॉक’ येथे) बांधलेला ‘केस्टेला डी अग्वादा’ अगदी आजही बघता येतो.या लेखाचा विषय असलेला ‘काळा किल्ला’ ब्रिटीशांनी इसवी सन १७३७ मध्ये बांधला हे आपण सुरुवातीस पाहिले. सन १७३७ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी इलाखा छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीची प्रचंड दहशत मनात बसलेल्या ब्रिटीशांना आपल्या मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबईचे इलाख्याचे रक्षण करण्यासाठी माहीम व सायन यांच्या मध्यावर एक किल्ला बांधण्याची निकड वाटली आणि त्यातून या किल्ल्याची निर्मिती झाली. एका अर्थाने ‘काळा किल्ला’ मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतिक आहे असे म्हटले तर चुकणार नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu