शिरपुंज्याचा भैरवगड
इतिहास
इतिहास लिहिणारे या गडाविषयी काही बोलत नाही, परंतु या गडावर असणारे असंख्य पाण्याचे टाके, तटबंदी आणि धान्यकोठार या सर्वाना बघून तर नक्की हाच निष्कर्ष निघतो की गडावर खूप जास्त प्रमाणात भूतकाळात वावर नक्की असेल. भैरवगडाच्या काही अंतरावर असलेल्या कुंजरगडावर सुरतेच्या मोहिमेनंतर काही काळासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतली होती, हे इतिहासात आढळते. आणी महाराज कधीही सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नव्हते त्यामुळे त्या काळात हा गड नक्कीच स्वराज्याच्या अधिपत्यात असेल.महाराष्ट्रात भैरवगड या नावाने ओळखले जाणारे तब्बल पाच किल्ले आहेत. यातील एक आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात, दुसरा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील, तिसरा आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जवळजवळच तर दोन भैरवगड आहेत, एक कोथळ्याचा भैरवगड तर दुसरा शिरपुंज्याचा भैरवगड! खूप लोकांच्या मनात प्रश्न येतच असतो की यांतील सरस असा गड कोणता? याच उत्तर एकच माझ्या महाराष्ट्रातील सह्याद्रीतील प्रत्येक गड एका-वरचढ एक आहेत आणि आप आपल्या जागेवर ते श्रेष्ठच आहेत.
किल्ल्यावर प्रवेश करताना
किल्ल्यावर चढायला वेळ जास्त लागतो आणि मध्ये काही पाणी तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे गडावर पोहोचेपर्यंत पुरेल इतके पाणी सोबत घेऊन जावे.
भैरवगड म्हणजेच घनचक्कर पठारातील डोंगररांगेतील एक बुलंद आणि बेलाग असा किल्ला, कातळकोरीव गुहा, थंडगार पिण्याच्या पाण्याचे टाके आणि इतर असंख्य असे टाके, तटबंदी, पायऱ्यांचा कोरीव मार्ग, मंदिर आणि त्यातील रेखीव मूर्ती आणि सोबतीला विरगळ गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत जसे आपण गडावर कसे जाल यात बघितले की पायथ्याची दोन गावे आहेत एक आंबित आणि दुसरे म्हणजे शिरपुंजे होय.शिरपुंजे गावातून प्रवासाला आपन्न सुरुवात करूयात आणि आंबित मधून कसे याल हे पण जाणून घेऊयात. शिरपुंज्यातून जायचे असेल तर आपल्याला गड पायथ्यालाच एक बांधीव कमान लागते. गडावरील भैरवनाथाच्या देवस्थान समितीने हि कमान उभारली आहे.या कमानीतून आपण वर जात एका खिंडीत पोहोचतो. हि खिंड म्हणजे एका बाजूला घनचक्कर पठार आणि एका बाजूला भैरवगड यांच्या मध्ये निर्माण झालेली घळ होय.आता याच ठिकाणी आपण याच खिंडीमध्ये आंबित गावातून येणाऱ्या मार्गाने पोहोचू शकतो. आंबित गावातून साधारणतः अर्ध्या तासाच्या पायपिटी नंतर भैरवगडाचा पायथा लागतो. आपल्याला या प्रवासात काहीसा डोंगर चढ चढून,हिरव्यागार देवराई मधून पुढे राजूर-कुमशेत हा डांबरी रस्ता ओलांडून गडाच्या पायथ्याला पोहोचतो. काही १५ मिनिटाच्या काळात एक डोंगराचा भाग चढत आपण खिंडीमधून ओघळलेल्या घळीच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. हरिश्चंद्रगड जर कधी नळीच्या वाटेने केला असेल तर त्याची आठवण येथे नक्की होते.आता आपण हे ओबड-धोबड दगडांचा मार्ग पार करत कातळ कोरीव पायर्यांजवळ येऊन पोहोचतो. या पायऱ्या चढून आपण भैरवगडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर पोहोचन्या अगोदर आपल्याला गडाच्या कडेने जावे लागते तेथे संरक्षण कठडे बसवले आहेत. गडावर पोहोचताच आपल्याला उत्तराभिमुख असा पडलेल्या अवस्थेतील दरवाजा पाहायला मिळतो आणि गडाला बऱ्याच बाजूने तटबंदी केलेली होती तिचे अवशेष देखील पाहायला मिळतात. गडावर गेल्यावर गडाची एकूण व्याप्ती आपल्याला लक्षात येते. पूर्व-पश्चिम पसरलेला हा भैरवगड जवळपास ७ एकराच्या परिसरात आहे.
गडावर मळलेल्या पायवाटेने पुढे जाताना आपल्याला ४ पाण्याची टाकी पाहायला मिळतात. यातील पाणी उपस्या अभावी पिण्यायोग्य नाहीये. पुढे गेल्यावर एका ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला एक गुहारूपी पाण्याचे टाके दिसेल, त्यावर पाणी असे लिहिलेले आहे या टाक्यातील पाणी खूप थंडगार तर आहेच परंतु त्याची चव देखील उत्तम आहे. टाक्याच्या वरच्या बाजूने चारही बाजूने चर खोडून टाक्यात पाणी झिरपण्याची व्यवस्था केलेली आहे व वरच्या बाजूने आपण रांजणखळगी देखील बघू शकता.हे टाके खांब टाके या प्रकारातील आहे.आणि याच्या खांबाची रचना ही खरच बघण्यायोग्य आहे.
आपण इथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला एका बाजूला ४ तर दुसर्या बाजूला 5 अशी एकूण नऊ पाण्याची टाकी लागतात. याच टाक्यांच्या पुढे एक गुहा देखील लागते ती कदाचित धान्यकोठार असू शकेल असा अंदाज व्यक्त केल जातो. गुहेच्या दरवाजासमोर आपल्याला जंग्यासारखे एक छिद्र पाहायला मिळते.पुढे आपण जमिनीच्या खाली कातळात कोरलेल्या भैरवनाथाचे दर्शन घ्यायचे.बऱ्याच ऐतिहासिक गड भ्रमंती पुस्तकांत या गडावरील देवाच्या मूर्तीला खंडोबा म्हणले आहे. परंतु हि मूर्ती खंडोबाची नसून हि भैरवनाथाची ६ फुट उंच सुंदर रंगवलेली कातळकोरीव मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मूर्तीचे दर्शन घेऊन शेजारची दुसरी गुहा बघायची, याच गुहे मध्ये भटक्यांची राहण्याची सोय होऊ शकते. इतकच नाही तर इथे जेवण बनवण्यासाठी भांडे व चूल देखील आपल्याला मिळेल.आता आपण गडाच्या बालेकिल्ल्याकडे जायला निघायचे. समोर वाटेत आपल्याला दोन विरगळ लागतात आणि या अवाढव्य विरगळ कोणाच्या आहेत याची माहिती कोठेही नाहीये. इथेच गणेशाची मूर्ती आणि इतर शेंदूर लावलेले दगड बघायला मिळतील.गडाच्या बालेकिल्ल्यावर म्हणजेच माथ्यावर आपल्याला काही घरांचे चौथरे आणि तटबंदी बघायला मिळते. वाटेत एक गुहा आपल्याला लागते, हि गुहाच आहे पाण्याची टाके नाहीये. सध्या पाणी साचलेले असले तरी हि गुहाच आहे. इथली खांबांची रचना आणि नक्षीकाम बघण्यासारखे आहे. हे सर्व बघून आपण परतीच्या मार्गाला लागायचे.गडफेरी पूर्ण करायला सरासरी एक तास पुरेसा असतो.