बहादूरगड
बहादूरगड उर्फ पेडगावचा किल्ला उर्फ धर्मवीर गड हा भूईकोट किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आहे . अष्टविनायकापैकी सिध्दटेक पासून केवळ ९ किलोमीटरवर असलेला हा सुंदर किल्ला केवळ आडबाजूला असल्यामुळे उपेक्षेचा धनी झालेला आहे . किल्ल्यावर पाहाण्यासारख्या अनेक वास्तू आणि मंदिरे आहेत. किल्ल्यावरेल पाणीपुरवठा योजनाही पाहाण्यासारखी आहे.शिवदुर्ग संस्था आनि पेडगाव ग्रामस्थांनी मिळून किल्ल्याची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. गडावर दोन गडपाल नेमलेले आहेत ते गडाची साफ़सफ़ाई, सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडांची निगा राखणे, विध्वंसक पर्यटकांकडून होणारे गडाचे नुकसान रोखणे इत्यादी कामे करतात. किल्ल्यातील रस्ते आणि पायवाटा दगड लावून आखीव रेखीव बनवलेल्या आहेत.हा किल्ला पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भिमा नदीच्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर आहे. पेडगाव या गावात हा किल्ला आहे.
इतिहास
पेडगावचा भूईकोट किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात अस्तित्वात होती. किल्ल्यातील शिवमंदिर त्याची साक्ष देत आजही उभी आहेत. यादवांकडून किल्ला निजामशाहाच्या ताब्यात गेला. निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश हा औरंगजेबाचा दुध भाऊ होता. दक्षिणेचा सुभेदार असतांना त्याचा तळ पेडगावला होता. त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडूजी करुन या किल्ल्याचे नाव बहादूरगड ठेवले. इसवीसन १६७४ मध्ये बहादुरगडावर २०० अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छ. शिवाजी महाराजांना मिळाली. त्यांनी गमिनी कावा या युध्दतंत्राचा सुयोग्य वापर करुन गडावर हल्ला करण्याची योजना आखली. या मोहिमेचा प्रमुखाने सैन्याचे दोन भाग केले. सैन्याची एक तुकडी भल्या सकाळी बहादूरगडावर चालून गेली. बहदूरखानाने पेडगावातले मोगल सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर चालून गेला. थोडावेळ हातघाईची लढाई झाल्यावर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले. मराठे पळत आहेत हे पाहून मुघल सैन्याला चेव आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगाव पासून जवळजवळ २५ कोस लांब नेले. अशा प्रकारे किल्ल्यातल्या मोगल सैन्याचे मराठ्यांनी दोन भाग केले. मोगल सैन्य लांब गेल्याची खात्री झाल्यावर मराठ्यांच्या सैन्याच्या दुसर्या मोठ्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्यातील घोडे,. खजिना आणि सामान घेउन पोबारा केला. किल्ल्यातेल तंबू जाळून टाकले
पाहण्याची ठिकाणे
हा किल्ला आयताकृती आकाराचा आहे. या किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे तर नदीच्या दिशेला असलेला दरवाजा मोडकळीस आलेला आहे. किल्ल्याच्या आत ५ फूट (१.५ मी) उंचीचा हनुमानाचा पुतळा आहे. या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या ५ मंदिरांचा गट आहे. हेमाडपंती मंदिरे बालेश्वर, लक्ष्मी-नारायण, मल्लिकार्जुन, रामेश्वर आणि भैरवनाथ यांची आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक वीर दगड, सतीगल, तोफांचे गोळे, दीपमाळ आणि शिव मूर्ती आहेत.