अर्नाळा किल्ला
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास खूप जुना आहे. अनेक ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये किल्ले आणि गड यांचा उल्लेख केलेला आढळतो. महाराष्ट्रातील काही किल्ले हे अतिप्राचीन आहे. या किल्ल्यांचा इतिहास सुद्धा खूप रंजक आहे. यामध्ये किल्ल्याची उभारणी प्रामुख्याने संरक्षणासाठी व आपल्या अखत्यारीतील प्रदेशाच्या रक्षणासाठी केल्याची माहिती मिळते. वेदांमध्ये किल्ल्यांचा उल्लेख ‘पूर’ या नावाने केलेला आढळतो. त्यावेळी किल्ले होते हे या वरून स्पष्ट होते. रामायण कालखंडात रावणाच्या लंकेच्या वर्णना मध्ये तटबंदीचे,बुरुजांचे व वेशींचे वर्णन आलेले आहेत. तटबंदी, बुरुज हे प्रामुख्याने किल्ल्यावर आढळतात. म्हणून त्याकाळी सुद्धा किल्ले अस्तित्वात होते याचा बोध होतो.
महाभारतात ‘कूट’ युद्धाच्या वर्णनांत किल्ल्यांचे महत्त्व आणि उपयोग सांगण्यात आले आहे. राजाने प्रथम आपल्या मुख्य दुर्गाचा आश्रय घ्यावा, राज्यातील इतरत्र असणाऱ्या श्रीमंत लोकांना किल्ल्यात आणून ठेवावे, तेथे फौजांचे पहारे ठेवावेत आणि किल्ल्यांच्या आजूबाजूचे जंगल साप ठेवावे. किल्ल्यातील टेहळणीच्या जागा ह्या उंच ठिकाणी असाव्यात अशाप्रकारे महाभारताच्या शीतपर्वामध्ये द्वारकेच्या तटबंदीचे वर्णन केलेले आढळते. महाराष्ट्रात असलेल्या अनेक किल्ल्यामध्ये आज जलदुर्ग, गिरीदुर्ग, वनदुर्ग किल्ल्याचे प्रकार अढळतात. प्रदेशाच्या सरंक्षणासाठी उभारण्यात आलेले हे किल्ले त्या त्या भूभागातील परिस्थितीला अनुरूप बांधलेले आहेत. शिवकालीन इतिहासामधे किल्ल्यांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले. किल्ल्यांचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली. याच काळात महाराजांनी अनेक जुने किल्ले यांचे पुनरुज्जीवन केले,नवीन किल्ले बांधले,सुस्थितीत असलेले किल्ले जोपासले. अनेक ठिकाणी नवीन किल्ल्याची उभारणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात ३६० किल्ले असल्याची नोंद आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि महाराजांनी तोरणा किल्ल्याचा ताबा घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. राजगड हा किल्ला महाराजांचा राजधानी म्हणून घोषणा करण्यात आली. महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर दुर्गम अशा रायगड या किल्ल्याची बांधणी करून तेथेच राज्यभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले, किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समीकरण जनसामान्यांमध्ये रूढ झालेले होते. म्हणून किल्ले हे महाराष्ट्राचे भूषण आहेत, नव्हे तर महाराष्ट्राची शान आहे असे आपल्याला म्हणता येईल.महाराष्ट्रात नांदलेल्या अनेक राजवटीमध्ये किल्ले उभारण्यात आले आहे. परंतु सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे महत्व जाणून त्यांची पूरबांधणी व निर्माण करण्याचे काम हाती घेतले. म्हणून या किल्ल्यांचा स्वराज्य स्थापनेमध्ये मोठा वाटा राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा सातवाहन, वाकाटक, चालुक्य, सौंद्री, बहमनी, मोगल, आदिलशहा, इत्यादींनी त्यांच्या राजवटीमध्ये किल्ल्यांचे बांधकाम केलेले इतिहासामध्ये नोंद आहे. म्हणून महाराष्ट्राला किल्ल्याचे संग्रह म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गडावरील ठिकाणे
अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ हेक्टर असून, तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:
‘बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!
या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा (की मलिक तुघाण) आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरूज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानीमातेची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगड पायऱ्याआहेत. तळ्यातले पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी, तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत.किल्ल्याच्या सभोवार तीन-चार हजार मुख्यत: कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.