अंतुरचा किल्ला
इतिहास
अंतुरचा किल्ला पंधराव्या शतकात कुणा एका मराठा सरदाराने बांधल्याचे सांगितले जाते. परिसरातील इतर किल्ल्यांप्रमाणे अंतुर किल्ल्यांच्या निर्मितीबद्दल ही आपल्याला ह्याहून अधिक माहिती मिळत नाही. नागापूरहून येताना दिसणाऱ्या दगडी खांबावरील दिशादर्शक फारशी शिलालेख, किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजावरील मलिक अंबरचा लेख आणि मशिदीवरील शिलालेख सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला अहमद नगरच्या निजामशाही राज्यात किल्ला होता हे दर्शवितात. पुढे अंतुरजवळ मुघल सरदार दिलेरखान आणि मराठे ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतुरवरील मुघल आणि पुढे हैदराबादच्या निझामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इसवी सन १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटीयरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. ह्या नोंदीनुसार इसवी सन १८२०च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटीश आणि निझामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतुरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुघल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.
स्थापत्य रचना
सर्व बाजूंनी डोंगराच्या नैसर्गिक उभ्या कातळामुळे ह्या गिरीदुर्गाला भक्कम संरक्षण लाभले आहे. काही ठिकाणी हा कातळ मानवनिर्मित असावा असेही लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात उभी आहे. नागापुरकडून गाडी मार्गाने आले की तिहेरी तटबंदीने अभेद्य झालेला गोलाकार बुरुज आपल्याला दिसतो. डोंगर रांगेतून किल्ल्याला वेगळे करण्यासाठी खिंड खोदून त्यावर हा बुरुज बांधलेला आहे. मुख्य दरवाज्याकडे जाणारी वाट ह्या बुरुजाच्या उजव्या अंगाने जाते. एकमेकांशी काटकोन साधणारे तीन दरवाजे आणि त्या अनुषंगाने वळणावळणाने जाणारा मार्ग किल्ल्याच्या संरक्षण रचनेचा भाग आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरुज आहे तोफा ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते.
प्रवेशाचा मार्ग चढून वर आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बंदिस्त तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला एक कमानीची बांधणी आहे. तलावाच्या उत्तरेला इमारतींचे अवशेष दिसतात. त्यांचे घुमटाकार छत १५-१६व्या शतकातील निझामकालीन वास्तुशैलींशी साधर्म्य दाखवते. किल्ल्यावरील तलावाच्या शेजारील मशीद, दर्गाह व काही थडगी अशा धार्मिक इमारती आहेत. किल्ल्यात प्रवेशापूर्वी ज्या मोठ्या बुरुजाला फेरी मारून आपण दरवाज्याकडे मार्गस्थ होतो त्या बुरुजावर जाण्यासाठी मार्गावर जाताना तळघर असलेल्या इमारतीचे अवशेष आणि एक भव्य दरवाजा पाहायला मिळतो. दक्षिणेच्या ह्या बुरुजामध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि एक पीराचा दर्गाह आहे.त्याकाळी किल्ल्यावरील पाण्याची गरज मोठा तलाव आणि किल्ल्याच्या डाव्या अंगाला असलेली पाण्याची टाकी भागवत असणार. अनेक इमारतींचे आणि संरक्षण रचनेचे अवशेष इतक्या मोठ्या प्रमाणावर अजूनही अंगावर बाळगून असणारा ह्या किल्ल्याला अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील दुर्गराज असे म्हणून नावाजले जाते.
आज पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या किल्ल्यात अलीकडेच अनेक संवर्धन आणि दुरुस्तीची कामे हातात घेण्यात आली. त्यात बुरुज व तटबंदीची दुरुस्ती, पायवाटा बांधणी, तलावाची दुरुस्ती, दर्ग्यासमोर फरसबंदी, दगडी पटांगण ही कामे प्रामुख्याने होती. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी तळामुळे किल्लेप्रेमींची बरीच सोय झाली आहे. सरकारने किल्ल्यांचे सुनियोजित पद्धतीने संवर्धन, देखभाल करायला हवी आणि आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात हे निश्चितच. पण त्याच बरोबर काही वर्षांपूर्वी घडलेली येथील तोफेच्या चोरीची आणि जवळच्या रानात ती तोफ अर्धी कापलेली मिळाल्याची घटना तसेच किल्ल्यावर विविध ठिकाणी कोरून ठेवलेल्या प्रेमवीरांच्या कथा, प्लास्टिकचा कचरा मात्र मनात प्रश्न उभा करतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याची काळजी फक्त सरकारलाच असावी का चांगल्या सोयीसुविधा हव्यात हे आपल्याला कळते..पण फक्त सरकारला दोष न देता आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन वागायला कधी शिकणार
पाहण्यासारखी ठिकाणे
अंतूरच्या पूर्व बाजूला असणाऱ्या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून एक प्रेक्षणीय दरवाजा आहे. अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत (१९९० पर्यंत) या दरवाजाला लाकडी दारे होती. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे. या मार्गावर वरुन खूपच दगड पडलेली आहेत. पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण येथे या शिल्पाबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही. पुढे तिसऱ्या दारावरील भव्य असा फारशी शिलालेख असून हा प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो.
गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. या तटबंदीच्या कडेने उत्तर टोकाकडे चालत गेल्यास उजवीकडील तटबंदीमधील काही बुरुज लागतात. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायर्या आहेत. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणीकरिता भलामोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरुन संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अंजठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते, उत्तरेकडील खानदेशाचा परिसर ही दिसतो. गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरूज आहेत. मधल्या टेकडीच्या पश्चिम उतारावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहे. गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे. या बाजूला किल्ला हा डोंगर रांगेशी जोडला गेला असल्यामुळे या बाजूला मोठा खंदक कोरलेला आहे. खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे.
कसे जावे
अंतूरच्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक कन्नड कडून गौताळा अभयारण्यामधून एक रस्ता नागदकडे जातो. या रस्त्याला पुढे सिल्लोडकडे जाणारा एक उपरस्ता आहे. या रस्त्यावर आठ नऊ कि.मी. वर नागापूर नावाचे लहानसे गाव आहे. या गावातून अंतुरगडाकडे कच्चा रस्ता जातो. या मार्गावर खोलापूर म्हणून लहानशी वस्तीही वाटेत आहे. खोलापूरच्या पुढे असलेला रस्ता पावसाळ्यात खराब होतो. खोलापूरपासून सहा कि.मी. अंतरावर अंतुरगड आहे. हा मैलाचा चौकोनी दगड आहे. त्यावर काही शहरांच्या दिशा सांगितल्या असून हा इ.स. १६०८ मध्ये बसविल्याचा उल्लेख आहे. साधारण सपाटी असलेल्या या मार्गावरून चालत पाच एक किलोमीटर गेल्यावर अंतुरगडाचे दर्शन होते. अजंठा सातमाळा रांगेचे एक शृंग थोडे उत्तरेकडे घुसले आहे. या शृंगावरच अंतुरगड आहे. दुसरा मार्ग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. नागोद गावाकडून म्हैसघाटमार्गे दस्तापूरला पोहोचून तेथून अंतूरचा पायथा गाठता येतो. नंतर डोंगर चढल्यावर किल्ला येतो. हे दोन्ही मार्ग अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात. अंतूरच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. डोंगर उतारावर भरपूर झाडी आहे