साहित्य – १ वाटी हरबर्याची पाने (घाटे फुटायच्या आधी हरबर्याची कोवळी पाने तोडुन वाळवतात, ती वाळवलेली पाने), १ डाव ह. डाळ पीठ, अर्धा गड्डा लसूण, १-२ चिंचेची बुटकं, २ वाट्या पाणी, फोडणीला तेल, हळद, हिंग, तिखट.
कृती -: हरबर्यातल्या बारीक काड्या काढुन टाकाव्यात. ही पाने, डाळीचे पीठ पाण्यात कालवुन घ्यावे. त्यात चिंचेची बुटकं धुवुन आणि शिरा काढून घालावीत. पीठाच्या गुठळ्या राहु देऊ नयेत.१ डाव तेलात हळद हिंगाची फोडणी करुन लसूण चांगला लाल होऊ द्यावा. त्यातच तिखट घालावे. तिखट घातल्या घातल्या वरील मिश्रण त्यात ओतावे. १-२ उकळ्या आल्या की भाजी चांगली शिजते. गरम भाकरीबरोबर खावी.
अधिक टिपा:
भाजी जशी पातळ/घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करावे.
सकाळी केलेली भाजी संध्याकाळी खायला अधिक रुचकर लागते. त्यावर मोठा चमचाभर कच्चे तेल घालुन मस्त लागते.
भारतातला गावराण लसूण असेल तर अर्धा गड्डा लागतो. पाकळी मोठी असेल तर ५-६ पाकळ्या पुरे.