Diwali is one of the largest and brightest festivals in India. The festival spiritually signifies the victory of good over evil. The preparations and rituals typically extend over a five-day period, but the main festival night of Diwali coincides with the darkest, new moon night of the Hindu Lunisolar month Kartika. In the Gregorian calendar, Diwali falls between mid-October and mid-November.Diwali is an important festival for Hindus. The name of festive days as well as the rituals of Diwali vary significantly among Hindus, based on the region of India.
दिवाळी म्हणजे आनंदाचा , प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण. दिवाळी म्हणजे भारतीय सणांची राणी असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्यातही दिवाळी सण म्हटला कि लहान – मोठे , स्त्री -पुरुष , गरीब , श्रीमंत सगळ्यांच्या उत्साहाला अगदी उधान येते. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळसण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो.
दिवाळीचे दुसरे नाव म्हणजे दीपावली. दीप म्हणजे दिवा आणि अवली म्हणजे ओळी. दिव्यांच्या असंख्य ओळी घरात, अंगणात , सगळीकडे लावून संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघतो आणि म्हणूनच या सणाचे नाव दीपावली.
अश्विन महिन्याचे शेवटचे २ दिवस आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीचे २ दिवस अशी हि चार दिवसांची मुख्य दिवाळी. ढोबळमानाने दिवाळी ५ दिवसांची मानण्यात येत असली तरी दिवाळीच्या सुरुवातीला वसुबारस ह्या दिवशी गाईआणि वासरू ह्यांची पूजा केली जाते, त्यांना गोड घास खाऊ घातल्या जातो आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता म्हणून त्यांची पूजा केली जाते.
दिवाळी प्रामुख्याने पुढील ५ दिवसांची मानली जाते :-
१. धनत्रयोदशी
हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे वैद्य मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. ह्या दिवशी कोणतीही नवीन वस्तू घेणे अतिशय शुभ मानले जाते.
२. नरकचतुर्दशी
हा दिवाळीचा दुसरा दिवस. ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या तावडीतून सोळा हजार कन्यांची सुटका केली होती अशी मान्यता आहे. ह्या दिवशी पहाटे सुर्योदयापूर्वी उठून, सुगंधी उटणे लावून, अभ्यंगस्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची , देवदर्शन घ्यायचे आणि नंतर सगळ्यांनी मिळून दिवाळीचा फराळ करायचा अशाप्रकारे आनंद साजरा करतात.
३. लक्ष्मीपूजन
हा दिवाळीचा तिसरा आणि मुख्य दिवस. अश्विन वद्य अमावास्येला ह्या दिवशी संध्याकाळी घरोघरी, दुकाने, प्रतिष्ठानातून लक्ष्मीपूजन केले जाते. ह्या दिवशी घरातील पैसे, दागिने ह्यांची पूजा केली जाते. व्यापारी लोक हिशोबाच्या वहीखात्यांचे पूजन करतात. घरातील धनसम्पत्तिसोबतच ह्या दिवशी केरसुनीलाही लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा केली जाते. पूजेनंतर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.विविध फटके उडवून बच्चेमंडळी उत्साहाने हा दिवस साजरा करतात.
४. बलिप्रतिपदा
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी १ मानला जातो. ह्याला पाडवा असेही म्हणतात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला पाडव्याची भेटवस्तू देतो.
५. भाऊबीज
हा दिवाळीचा शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होणाऱ्या या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. बहिणभावाच्या पवित्र, गोड नात्याचा , प्रेमाचा हा दिवस. बहिण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला प्रेमाने ओवाळणी घालतो.
दिवाळी हा सण प्रत्येकाची ओंजळ आनंदाने, सुखाने आणि उत्साहाने भरून टाकतो. लहान मुलांना दिवाळी निमित्ताने शाळेला मोठी सुट्टी मिळते, त्यामुळे दिवाळी म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची मोठी पर्वणीच असते.
दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते, रंगरंगोटी केली जाते. त्यामुळे आरोग्यदृष्टीनेही दिवाळी सणाचे खूप महत्त्व आहे.