The essence of Sri Krishna Avatar is beautifully explained in this Sloka from Bhagavad Gita (Chapter IV-7,8)
“Yada Yada Hi Dharmasya, Glanirva Bhavathi Bharatha,
Abhyuthanam Adharmaysya,Tadatmanam Srijami Aham’.
Praritranaya Sadhunam Vinashaya Cha Dushkritam,
Dharamasansthapnaya,Sambhavami Yuge-Yuge.”
Meaning: “Whenever there is a decline in righteousness O! Bharatha, and a rise in the unrighteous, I manifest Myself! For the protection of the good, for the destruction of the wicked and for the establishment of righteousness, I am born in every age.”
रोहिणी नक्षत्राच्या मध्यरात्री, मथुरेत कंसाच्या तुरुंगात , श्रीकृष्णजन्म झाला होता. कृष्ण म्हणजे श्रीविष्णूचा आठवा पूर्णावतार. श्रीकृष्णाचे जीवन कार्य फारच अदभूत, अलौकिक आहे. रामअवतार संपल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर सर्वत्र दैत्य उन्मत्त झाले होते. कंस, चाणूर, मुष्टिक, अध, बक, केशी, शिशुपाल, जरासंध इ. असे अनेक दैत्य पृथ्वीवरील लोकांचा छळ, तसेच गोहत्या, ब्राम्हणहत्या करू लागले होते. त्यामुळे जनमानसाचे जगणे कठीण झाले होते. धर्मकृत्य , यज्ञयाग बंद पडल्याने जणू पृथ्वीचा थरकाप झाला, ती आक्रोश करू लागली आणि तेव्हा देवीदेवतांच्या स्तवनाने श्रीविष्णूंनी यदुकुळात, वसुदेव-देवकीच्या पोटी श्रीकृष्ण अवतार घेतला. वसुदेव-देवकी यांच्या तीन जन्मतपाचे ते फळ होते; तेव्हा देव श्रीकृष्ण म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आले.
मथुरेत उग्रसेन हा राजा होता. त्याचा मुलगा कंस व मुलगी म्हणजे देवकी. तिचा विवाह वसुदेवासोबत झाला होता. कंसाने आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्याकरीता मिरवणूक काढली असतानाच, एकाएकी आकाशवाणी झाली कि “देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार; हे त्रिवार सत्य आहे”. त्याच क्षणी त्याचा राग अनावर होऊन त्या दुष्ट कंसाने तिला ठार मारण्याचे ठरविले, परंतु वसुदेवाने विनंती केली कि “अरे, स्त्रीहत्या महापाप आहे. मला जो पुत्र होईल त्याला मी तुझ्या स्वाधीन करेन, तू देवकीला मारू नको.” परंतु त्याने त्यांना हातापायात बेड्या टाकून बंदीखान्यात ठेवले.
तिच्या सहा पुत्रांना जन्मत: मारून त्याने आपल्या पापाचा घडा भरला. परंतु नंतर श्रीविष्णूने आपल्या लीलेद्वारे तिचा सातवा पुत्र बलराम याला रोहिणीच्या गर्भातून जन्म दिला व आठवा पुत्र श्रीकृष्ण याला रातोरात नंदबाबा-यशोदा मातांच्या घरी पोचविले. याप्रमाणे, श्रीकृष्ण जन्म झाला.
श्रीकृष्णजन्म रात्री बारा वाजता साजरा करतात. या दिवशी एकादशीप्रमाणे उपवास करतात; भागवतपुराण, हरीविजय, श्रीकृष्णलीलामृत या ग्रंथाचे पठन करून दुसऱ्या दिवशी दहीहंडी, गोपालकाला, पारणे करून जन्मोत्सवाची सांगता करतात. हा फार आनंदाचा उत्सव आहे.
दुर्जनांचा नाश , साधूंचे संरक्षण व हिंदू धर्माची संस्थापना हेच श्रीकृष्णाच्या चरित्राचे सार आहे. हतबल झालेल्या अर्जुनास, युद्धास प्रवृत्त करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता सांगितली आहे. राक्षसांचा नाश करून मानवास अभय दिले. त्यांनी मानवाप्रमाणेच जन्म घेतला, वाढले व आयुष्यभर महान कार्य करून देवत्व प्राप्त केले. म्हणून त्यांना अवतारी पुरुष म्हटल्या गेले आहे.