This article gives us an insight of the life of an ultimate devotee should be like . In this article , we tried to describe the things one should follow in their life if they want to control their mind and acquire inner peace.
खरी शांती आपल्या आतूनच निर्माण होते. ज्याचा आपल्या वासना-विकारावर ताबा आहे, तोच श्रेष्ठ. विश्वासघात कोणाशी करू नये, असत्य भाषण करू नये, कटू लागेल असे बोलून कुणाचे मन दुखवू नये ; साधकाने सिद्धी मागे लागू नये, तिची संगती कधी घरू नये.
राग, द्वेष, मोह, आसक्ती, दुर्भावना, चिंता हे सर्व मनाचे विकार आहेत. माणूस मन रहित झाला कि , सतचित हे त्याचे खरे स्वरूप उरते. पैसा, कामवासना, मानापमान हे परमार्थात घातक ठरतात. त्यापासून माणसाने स्वत:ला वाचवावे. ज्याचे चित्त एकाग्र झाले, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, सकल संकल्प तडीस जातात. विश्वासामुळे माणसाला बळ प्राप्त होते.
माणसामध्ये नवी रचना करण्याची शक्ती आहे. पुढे जाण्याची शक्ती आहे. आक्रमणाचा प्रतिकार करण्याची शक्ती आहे. कोणत्याही बाबतीत आपण स्वत:ला कमी समजून घेवू नये. त्याने पुढे जाण्याचीच इच्छा ठेवली पाहिजे. जो मनुष्य पूर्णपणे निस्वार्थी आहे, तोच खर्या सुखाला उपलब्ध होतो. निरपेक्ष, निरासक्त भावनेने काम करावे, कारण एखाद्या बाबतीत अपेक्षा राखली आणि ती पूर्ण झाली नाही तर अपेक्षाभंगाचे जे दु:ख होते, ते भयावह असते. त्यातूनच राग, द्द्वेश, क्रोध तयार होतो व मनुष्याचे शत्रू तयार होतात. काम, क्रोध, असुरी शक्ती हे माणसाचे शत्रू आहेत.
इंद्रिय निग्रह करणारांची इंद्रिये ताब्यात येतात. त्यासाठी साधकाने अत्यंत सजग राहावे. वाईट संस्कार होवू देता कामा नये. प्रत्येक मिळणार्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. कारण या संधीच्या मागोमाग भाग्य येत असते.
वर्तमानाच्या क्षणात अंध:कारमय दिवस आणि प्रकाशमय रात्र यापासून मुक्त व्हा. वर्तमान सदैव जिवंत आहे, चैतन्यमय आहे. नेहमी वर्तमानात जगा. त्यामुळे आपल्या जगण्यातील यांत्रिकपणा दूर होईल. जीवन कसे अगदी सहज, सोपे, उत्स्फूर्त असावे. त्यात रटाळपणा, कंटाळपणा नकोच. नेहमी नवीन विचारांना प्रवेश हवा. जीवनात प्रेम, आनंद, आशावाद यांचा प्रकाश रोज येवू द्या.
भूत, भविष्य यांच्यापासून मुक्त राहण्यातच आनंद आहे. माणसाने रिकामे, उदास, हातपाय गाळून बसू नये. त्यातूनच शारीरिक आजार उत्पन्न होतात. शरीर व मन यांची परस्परावर सतत क्रिया-प्रतिक्रिया होत असते, एकाचा दुसर्यावर परिणाम होतो. हातात काम व मुखात राम असू द्यावे. काळजी नसणे व ध्यानाभ्यास असणे हि संसारी माणसाला सुख-शांती देवून अनागत दु:खे टाळणारी जादू आहे. यातच नितांत रमणीय असा स्वत:चा शोध सुरु होतो आणि रोजच्या दिनचर्येत एक अनुभव व अनिर्वचनीय असा अनुभव प्राप्त झाल्याची प्रचीती साधकाला जाणवू लागते.
प्रत्येकाच्या अंत:करणात अमर्याद अनंत अशा शांती सुखाचा साठा आहे. मन अंतर्मुख करून म्हणजे मनाच्या यच्चयावत समग्र शक्ती आतमध्ये वळवून ‘याची देही याची डोळा’ हि स्वानुभूति घ्यावी.
माणसाच मन नेहमी प्रसन्न हवं, आनंदी हवं , हसतमुख माणूस सर्वांना हवाहवासा वाटतो. वाणी गोड असावी . निरर्थक कर्कश्शपणा नको. अडीअडचणीतून मार्ग काढण्यास श्रद्धा, निग्रह हवा. मनाची उभारी हवी. स्वत:वर विश्वास हवा. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि राग, द्द्वेश, मोह, अहंकार, आसक्ती, दुर्भावना, चिंता हे सर्व मनाचे विकार आहेत.म्हणूनच सर्वप्रथम आपल मन आपल्या कह्यात आल पाहिजे. मन ताब्यात आलं कि इंद्रिये ताब्यात आलीच म्हणून समजा.