एकदा का संत पातळी गाठली, कि त्या संताचे स्वत:चे जीवन असे काहीच शिल्लक राहातनाही. कारण त्यांनी आपले सर्वस्व, अहंकार, देह, विचार, मन, आवडनिवड सर्व काही गुरुचरणी अर्पण केलेले असते. संसारातील काहीही मागून संसारापासून दूर गेलेल्या संतांना आपण पुन्हा मायेत आणून एक प्रकारे पापाचे धनीच होत असतो. म्हणून संतांना संसारातील काहीच मागायचे नसते.
आपल्या शरीरात सत्व, रज, तम असे हे तीन गुण मानवाला संसारात खेळवत असतात. संतांच्या शरीरातील सत्व गुणांचे सर्वाधिक्य होवून ईतर रज, तम गुणांचे प्रमाण फारच अल्प झालेले असते. अशाच जीवाला संत म्हणून गणले जाते. त्यांचे मन नष्ट होवून ते विश्व मनाशी जोडल्या जाते. म्हणूनच जगाच्या पसाऱ्यातील अनेक घटना, प्रसंग, भक्तांच्या मनातील विचार ओळखणे असे ज्ञान त्यांना अंतरात्म्यातून होत असते. त्यांची बुद्धी सुद्धा विश्व बुद्धीशी एकरूप झालेली असते. म्हणूनच भविष्यकाळातील घटनेचा ते वेध घेऊ शकतात. ते स्वत:च्या देह्शुद्धीमुळे, मनोलय व बुद्धीलय झाला असल्यामुळे काळाचा पडदा ओलांडून समोर येणाऱ्या घटना ते पाहू शकतात. म्हणूनच ते कधी कधी आपल्या भक्ताला पुढे येणाऱ्या चांगल्या- वाईट घटनांचे संकेत देतात. त्यांच्यातील अहंकाराचा नाश झालेला असल्याने ते सर्व जीवात ईश्वराचे रूप पाहतात, म्हणूनच त्यांना लहान-मोठा, गरीब- श्रीमंत, जात-पात, या भेदात न पडता सर्वांशी समतत्वाने वागू बोलू शकतात , तसेच त्यांना सुख- दु:खाचे भान नसते. त्यांना ऊन, वारा, पाऊस याची भीती नसते. त्यांना सर्व ऋतू सारखेच असतात. यालाच देहबुद्धी हरपणे असे म्हणतात. त्यांचे मन भगवंताच्या प्रेमाने ओथंबून वाहत असते म्हणूनच ते सर्वांशी प्रेम, प्रीती वाटतात व परमानंदात तल्लीन होऊन आत्मानंदाने डोलत असतात. ते फार कमी बोलतात, सतत मौनात असतात ; त्यांचे अखंड नामस्मरण सुरूच असते. त्यांना व्यावहारिक नातीगोती उरलेली नसतात, ते व्यवहार संपवून स्थिर वृत्तीनेच वागतात. त्यांनी अध्यात्म्याच्या शाश्वत अशा ईश्वरीय पसाऱ्यात आपले खाते उघडलेले असते. त्यांचे हे पृथ्वी वरील जीवन ईश्वराच्या आज्ञेने जगत असतात. म्हणून मानवाने किंवा भक्ताने त्यांना आपल्या मानवी व्यवहारी चौकटीत बसविण्याचा प्रयत्न करू नये.