Live your Life & Forgate your age Most people worry about aging & getting old. Aging is a process & we are destined to grow old. Be aware, Enjoy the process. Use your experience & be greatfull. For life itself is a blessing so, just live your life & forgate your age.
हवा पाणी आणि प्रकार हे बाह्य वातावरण जसे असतात तसे आपल्या शरीरातही असतात.जग हे जसं पंचमहाभूतांनी भरलेलं आहे. त्याचप्रमाणे शरीरातही पंचमहाभूते असतात. या जगात जसे उर्जा ज्ञान हेच भरलेले आहे तसेच शरीरांतही तेच असते. थोड्यात माणसात विविधता असली तरी ते सर्व एकच आहेत. म्हणूनच आपले शरीर आणि वातावरण यात परस्परसंबंध असतात. आपण या जगापासून विभक्त आहोत, असे जेव्हा वाटते तेव्हा माणसाच्या मनात भीती निर्माण होते. आपल्याला आपण ‘मी’ या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणूनच गोंधळ निर्माण होतो.
या ‘मी’ पणामुळेच, स्वत:ला वेगळी ओळख आहे. या गैरसमजुतीमुळेच आपण एकमेकांविरुद्ध भांडून आपला वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. इतकेच नव्हे तर काही शत्रू देश एकमेकांविरुद्ध युद्ध करायला तयार होतात तर गटागटांत हाणामाऱ्या, खूनसत्र चालू होतात. आपण जगापासून वेगळे आहोत हा विचार जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत हे मतभेद, खून, हे अपरिहार्य आहे. माणसाला लाभलेली सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे ‘बुद्धी’ तिचा योग्य वापर कोणी करत नाही म्हणून आज जग संकटाच्या खाईत आहे.
आपणच आपल्या विनाशास कारणीभूत होत आहोत. दुसऱ्यांचा विनाश आहे हे अल्पबुद्धीच्या माणसांना पटत नाही. साक्षात मृत्यू म्हणजे सुद्धा विनाश या भीतीने प्रत्येक म्हातारी माणसे सतत भीतीच्या वातावरणात राहतात. मृत्यू म्हणजे एक अपरिहार्य बदल आहे. मृत्यू हा अनिश्चित असल्यामुळे वृद्ध माणसांना त्याची भीती वाटत असते. जे अनिश्चित आहे. ज्यावर आपले नियंत्रण नाही, त्याचा विचार करण्याचा अर्थ आहे? कसे जगायचे यावर आपले नियंत्रण असते. मग जे वास्तव आहे (म्हणजे जगणे) त्याचाच आपण का नाही विचार करत? जन्माला आल्यानंतर लगेचच तुमची वृद्धत्वाकडे व प्रत्यक्ष मृत्यूकडे वाटचाल सुरु होते.
शरीर हे सतत बदलत असते. ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अवस्थेत असते. मृत्यू हा सुद्धा एक बदल आहे. आणि यामुळेच की काय पण माणूस भूत, वर्तमान व भविष्य यांचा विचार करायला लागतो. त्यातही वर्तमानाचा विचार करणारे थोडेच असतात, भूत व भविष्य या दोन्हीच्या विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. कारण जे घडून गेले आहे त्यात बदल करता येणार नसतो आणि जे भविष्यात घडेल ते घडविणे आपल्या हातात नसते .
त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने फक्त वर्तमानाचाच विचार करावा. भूत व भविष्य हे आपल्या मनानेच निर्माण केले आहेत. भूत व भविष्य या मनाच्या कल्पनेपासून तुम्ही मुक्त झालात तर तुम्हाला एक नवीनच अनुभूव येईल. जगणे हे वास्तव आहे. जगणे हे एक कर्म आहे. हे कर्म मी नीटपणे केवळ वर्तमानाचा विचार करून जगण्याचा प्रयत्न करेन. यासाठी मला सतत सजग, सतर्क व जागरूक राहावे लागेल.
त्यासाठी प्रत्येकाने ध्यानधारणा करायला शिकले पाहिजे. ध्यान म्हणजे डोळे मिटून स्वस्थ बसून आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष ठेवणे आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करण होय. आणि या अवस्थेत विचार, भावना, इच्छा या सर्वांवर नियंत्रणच ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असे नव्हे तर त्या सर्व तुम्ही विसरायल शिकले पाहिजे. हे जर सर्व तुम्ही विसरायला शिकलात तर तुम्हाला तृप्ती मिळेल, समाधान मिळेल.
ध्यानधारणा केल्यामुळे तुम्हाला तुम्ही कोण आहात याची जाणीव होते आणि तुम्ही जागरूक होता. सतत जागरूक राहिले तर तुमच्या शरीरात घडत असलेल्या सर्व क्रियांची जाणीव होऊ शकते. ही जागरुकता न राहणे म्हणजे बुद्धी नाहीशी होण्यासारखे आहे आणि बुद्धीवरचे नियंत्रण सुटणे म्हणजे शरीरावरील नियंत्रण सुटण्यासारखे आहे. .
नियमित केलेल्या ध्यानधारणेमुळे प्रत्येक व्यक्तीची शारीरिक व मानसिक क्षमता निश्चितपणे वाढते हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. नियमित ध्यानधारणा केल्यांमुळे तुमची प्राणवायूची गरज कमी होते. त्यामुळे श्वास हळुवार घेतला तरी चालतो, तसेच चयापचय क्रियेचा वेगळी मंदावतो, ध्यानधारणेमुळे शांतता प्राप्त होते म्हणून हे शक्य होते. या उलट जर एखादी व्यक्ती तानतणावाखाली असेल, त्याचे मानसिक स्थैर्य बिघडेल असेल तर शरीरातील सर्व क्रियांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. संप्रेरकांच्या समतोलही बिघडतो आणि ती व्यक्ती लवकर वृद्ध होऊ शकते. मानसिक स्थैर्य हे आपल्याजवळ असते ते मिळविण्यासाठी मानसिक व्यायामाची जरुरी असते. तुमचे शारीरिक वय आणि मानसिक वय वेगवेगळ्या असते. तुमच्या मनाने फक्त आपण जागरूक आहोत याची सतत मनाला जाणीव करून दिली आणि वस्तुस्थितीला शांतपणे तोंड देण्याचे ठरविले आणि त्यासाठी सराव केला तर ते तुम्हाला शक्य होईल……
हा सराव इतका सातत्याने केला पाहिजे कि तुमच्यात होणारा बदल एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे सहज झाला पाहिजे. यासाठी मानसिक शांततेची जरुरी आहे, पण जर तुमचे मन तणावग्रस्त असेल तर तुमच्या मनावर सतत दडपण जाणवेल आणि तुमच्या शरीरात होणाऱ्या प्रत्येक क्रिया सहजपणे न होता त्या तुम्हाला जाणवू लागतील आणि त्याचही दडपण तुमच्यावर येईल. तुमचे शरीर आणि शरीरात घडणाऱ्या क्रिया यावर तुमच्या मनाचे नियंत्रण आहे. शरीरातील मज्जासंस्था तुम्हाला संदेश देते तसेच मेंदूकडे संदेश पोचवित असते. पण हे संदेश पोचविल्यानंतर निर्णय घेऊन क्रिया करण्याचे काम हे तुमचे अंतर्मन करत असते. म्हणजेच पुढील कृती काय करावयाची हे ठरवीनेहि तुम्हीच करत असता…
अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले तर बिबट्या पहिल्यानंतर प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतील. काही लोक घाबरून जातील, त्यांची धांदल उडेल, तेथून काही लोक पळून जातील, काही लोक जीज्ञासा म्हणून बिबट्या बघायला जमतील, काही लोक त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिथून निघून जातील. तर काही लोक बंदूक घेऊन त्याला मारायला येतील. ज्या व्यक्तीमध्ये जशा प्रतिक्रिया उमटतील त्याप्रमाणे त्याचा शरीरातील क्रियांवर परिणाम होणे अवलंबून असते. म्हणजे घटना एकच पण प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्थितीप्रमाणे त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या आणि या प्रतिक्रियांप्रमाणे प्रत्येकजन आपपले अनुभव म्हणून त्याकडे पाहू लागतो. प्रत्येक घडणारी घटना हा एक अनुभव असला तरी त्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे अनुभूती होय.
अनुभव आणि अनुभूती याची जाणीव ठेवून प्रत्येक व्यक्ती त्याप्रमाणे निर्णय घेत असते. याचाच अर्थ जागरुकता हि प्रत्येक व्यक्ती वेळी महत्त्वाची असते. तिच तुमच्या मनावर आणि पर्यायाने शरीरावर नियंत्रण ठेवत असते. हि जागरुकता प्राप्त करणे हे प्रत्येक माणसाच्या बुद्धीवर अवलंबून असते.
प्रतेक माणूस योग्य त्या पद्धतीने विचार करू लागला तर त्याला कळू शकेल कि मनात येणारा प्रत्येक विचार, भावना हे बुद्धीवर अवलंबून असते. ही बुद्धी म्हणजेच स्वत्व होय.
आपण या जागृतावस्थेत सतत राहिलो नाही तर आपले आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या मनातील नियंत्रणही सुटते आणि मग आपण आजारी पडतो. आपण म्हातारे झालो असे वाटू लागते, आणि या आजारपणामुळे आणि म्हातारपणामुळे आपला मृत्त्यू जवळ आला असे आपल्याला वाटू लागते.
तुमच्या शरीरात तुम्हाला अनुकूल बदल करायच असेल तर तुमच्या जागृतावस्थेत अनुकूल बदल करता आला पाहिजे आणि बुद्धीमध्ये अनुकूल बदक केल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणूनच आजारपणं, म्हातारपण आणि मृत्यू यांच्याबाबत विचार करणे म्हणजे बुद्धीमध्ये प्रतिकूल बदल घडविण्यासारखे आहे. आपण म्हातारे होत आहोत या विचारानेच आपल्याला नैराश्य येते. त्यामुळे म्हातारपणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच बदलतो. म्हातारपण हा एक नैसर्गिक बदल आहे. आणि मृत्यू म्हणजे सर्वनाश नाही तर तोही एक अपरिहार्य बदलच आहे.
सातत्याने वर्तमानाचा विचार करायला शिकले तर तुम्ही खरे व सातत्याने जागृत आहात असे म्हणता येईल म्हातारपणी सुद्धा तुमच्या असे लक्षात येईल की, ऊर्जा, ज्ञान, व बुद्धी यांना अंत नाही. सतत नवं काही तरी मिळवा आणि म्हातारपण विसरा………