Dhyanaech Atmashanti: With knowledge you grow will. with knowledge your sou gets peace. knowledge make human perfect. if you want to clean your soul , Knowledge is necessary. Read this article on cleaning soul with Knowledge.
आत्मशान्तिचा अखंड लाभ होण्याकरिता ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञानाच्या योगाने बुद्धीला कार्याचा योग्य निर्णय करता येतो. म्हणूनच ज्ञानासारखे पवित्र या लोकी काहीही नाही, ज्ञानाने आत्मशांती जरूर मिळते. मनुष्याचे शरीर स्वास्थ्य उत्तम असले, तो आहार-विहार माफक प्रमाणात घेत असला त्याच्या मनात सद्भावना असल्या व त्याची बुद्धी स्थिर असली तरी त्याला जगातील चराचर गुणधर्माचे मुळीच ज्ञान नसले, विश्वाचा कारभार कोण कसा या संबंधी योग्य कल्पना नसली व व्यवहारात कसे वागावे याची माहिती नसली तरी काय करावे व काय करू नये, कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते हे त्याला समजू शकत नाही. कार्याचा योग्य निर्णय न करता आल्यामुळे त्याच्या हातून सत्कर्मे घडण्यायेवजी दुष्कर्मे घडण्याचाही संभव असतो व त्यामुळे त्याला आत्मशांती लाभू शकत नाही. म्हणून आत्मशान्तिचा अखंड लाभ होण्याकरिता ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञानाच्या बुद्धीने कार्याचा योग्य निर्णय घेता येतो. सर्व प्राणीमात्रांचा सुहृदय असा परमेश्वर त्याच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्याने आत्मशांती मिळते. आधीभौतिक ज्ञान, अध्यात्मज्ञान, आणि तत्वज्ञान असे ज्ञानाचे मुख्य तीन विभाग आहेत. त्यापैकी अध्यात्मंज्ञान प्राप्त करून घेणे याला ” ज्ञानयोग” किंवा ”सांख्ययोग” असे म्हणतात. ज्ञानयोग हे आत्मशांतीच्या सात साधनापैकी एक साधन आहे. ते स्वयंपूर्व किंवा एकमेव साधन नव्हे. स्थिर व ज्ञानयुक्त म्हणजे विशुद्ध बुद्धीने कार्याचा निर्णय ठरविल्यानंतर त्या निर्णयानुसार आत्म्याचा संकल्प होतो व तेव्हाच सत्कर्म घडू शकते. विशुद्ध बुद्धीच्या निर्णयाविरुद्ध संकल्प झाल्यास मनुष्याच्या हातून दुष्कर्म किंवा विपरीत कर्म घडते. मग त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागून आत्मक्लेश होतात. म्हणून अखंड आत्मशांती लाभण्याकरीता आत्मविजयाची आवश्यकता असते. आत्मविजयाच्या अभावी आत्मा अनेक प्रकारच्या मोहात गुरफटून भलभलते संकल्प करतो व स्वत:वर आत्मक्लेश ओढवून घेतो. म्हणून आत्मविजयी किंवा आत्मवान होण्याविषयी श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा कितीतरी वेळ उपदेश केलेला आहे. संकल्पशून्य अवस्थेतील म्हणजे निष्क्रिय अवस्थेतील आत्मशांती फार वेळ टिकू शकत नसल्यामुळे आत्मशांती सदैव किंवा निदान शक्य तितकी दीर्घ काळपर्यंत टिकण्याकरीता आत्मा संकल्पमग्न अवस्थेत असणे आवश्यक असते. आणि आत्मा संकल्पमग्न असण्याकरिता मनुष्य सतकर्मे करण्यात मग्न असावा लागतो. मनुष्य काहीच कर्म करीत नसेल तर आत्म्याला संकल्प करण्याचे काम पडत नाही.
आत्मक्लेश —
एखादी गोष्ट शरीराला व मनाला सामान्यत: सुखकारक असूनही स्वत:च्या इच्छेविरुद्ध होत असल्यास आत्म्याला क्लेशकारक वाटते,व दुसरी गोष्ट शरीराला किंवा मनाला सामान्यत: दु:खकारक वाटणारी असूनही स्वत:च्या इच्छे नुसार होत असल्यास तिच्यामुळे आत्म्याला तृप्ती वाटते.
शरीराला किंवा मनाला वेदना देणारी कोणतीही गोष्ट घडावी अशी मनुष्याला सामान्यत: इच्छा कधीच नसते. आणि शरीराला व मनाला आराम देणारी किंवा सुख देणारी गोष्ट घडावी असे मनुष्याला सामान्यत: वाटते आत्म्याला तृप्ती वाटणे किंवा क्लेश होणे हे कोणत्याही गोष्टीच्या स्वाभाविक स्वरूपात किंवा गुणधर्मावर अवलंबून नसते.आत्म्याला तृप्ती वाटणे किंवा क्लेश होणे हे सर्वस्वी स्वत:च्या इच्छेनुसार घटना घडत आहे किंवा स्वत:च्या इच्छे विरुद्ध घडत आहे यावर अवलंबून असते. स्वच्छे नुसार होणार्या कर्माचे प्रकार दोन असतात सद्सद्विवेक बुद्धीच्या निर्णया नुसार व त्या निर्णया विरुद्ध अशी दोन्ही प्रकारची कर्मे स्वच्छेने होवू शकतात. सद्सद्विवेक बुद्धीच्या निर्णयानुसार होणारी कर्मे सामान्यत: योग्य असतात, तर तिच्या निर्णया विरुद्ध केली जाणारी कर्मे बहुदा अयोग्य असतात.
सद्सद्विवेक बुद्धीच्या निर्णयाविरुद्ध केलेल्या संकल्पानुसार ज्या क्रिया केल्या जातात. त्यामुळे प्रथम आत्म्याला तात्पुरती तृप्ती वाटते. पण पुढे त्या अयोग्य कर्मामुळे शारीरिक किंवा मानसिक दु:ख अनिच्छेने सहन करण्याची पाळी येवून आत्म्याला क्लेश होतात. तसेच सद्सदबुद्धीच्या निर्णयाविरुद्ध मनुष्य वागला की आपण अनुचित कर्म केले अशी टोचणी आत्म्याला लागूनही आत्मक्लेश होतात.