Cake of Happy Life We all get the best things in life but its our responsibility to handle all those things very carefully . its our duty to care what we have in life.
जगातील सर्वोत्तम गोष्टी तुमच्याकडे असणे शक्य नाही, पण जे काही तुमच्याजवळ आहे. त्यास सर्वोत्तम बनवणे तुमच्या हातात आहे. हे सर्वोत्तम विचार मंदाकिनी रासकर हिचे आहेत. मला खूप आवडले विचार. आपल्याकडे सर्वच सर्वोत्तम गोष्टी नाहीत हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. काही ना काही उणीवा ईश्वरी आपल्यामध्ये ठेविल्या आहेत. परंतु आपल्याकडे जे जे आहे, उदाहरणार्थ, आपल्याकडे असलेले ज्ञान, कला कौशल्य, आपली वागण्या – बोलण्यातील पद्धत इत्यादी गोष्टी आपण विचारपूर्वक तपासल्या तर आपल्याला असे दिसून येईल की आपल्याकडे ज्ञान असूनही आपण त्या ज्ञानाचा उपयोग करीत नाही. आपण आपल्याकडील ज्ञान जर दुस-यास दिले तर ते फुकट न जाता त्या ज्ञानाचा उपयोग दुस-यास नक्कीच होईल. आपले ज्ञान कमी न होता वाढेल. या ज्ञान देण्याचा प्रक्रियेला मी सर्वोत्तम म्हणेन. आपली कला योग्य व्यक्तीला शिकविली तर त्या व्यक्तीला आनंद होईल, शिवाय कला द्विगुणीत होऊन सर्वोत्तम बनेल. कौशल्याच्या बाबतीत मी असे म्हणेन की आपण एखादे चांगले काम करीत असतांना एखाद्याने पाहिले. आपल्या कामाची हाचोती ( लकब ) एखाद्याला आत्मसात करावीशी वाटली तर आपण आपल्या कामातील आपल्या कौशल्याविषयी त्यास सांगितले पाहिजे. काम करतांना कोणत्या गोष्टींवर दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या वागण्या बोलण्यातील पद्धतींविषयी विचार करता कुणाचीही मने आपल्याकडून दुखावली जाणार नाहीत याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपल्या चांगल्या वागण्यातील नी बोलण्यातील चांगल्या गोष्टीचे अनुकरण, लहान मुले किंवा इतरही करीत असतात हे विसरून चालणार नाही. आपल्याकडे जे जे चांगले आहे ते ते सर्व सरोत्तम बनविणे केवळ आपल्या हाती आहे असे मला वाटते, पहा विचार करून.
प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, १४१०२०१३.