जोधपूर : बलात्काराचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरू आसारामबापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. सध्याच्या अवस्थेत त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे न्या. निर्मलजित कौर यांनी स्पष्ट केले. बचाव पक्षाचा अर्धा तास युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी ७२ वर्षीय आसारामबापू यांना जामीन नाकारला. बचाव आणि सरकारी पक्षाने अनुक्रमे १६ आणि १८ सप्टेंबरला युक्तिवाद पूर्ण केला होता, तथापि बचाव पक्षाचे वकील राम जेठमलानी यांनी आपल्या युक्तिवादाच्या सर्मथनार्थ काही पुरावे द्यायचे असल्याचे सांगत आणखी मुदत मागितली होती. मंगळवारी जेठमलानी यांनी न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चार बाबी नमूद केल्या आहेत. पीडित मुलीची गुरुकुलमध्ये राहण्याची इच्छा नव्हती. या मुलीचा जन्मदाखला चुकीचा आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. तिचे एका मुलाशी प्रेमप्रकरण असून ती फेसबुकवर सक्रिय होती, असे बचाव पक्षाने म्हटले. हा खटला नसून जामिनासाठी सुनावणी आहे. मागच्यावेळी केलेला युक्तिवाद या वेळीही केल्याबद्दल न्या. कौर यांनी आक्षेप घेतला. या मुलीच्या चारित्र्यामुळे गुन्ह्याबद्दल संशय निर्माण झाला असल्याचे जेठमलानी यांनी म्हटले. आसारामबापू यांच्या जामिनाला विरोध करणारे सरकारी वकील आनंद पुरोहित आणि तपास अधिकारी चंचल मिश्रा यांनी हा युक्तिवाद फेटाळला. आसारामबापू हे कारागृहात असतानाही त्यांचे सर्मथक सर्वत्र गोंधळ निर्माण करीत आहेत. ते जामिनावर बाहेर आल्यास परिस्थिती आणखी चिघळेल, असे मिश्रा म्हणाल्या.