मुंबई : नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शनिवारी लाखो भाविकांची झुंबड उडाली होती. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आज संपूर्ण लालबाग परिसरात भक्तांची जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, भक्तांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शनिवारी पोलिसांतर्फे करण्यात आले. लालबाग राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात भाविक येत असतात. दरम्यान, आजच्या सुट्टीचा मुहूर्त साधत या ठिकाणी दुपारपासून भक्तांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. दुपारीच लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग काळाचौकीपर्यंत पोहोचली होती, तर नवसाची रांग वकारिया मैदानात असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली. येणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेता आज आणि उद्याच्या सुट्टीच्या रविवारसाठी कार्यकर्त्यांनी विशेष काळजी घेण्याची सूचना दिल्याची माहिती आज मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी दिली.