स्थानिक संस्था कराच्या (LBT) विरोधात गेल्या कित्येक दिवसांपासून उगारलेले ‘ दुकान बंद ‘ अस्त्र म्यान करण्यास नवी मुंबई, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील व्यापारी अखेर सोमवारी राजी झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी सोमवारी केलेल्या चर्चेअंती या वादावर तोडगा निघाल्याने या तीन शहरांतील एलबीटीचा तिढा सुटला असला तरी मुंबईसह ठाणे व नागपूरबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मुंबई वगळता पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर येथील व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची तसेच या महापालिका आयुक्तांची बैठक सोमवारी दुपारी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यासोबत झाली. त्यानंतर या सगळ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत प्रदीर्घ बैठक झाली. त्याअंती तीन शहरांतील व्यापाऱ्यांनी एलबीटीविरोध मागे घेतला, असे मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये एलबीटी लागू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासोबत मंगळवारी आपली बैठक होईल, असे मुख्य सचिव बांठिया यांनी सांगितले. एलबीटीचा प्रस्ताव महापालिकेकडून कॅबिनेटकडे जाईल, व त्यानंतर विधिमंडळात मांडण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर, ठाण्याबाबत येत्या २४ तारखेस होणाऱ्या बैठकीतच निर्णय होईल, असे ठाण्यातील व्यापारी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.