Articles On Nature, “Nature” refers to the phenomena of the physical world, and also to life in general. .
महत्वाचे मुद्दे : एक श्रेष्ठ कलावंत, समर्थ चित्रकार, निसर्गाने स्वत:च्या कुंचल्याने चराचरात चैतन्यपूर्ण चित्र निर्माण केले.
मानव ही त्याची सर्व श्रेष्ठ निर्मिती, ग्रह, तारे, डोंगर, जलाशय, वनश्री आकाशातील रंगांची उधळण ही सारी निसर्गाची जादुई किमया, निसर्गाच्या ठायी सर्व कलांचा मनोज्ञ संगम ..
आता म्हणतोच की “हिरवे हिरवे गार गालीचे , हरित तृणांच्या मखमालीचे ”॥ (Hirwe Hirwe Gar Galich , Harit Trunachya Makhmaliche) निसर्ग हा एकमेव कलावंत आहे, एक समर्थ चित्रकार आहे. जे निसर्गाने चितारलेले नाही असे चित्र ब्रम्हांडात अन्यत्र कुठेही नाही, निसर्गाच्या कला सामर्थ्याचे कौतुक म्हणजे असे ।
“पाणीस्पर्शच अमुचा शकतसे वस्तू प्रती द्यावया , सौंदर्यातिशया अशी वसतसे जादू करांमाजी या”.
निसर्गाच्या हातातील कुंचल्याचे चार फटकारे चराचरात चैतन्यपूर्ण चित्र निर्माण करतात. तेही क्षणाधार्त ! कधी त्या कुंचल्यातून मुक्तपणे चित्रविचित्र आकाराची,निरनिराळ्या लांबी-रुंदीची पाने निर्माण होतात, तर कधी त्याच्या मनातील भावना सूर्य फुलापासून तर प्राजक्ताच्या फुलांपर्यंत सौंदर्य घेवून साकार होतात आणि फळे तर विविध रंगरूपांबरोबर स्वादही घेवून येतात. आंब्याची गोडी, लिंबाचा आंबटपणा, चिंचेचा गोड-आंबटपणा, आवळ्याचा तुरटपणा, मिरचीचा तिखटपणा यासर्व गोष्टी निसर्गाशी नक्कल करणार्या मानवी कारागिराला कधी त्याच्या नकली चित्रांमध्ये निर्माण करता आल्या आहेत कां ? फुलांतील सुगंध व ताजेपणा पाकळ्या मधील मुलायमता कागदावर उमटवता येईल कां ?विविध पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज, नदीची खळखळ, पानांची सळसळ कुणा गायकांच्या गळ्यात किंवा कलाकाराच्या वाद्द्यात साकार होवू शकेल का?
मानवी कलाकार निसर्गातील मानव, प्राणी, झाडे, डोंगर, दर्या यांचे स्मरण करून चित्र काढतो. पण निसर्गाने हत्तीसारखा लांब सोंडेचा, जिराफासारखा लांब मानेचा, सिंहासारखा शक्तिमान, आणि हरिणा सारखा चपळ प्राणी तयार करताना कोणता आदर्श डोळ्या समोर ठेवला असेल? मानवाची निर्मिती करताना तर त्याने पराकोटीची कल्पकता उद्योगात आणली आहे.एकासारखा दुसरा नाही. दोन जुळी भावंडे सुद्धा रूप-लक्षणात, वागण्या-बोलण्यात एकसारखी असत नाही. त्यांचा रंग-रूप, स्वभाव, उंची,जाडी लकबीही कितीतरी वेगवेगळ्या आढळतात. निसर्गाची हि किमया पाहिली की स्वत:ला सर्व श्रेष्ठ समजणार्या मानवाची मती गुंग होते.
ग्रह, तारे, डोंगर, दर्या, जलाशय यांची निर्मिती करण्याची कला निसर्गाला कशी अवगत झाली हे अनाकलनीय आहे. निसर्गाने ग्रहांभोवती उपग्रहांची एक प्रकारे रांगोळीच काढली आहे. त्याने हिमालया सारख्या पर्वत राजाला पांढरा शुभ्र बर्फाचा मुकुट चढविला आहे. क़ाही पर्वत हिरवेगार केलेले आहेत आणि काही तर उघडे-बोडके. निसर्गाने ज्याप्रमाणे प्रशांत महासागरासारखे अथांग व अफाट सागर निर्माण केले, त्याप्रमाणे चिमुकली सरोवरेही निर्माण केली आहेत. सजीव सृष्टीला वरदान असणार्या नद्या तर एखाद्या तेजस्वी मौक्तिक माळेप्रमाणे धरणी मातेच्या गळ्याभोवती रुळत असतात.
निसर्गाने केलेली आकाशातील रंगांची उधळण ती काय वर्णावी! आणि ती आकाशगंगा शुभ्र पांढरी, शुक्राची चांदणी निळसर पांढरी, मंगळाची प्रभा लालसर पिवळी आणि सर्वात कळस म्हणजे आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य! वर्षाऋतू तील उनपावसाच्या खेळातून होणारी ती आकाशातील चंदेरी-सोनेरी, तांबूस ती बरसात ! आ $.. हा…
म्हणून बालकवी म्हणतात- “वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगलतोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे”.
आकाशातील हे विविध रंग चितारत असता कुचल्यांचे थेंब पृथ्वीवर पडले आणि रंगबीरंगी फुले, फुलपाखरे, पक्षी यांच्या गात्रांत विविध रंगाच्या छटा उमटल्या.पोपट हिरवागार, तर त्याची चोच लाल चुटुक आणि डोळे काळेभोर. निसर्गाला त्याच त्याच रंगांचा कंटाळा आला तर तो पंचरंगी पोपट सुद्धा निर्माण करतो. आणि फुलपाखरा मध्ये तर कितीतरी रंग ! मोजदाद तरी किती करणार ? त्याची नावे सांगता येतात? निसर्गाने ईतके रंग आणि रंग छटा निर्माण केल्या आहेत कि ते सारे पाहून माणसाचे डोळे फार थकून जातात.
निसर्ग हा सर्व श्रेष्ठ एकमेवाद्वितीय कलावंत म्हणण्याचे कारण असे की त्याच्या ठायी सार्या कलांचा मनोज्ञ संगम आढळतो. पृथ्वीवरचे कलावंतही सुद्धा त्याचीच निर्मिती आहे. म्हणून तो “गुरुणाम् गुरु” विश्वकर्माच होय याची खात्री पटते. सौंदरर्याचा साक्षात्कार घडवणे हे कलावंतांचे कार्य त्या दृष्टीने क्षणोक्षणी नवनवीन व दिव्य सौंदर्याचा साक्षात्कार घडविणारा निसर्ग हा श्रेष्ठतम कलावंत आहे. हे कोण ना कबूल करील ?