‘मंत्रालयाला लावली आग, घोटाळ्यांच्या फायली खाक’ अशा घोषणा देतच विरोधक सभागृहात आले. कामकाज सकाळी ११ ला सुरू होताच नियम ५७ नुसार सर्व कामकाज बाजूला ठेवून आगीवर चर्चा सुरू करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तोपर्यंत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला होता.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई हे चर्चेच्या मागणीवर ठाम होते. भाजपा, शिवसेना आणि मनसेचे आमदार जोरदार घोषणा देत होते. नियम ५७ नुसार एखाद्या विषयावर चर्चा घ्यायची, तर दिवसभराचे कामकाज आधी घेऊन नंतर त्यावर चर्चा करता येते. तसेच नियम ९७ नुसार चर्चा घ्यायची असेल तर कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार तो विषय सभागृहात येईल, असे अध्यक्ष वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
संतप्त विरोधी सदस्य मात्र चर्चा लगेच घ्या, अशी मागणी करू लागले. या गदारोळात प्रश्नोत्तराच्या तासापर्यंत कामकाज तहकूब झाले. त्यानंतर कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव मंजूर होताच गोंधळाला सुरुवात झाली.
Source : Marathi News.