लांब पल्ल्याच्या रेल्वे तसेच स्थानकांवर मिळणारे पाणी स्वच्छ नसल्याचा शेरा संसदीय समितीने दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्थानकांवरील पाणपोयातील अस्वच्छ असतेच. बंद बाटलीतील पाणीही पिण्यायोग्य नसल्याचे समितीने म्हटले आहे.
रेल्वेच्या स्थायी समितीने आज संसदेत अहवाल सादर केला. पाण्याच्या बाटलीवर उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेटचे लेबल नसते. शिवाय बाटल्या सीलबंद नसतात. रेल्वेगाड्या व स्थानकांवरील अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे रेल्वेचा महसूल तर बुडतोच पण प्रवाशांच्या आरोग्यास धोका पोहचतो, असे या समितीने म्हटले आहे. समितीने रेल्वेस्थानक व गाड्यांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करताना प्रवाशांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली. समितीने विविध रेल्वेस्थानकांना भेटी दिल्यानंतर बहुतांश रेल्वेस्थानकांवर जलकुंभामधील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याचे दिसून आले, असेही अहवालात म्हटले आहे. कॅटरिंग पॉलिसी जुलै २0१0 मध्ये जारी करण्यात आली, परंतु अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली.