अकरावी राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यंगचित्र छापल्याच्या निषेधार्थ राजकीय विश्लेषक एनसीईआरटीचे (नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल ट्रेनिंग अँँड रिसर्च) माजी सल्लागार सदस्य डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करुन कार्यालयातील सर्व सामानाची प्रचंड नासधूस करण्यात आली.
रिपब्लीकन पँथर ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून डॉ. पळशीकरांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
चतु:श्रुंगी पोलिसांनी राहुल भारत खंडारे (वय २५, ता. हवेली) व सुभाष वामन तेलकुटे (वय २५, बुलढाणा) या दोघांना अटक केली असून कार्यालय बंद करण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांविरोधात व्यक्तीश: माझी तक्रार नसून पुणे विद्यापीठ त्यांच्या वतीने कार्यवाही करेल, असे डॉ. पळशीकर यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या ह्यइंडियन कॉन्स्टीट्युशन अँट वर्क या पुस्तकामध्ये घटनेच्या निर्मितीची प्रक्रिया संथगतीने चालली होती हे दर्शवण्यासाठी एक व्यंगचित्र काढण्यात आले होते. ते ५0 वर्षापूर्वीचे व्यंगचित्र २00६ पासून या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे. संसदेत गदारोळ झाल्यानंतर हे व्यंगचित्र मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सल्लागारपदी असलेले योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर यांनी सल्लागारपदाचा राजीनामाही दिला आहे.
डॉ. पळशीकरांशी चर्चा करायची आहे, असे कळवून तीन ते चार कार्यकर्ते तिथे आले. पळशीकरांनी हा विषय त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चेने समाधान न झाल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. खोलीतील सर्व काचा फोडल्या, कपाटे खाली पाडली व सामानाची पूर्णपणे नासधूस केली.
Leave a Reply