अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याला दुसरा कार्यकाल मिळावा म्हणून प्रचाराला शनिवारी सुरुवात केली.
ओबामा यांनी शनिवारी ओहायो राज्यातील कोलंबस येथील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीत घेतलेल्या प्रचारसभेत जमलेल्या सुमारे १० हजार उपस्थितांना आपल्याला पुन्हा निवडून देण्यासाठी साकडे घातले. त्यापाठोपाठ त्यांनी व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी येथे सभा घेतली. या दोन्ही राज्यांत सध्या ओबामा यांच्या डेमोक्रॅट पक्षाच्या विरोधी रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर असले तरी २००८ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत येथेच ओबामांना भरघोस प्रतिसाद मिळाला होता.
ओबामा यांनी सुरुवातीपासूनच आपले विरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रॉमनी यांच्या धोरणांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. रॉमनी एक यशस्वी उद्योजक आहेत. पण ओबामा यांनी त्यांचा उल्लेख रिपब्लिकन पक्षाला धार्जिण्या उद्योगपतींचे रबर स्टँप असा करत खिल्ली उडवली. रॉमनी यांनीही आपल्या प्रचारात ओबामा यांनी गेल्या निवडणुकीत वापरलेल्या होप अँड चेंज या संकल्पनांची टर उडवत त्याऐवजी त्यांची हाइप अँड ब्लेम अशी संभावना केली होती.