इंडोनेशियात तीव्र भूकंप, भारतातही धक्के, सुनामीचा इशारा
इंडोनेशियात आज दुपारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.९ इतकी मोजण्यात आली आहे. इंडोनेशियात झालेला भूकंप हा गेल्या १०० वर्षातील आठवा मोठा भूकंप असून त्यामुळे सुनामीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लिटल अंदमान या बेटाला सुनामीचा धोका असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंडोनेशियामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसल्यानंतर लगोलग भारतातही चेन्नई, कोलकाता, गुवाहाटीसह काही शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांनी ट्विटरवर सांगितले. इंडोनेशियातील आचे या प्रदेशापासून समूद्रात ४९५ किलोमीटरवर व ३३ किमी खोल अंतरावर या जबरदस्त भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या धक्क्यामुळे सुनामीची सूचना लागलीच जारी करण्यात आल्याचे इंडोनेशियाच्या सरकारी अधिका-यांनी सांगितले.