आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो… पण तरीही आपण वाचतो… ते का?
माझ्या आयुष्यात असे प्रसंग एकदा नाही तर अनेकदा घडले. प्रत्येक वेळी मृत्यू अगदी जवळून गेला, पण त्याने मला गाठलं नाही. का? हे फक्त योगायोग होते का? की नियतीची एक मोठी योजना?एका अद्भुत शक्तीने अर्थातच परमेश्वराने मला सुखरूपपणे त्यातून बाहेर काढलं.
या अनुभवांनी मला शिकवलं की आपण इथे नशिबाने नाही, एका विशिष्ट उद्देशाने आलो आहोत. जी अद्भुत शक्ती मला वारंवार वाचवत आहे, तिच्यामुळेच मला जगण्याची नवी प्रेरणा आणि शक्ती मिळते आहे.
*” माझ्या गोष्टीतील देव “* हे माझं खरंखुरं आत्मकथन आहे –
🙏 या प्रसंगांनी मला फक्त संकटातून बाहेर काढलं नाही,
तर स्वतःकडे नव्यानं पाहायला शिकवलं. आता वाटतं, प्रत्येक अनुभव देवाकडून मिळालेली एक पायरी होती — स्वतःच्या शोधाची आणि श्रद्धेच्या खोल प्रवाहात उतरण्याची.
🙏 ही कहाणी जरी मृत्यूपासून वाचलेल्या क्षणांची असली,
तरी खरी यात्रा त्या क्षणांनंतर सुरू झाली — स्वतःला समजून घेण्याची, आणि एका अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवण्याची.
🙏 आज मागे वळून पाहताना जाणवतं —
की मी वाचले, हा फक्त एक चमत्कार नव्हता… तर एक संकेत होता — की अजून काही शोधायचं आहे, अजून काही सांगायचं आहे, आणि त्या शोधात श्रद्धेचा हात धरून चालायचं आहे.🙏🙏
*माझ्या गोष्टीतील देव*
अशाच एका रात्री निरभ्र आकाशाखाली, चांदण्यांकडे बघत झोपले असताना अचानक माझ्या मनात प्रश्न आला की आपण या जगात का आलो आहोत? ज्या अर्थी माणसाचा जन्म मिळाला आहे, त्या अर्थी परमेश्वराने माझ्या वाट्याचे कर्म निश्चित केले असणार. परमेश्वराची आपल्याकडून काय करून घ्यायची इच्छा असेल बरं? या आधी असे प्रश्न कधी मनात येत नव्हते. परंतु त्याला कारण पण असेच घडले होते. काही काळापूर्वी पुण्याच्या दांडेकर पुलावर माझा एक्सीडेंट झाला. हा परिसर दिवस रात्र वाहनांनी गजबजलेला असतो. बस आणि ट्रक्सची तिथे अव्याहतपणे वाहतूक चालू असते. संध्याकाळची साडेपाचची वेळ होती ती. मी दोन चाकी गाडीवरून चालले होते. अचानकपणे कळायच्या आत साधारण 14 वर्षाचा मुलगा सायकल वरून आला आणि थेट माझ्या गाडीवर येऊन आदळला. तो इतका जोरात मला धडकला की आम्ही दोघेही रस्त्यावर पडलो. त्यावेळेला मला काहीच जाणवलं नाही. मी गाडी घेऊन घरी आले. तो मुलगाही आपल्या घरी निघून गेला. घरी पोचल्यावर थोड्यावेळाने माझा हात हळूहळू सुजायला लागला. तो इतका सुजला की वेदना असह्य होऊ लागल्या. मी ताबडतोब डॉक्टरांकडे गेले. माझा उजवं मनगट फ्रॅक्चर झालं. दोन ठिकाणी हाडे मोडली.आता या घटनेचा विचार करते तेव्हा मनात विचार येतो की, संध्याकाळच्या साडेपाचच्या वेळेला दांडेकर पुलाच्या चौकात, जिथे माझा एक्सीडेंट झाला, तो रस्ता मोकळा होता. ही एक अति आश्चर्यकारक गोष्ट होती. तो चौक वाहनांनी सतत गजबजलेला असतो. आम्ही दोघेही रस्त्यावर पडल्यावर मागून एखादी बस,कार किंवा ट्रक आला असता तर काय झालं असतं… कल्पनेने पण अंगावर शहारे येतात. म्हणजे मृत्यू माझ्या जवळून गेला. हे फक्त आजच माझ्या बाबतीत घडलेलं नाहीये. मागील पन्नास वर्षात अनेक वेळेला मी मृत्यूला सामोरे जाऊन सुखरूपपणे परत आलेली आहे. आणि म्हणूनच हा विचार वारंवार डोक्यात येतो आहे की परमेश्वराने आपल्याला का वाचवलं असेल बरं? जेव्हापासून माझे गाव पिलीव येथे राहायला आले,निसर्गाच्या खूप जवळ आले, रोज चंद्र आणि चांदण्यांकडे बघत झोपायचे भाग्य मिळायला लागले, प्रपंचाच्या जबाबदारीतून थोडी मोकळी झाले, तेव्हा स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला वेळ मिळाला. आणि त्यामुळेच हा विचार वारंवार मनात येऊ लागला .
माझे पिलीव गाव, जिथे आम्ही राहतो ते अगदीच छोटे खेडे आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील हे एक गाव आहे. तसा हा सगळा प्रदेश दुष्काळी भागात मोडतो. परंतु आमच्या गावातून कॅनॉल गेला असल्यामुळे पिलीवचा सगळा परिसर अगदी हिरवागार असतो. आमच्या कुटुंबाचा पिलीव चा इतिहास खूप जुना आहे. माझे खापर पणजोबा जवळजवळ 100 वर्षांपूर्वी पिलीवला आले होते. तो इंग्रजांचा काळ होता.आत्ताचा जो कॅनॉल आहे, तो माझ्या खापर पणजोबांनीच बांधला आहे. माझं बालपण ज्या वाड्यात गेलं तो वाडा पण त्यांनी 100 वर्षांपूर्वी बांधला होता. पुढे आणि मागे अंगण, तीन फूट रुंदीच्या भिंती असलेला हा मोठा वाडा होता. छप्पर धाब्यांची होती. म्हणजे खाली लाकडी पट्ट्यांचे छत आणि वरती दोन फुटांचा शाडूच्या मातीचा थर असे हे घर होते. छप्पर इतके मजबूत होते की संपूर्ण पावसाळ्यात एक थेंब सुद्धा पाणी खाली यायचे नाही. मागचं अंगण दगड ,मातीचं होतं.पिलीव तसं छोट असलं तरी शांत गाव आहे. चोरी मारी, गुंडगिरी असे प्रकार इथे अजिबातच नाहीत. त्यामुळे एक सुरक्षितता पण वाटते. माझे वडील त्यांच्या वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला आले. तेव्हापासून आमच्या कुटुंबाचे वास्तव्य पिलीव मध्येच आहे.मी आणि माझे पती सुधीर आम्ही दोघांनी ही या सुंदर गावात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला . माझे आई-वडील आणि भाऊ अजय व त्याचे कुटुंब तिथेच राहतात आणि शेती करतात. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घेणं अगदीच सोपं होतं.आता आम्ही पण तिथे शेती करतो.
पिलीव मध्ये राहायला आल्यापासून माझ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सतत डोक्यात येऊ लागले. माझे नशीब बलवत्तर आहे,हे तर नक्कीच आहे.परंतु परमेश्वराने आपल्याकरता काय कार्य करायचे ठेवले असेल काही समजत नाही.काही वेळेला वाटतं की मला अचानक स्फुरलेली कला तर नसेल ना? ज्यामध्ये माझं काही कार्य बाकी असेल का?किंवा मी बारा-तेरा वर्ष स्वतःच्या घराचं स्वप्न बघितलं होतं, ते तर परमेश्वराने माझ्याकडून पूर्ण करून घेतले नसेल ना?म्हणूनच परमेश्वराने मला इतके वेळेला जीवदान दिले असावे.
आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा मृत्यूला सामोरी गेले तो प्रसंग मला आठवायचे तसे काहीच कारण नाही. पण आईकडून त्याचे वर्णन ऐकले आहे.आईचा या प्रसंगाचा लेख ‘सकाळ’या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाला होता. त्यावेळेला जेमतेम दोन वर्षांची होते मी.आई माझ्या लहान भावाच्या वेळेला 9 महिन्याची गर्भवती होती. तिच्या बाळंतपणाकरिता मी,आई, बाबा, आजोबा(आईचे वडील) व इतर काही नातेवाईक पुण्याला जीपमधून निघालो होतो.त्याकाळी जीपमध्ये सुरक्षा बेल्ट नसायचे आणि दारं पण नसायची. आजोबा खरंतर अगदी सेफ ड्रायव्हर होते असे म्हणत. पण त्या दिवशी काहीतरी विचित्र घडणार होते ते कोणाला ठाऊक होते. आम्ही पहाटेच्या वेळेला पुण्याला निघालो होतो. हळूहळू दिवस उजाडायला लागला होता.आजोबा गाडी चालवत असताना अचानक त्यांचा जीप वरचा ताबा सुटला आणि रस्ता सोडून गाडी चार-पाच कोलांट्या खाऊन खाली पडली. बापरे… काय भयंकर असेल ते दृश्य. क्षणभर विचार केला तर वाटतं, जर गाडीने चार-पाच कोलांट्या खाल्ल्या तर काय होऊ शकतं.. एक तर आम्ही सगळे जीपमधून बाहेर फेकले गेलो असतो, नाहीतर कुणीतरी गाडीखाली अडकलं असतं. मी तर दोन वर्षाची चिमुरडी होते. माझ्या बाबतीत तर हे घडणं अगदी शक्य होते. त्यात अजून भयंकर म्हणजे शेजारी कॅनॉल होता. गाडी कॅनॉल मध्ये पडता पडता वाचली होती.तो प्रसंग काय भीषण असेल याची कल्पनाही न केलेली बरी. खरंतर मरण यायला एक छोटसं निमित्त पुरेसं असतं. आम्ही तर मरणाच्या दारातच उभे होतो.सगळ्यात सुदैवाची गोष्ट म्हणजे ,आम्ही सगळे या भीषण अपघातातून सुखरूप वाचलो होतो. माझ्या मनात उगीचच विचार येतो मी तर जेमतेम दोन वर्षाची चिमुरडी होते,गाडीखाली अडकणं अगदीच सहज शक्य होतं. या प्रसंगाचा माझ्या आजोबांना इतका जबरदस्त धक्का बसला होता की त्या दिवसापासून चार चाकी वाहन चालवणे त्यांनी बंद केले. परमेश्वराने मला दिलेले हे पहिले जीवदान.
दिवस ,वर्षे उलटत होती. मी आठ वर्षांची होते. पिलीवला आम्ही सगळे आमच्या वाड्यात राहत होतो. याच काळात असा एक क्षण आला, जिथे मृत्यूचा स्पर्श अगदी जवळून जाणवला… पण जीवनाने पुन्हा मला कवेत घेतलं. मला चांगलं आठवतंय. संक्रांतीचे दिवस होते. सगळीकडे मुलं पतंग उडवत होती. मला पण पतंग उडवायला खूप आवडायचा. मी आणि चार वर्षांचा धाकटा भाऊ अजय, गच्चीवर पतंग उडवायला गेलो. सकाळी दहाची वेळ होती. अर्थातच मी पतंग उडवत होते आणि अजय पतंग कसा उडतो आहे ते बघत होता. जुन्या पद्धतीचं घर असल्यामुळे आमच्या गच्चीला कठडा नव्हता. तसे गावातल्या कुठल्याच जुन्या घरांच्या गच्चीला कठडे नव्हते. पतंग वर जाईल तशी मी दोरीला ओढ देऊन मागे जात होते आणि पतंग जास्त वर जात होता. मी किती मागे जाते आहे हे मला कळतच नव्हतं. आणि ….पुढच्या क्षणाला, काही समजण्याच्या आत मी गच्चीवरून 12 फुट खाली उलटी पडले .आठ वर्षांच्या मुलीच्या जीवाचं बरं वाईट होण्याकरता बारा फूट खूप होते. त्यावेळी अजय इतका लहान होता की गच्चीवरून ओरडून आईला सांगायचे पण बहुदा त्याला समजले नसावे. त्याने पतंग गोळा केला आणि खाली येऊन आईला सांगितले की आपली दीदी (मला सगळे दीदी म्हणतात) गच्चीवरून खाली पडली आहे. ते ऐकून माझी आई हातातील सगळी कामे टाकून धावतच अंगणात आली आणि समोरचे दृश्य बघून भयंकर घाबरली. मी अंगणात बेशुद्ध होऊन पडले होते. तिथे सगळीकडे दगड वर आले होते. मी जिथे पडले तेथून जेमतेम अर्ध्या फुटाच्या अंतरावर एक मोठी दगडी शीळा होती. म्हणजे माझ्यात आणि मृत्यूत फक्त सहा इंचाचे अंतर होते. पण माझे नशीब खूपच बलवत्तर होते ना…. मी शीळेवर पडले नव्हते. आठ वर्षांच्या मुलीला बारा फुटावरून पडणे हेच खरं तर खूप होते. त्यातून शीळेवर पडणे म्हणजे कपाळमोक्ष झाला असता. बापरे.. विचार न केलेलाच बरा. माझी शुद्ध हरपली होती. संक्रांतीचा सण असल्यामुळे मी काचेच्या बांगड्या घातल्या होत्या, त्या फक्त फुटल्या.आईने भराभर तोंडावर पाणी शिंपडल्यावर मी शुद्धीवर आले. आईला जरा हायसे वाटले. पण शुद्धीत आल्यावर मी आईला एक प्रश्न विचारला ” माझा टूथब्रश कुठे आहे? मला दात घासायचे आहेत.” माझे हे वाक्य ऐकल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण सकाळचे दहा वाजले होते आणि माझे दात तर सकाळी सात वाजता घासून झाले होते. आईला वाटलं डोक्याला आतून काहीतरी इजा झाली असणार. ती खूपच काळजीत पडली. सकाळची वेळ असल्यामुळे माझे बाबा मळ्यात गेले होते.आईने बाबांना पटकन कोणालातरी बोलवायला पाठवलं. ते पण शेतात करत असलेली कामे टाकून ताबडतोब आले. त्यांनी मला तातडीने पिलीव पासून 35 किलोमीटर दूर असलेल्या अकलूज या गावी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथेच फक्त चांगल्या हॉस्पिटलची सोय होती .त्याकाळी म्हणजे 45 वर्षांपूर्वी चार चाकी गाड्या कोणाकडेच नसायच्या. पण त्यावेळी गाडीची सोय कशी झाली, ही पण एक आश्चर्यकारक गोष्ट होती. परमेश्वराची कृपाच होती ना ती… डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि खबरदारीचा उपाय म्हणून मला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले. जीवाचा धोका टळला आहे ,हे समजल्यावर डॉक्टरांनी घरी जायला परवानगी दिली. या प्रसंगाचे गांभीर्य कळण्याइतकी त्यावेळेला मी मोठी नव्हते, पण आता विचार केला तर वाटते माझ्या नशिबाची दोरी नक्की बळकट असली पाहिजे.
कुठलीही शारीरिक इजा न होता दुसऱ्यांदा अलगदपणे, मी मृत्यूच्या दारातून बाहेर आले होते. परमेश्वराचं सुरक्षाकवच माझ्या भोवती असावं – सर्व बाजूंनी मला व्यापून, सर्व संकटांपासून रक्षण करणारं, एक अखंड, दिव्य कवच.🙏
या अपघातानंतर दोन वर्षांनी पिलीवच्या जिल्हा परिषद शाळेतून मी चौथीची परीक्षा पास झाले. त्यावेळेला मी दहा वर्षांची होते . पुढील शिक्षणाकरिता आई वडिलांनी मला पुण्याच्या प्रसिद्ध मुलींच्या हुजूरपागा शाळेत, इयत्ता पाचवीत वसतीगृहात शिकायला ठेवायचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणाची पिलीव सारख्या खेड्यात चांगली सोय नव्हती. माझी आजी,काका जवळच नारायण पेठेत राहत असल्यामुळे आई- बाबांना तशी काळजी नव्हती. या दोघांनी माझ्यासाठी घेतलेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता आणि त्याबद्दल मी आयुष्यभर त्यांची ऋणी आहे. त्यांच्या या एका निर्णयामुळे माझं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं. हा निर्णय माझ्या आयुष्याला खूप मोठं वळण देणारा असेल असं त्यावेळेला दोघांनाही वाटलं नसेल. मी हुजूरपागेत शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या काळी वसतीगृहात आई, वडील भेटायला येणे आत्ताइतके सोपे नव्हते. वाहनांची सोय नसायची. फोन नव्हते. आमच्याकडे चारचाकी गाडी पण नव्हती .फक्त आईची सतत पत्रे यायची. तेवढाच काय तो संपर्क असायचा. गणपती, दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी पिलीवला जायचे. त्यावेळेला माझा धाकटा काका सुधीर याचा खूप आधार वाटायचा. त्याच्या ओळखीमुळेच शाळेत ॲडमिशन मिळाली होती. तो दर रविवारी भेटायला यायचा. अलका काकू, आत्या आणि आतेभाऊ प्रशांत दर रविवारी काहीतरी खाऊ घेऊन भेटायला यायचे.या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हुजूरपागेत रमू शकले. खरंतर आज मी जी काय आहे ती सुधीर काकामुळेच आहे, असं म्हणलं तरी चुकीचे ठरणार नाही.आज तो या जगात नाही परंतु त्याच्या बद्दलची कृतज्ञता अजूनही माझ्या मनात तशीच आहे . कारण त्याच्यामुळेच मला हुजूरपागेत प्रवेश मिळाला. बास्केटबॉल शिकवणारे अमृत पुरंदरे सर त्याचे मित्र होते.त्यामुळे मी बास्केटबॉल खेळायला लागले आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. आज जी काही कणखर बनले आहे ,आयुष्यातल्या कुठल्याही संकटांना धैर्याने सामोरी जाते, कुठलेही कष्ट करण्याची आणि जोखीम हाताळायची कायम तयारी असते, हे फक्त अमृत सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले. आयुष्याकडे कसं बघायचं, ते कसं जगायचं अशा असंख्य गोष्टी त्यांनीच आम्हाला शिकविल्या.आयुष्यात कधीही हार मानायची नाही ,शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहायचे आणि प्रत्येक प्रसंगाकडे कायम सकारात्मक दृष्टीने बघायचे या सगळ्या गोष्टी अमृतसर आणि बास्केटबॉल मुळेच मी शिकले. अजून एक गोष्ट इथे मला नमूद करायची आहे की, हुजूरपागेच्या वास्तव्यात माझ्यावर संस्कार केले ते रणदिवे आणि आगटे या दोन वसतीगृहातल्या पर्यवेक्षिकांनी. त्यांच्या कडक पण प्रेमळ शिस्तीत मी लहानाची मोठी झाली.
हुजूरपागेत दहावीत असताना तिसरी घटना घडली. परत एकदा मृत्यू जवळ आला होता, पण त्या ईश्वरी कवचाने त्याला अडवलं.हा प्रसंग तर जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर आहे. दहावीच्या बोर्डाची प्रिलिम परीक्षा होती. नेमके त्याच वेळेस मला मांडीला आतल्या बाजूला गळू झाले होते. माझे छोटे ऑपरेशन करावे लागले. त्यामुळे मी परीक्षा देऊ शकले नाही. त्या काळात खूप तणावाखाली होते.ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी मला 15 दिवसांचा औषधांचा कोर्स दिला होता.पहिले दोन दिवस तसा काही त्रास झाला नाही. नंतर थोडसं डोकं दुखायला लागलं. मला वाटलं की अँटिबायोटिक मुळे आणि ऑपरेशन झाल्यामुळे कदाचित हा त्रास होत असेल म्हणून थोडसं दुर्लक्ष केलं. चार दिवसानंतर चक्कर पण यायला लागली आणि मळमळायला लागलं. लगेचच मी आणि अलका काकू डॉक्टरांकडे गेलो. तोपर्यंत माझा 10 दिवसांचा औषधांचा कोर्स घेऊन झाला होता.मी घेतलेली औषधे त्यांना दाखविली. ती बघून त्यांना धक्काच बसला .त्यांचा चेहरा एकदम बदलला. त्यांनी प्रश्न केला की तू अजून जिवंत कशी आहेस? मेली कशी नाहीस? मला तर त्या वेळेला काहीच समजले नाही.चेहरा पांढरा फटक पडला. मी आणि अलका काकू, आम्ही दोघी ही बुचकाळ्यात पडलो. दहा दिवस मी चुकीच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्या गोळ्या माझ्या शरीराकरता खूपच धोकादायक होत्या. त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता .मेडिकल स्टोअर मधल्या विक्रेत्यांनी मला चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या. किती भयानक होते हे सगळे… जीवघेण्या प्रसंगातून मी वाचले होते. माझी वर्ग मैत्रीण मनीषा दाते हिने या काळात मला खूप धीर दिला. आता विचार केला तर वाटतं कशी काय वाचले मी ? मला काहीच झालं नव्हतं किंवा शरीरावर कुठले दुष्परिणाम पण झाले नव्हते. वारंवार मृत्यू माझ्याभोवती घिरट्या घालत होता, पण त्याच्यापेक्षाही बळकट एक अदृश्य हात मला वाचवत होता.
काही वर्षांनी पुण्यातील प्रसिद्ध एस. पी. कॉलेज मधून पदवी घेतली . माझे लग्न सुधीर श्रीखंडे यांच्याशी झाले आणि पुण्यात स्थायिक झाले. आम्हाला श्रेया आणि नेहा या दोन मुली आहेत. पती आयटी क्षेत्रात असल्यामुळे अमेरिका, नेदरलँड, जर्मनी देशांमध्ये आमचे बरेच वर्ष वास्तव्य राहिले आहे. त्या काळात आमचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. खूप छान काळ होता तो. परंतु परमेश्वराच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. नेदरलँड मध्ये असताना माझ्या आयुष्यात चौथा प्रसंग घडला. तो खूपच भयंकर होता .मृत्यू परत एकदा दबा धरून बसला होता . 2006 मधील थंडीचे दिवस होते . आम्ही इंडोवेन ह्या शहरात राहत होतो.सुधीर फिलिप्स मध्ये काम करत होता. या देशाचं वैशिष्ट्य असं की हा देश समुद्र सपाटीच्या खाली आहे आणि तिथे सतत पाऊस, सोसाट्याचे वारे आणि ढगाळ हवा असते. नेदरलँड चे अजून एक वैशिष्ट्य असं की तिथे सगळेजण सायकल वापरतात. नेदरलँडला राजा आहे. तो सुद्धा सायकल चालवतो. त्या देशात सायकलकरता वेगळे ट्रॅक आणि सिग्नल आहेत.आमच्याकडे कार होती. परंतु मी ,सुधीर,मोठी मुलगी श्रेया आम्ही सगळे सायकल चा वापर करत असू. लहान मुलगी नेहाला शाळेत सोडायला आणि आणायला मी सायकल वरून जायचे .नेहा चार वर्षांची असल्यामुळे सायकलच्या मागे लहान मुलांचे स्पेशल सीट लावले होते . त्यात ती बसायची. अशाच एका कडाक्याच्या थंडीच्या दिवशी दुपारी नेहाला शाळेतून आणायला निघाले होते. पाऊस पडत होता आणि सोसाट्याचे वारे पण वाहत होते. मी सिग्नल वर थांबले होते. हिरवा सिग्नल लागल्यावर मी पुढे जायला सुरुवात केली. रस्ता रिकामा होता. पण अचानक काही कळायच्या आत सुसाट वेगाने एक कार सिग्नल तोडून माझ्यावर येऊन आदळली. ती कार माझ्या सायकलवर इतकी जोरात आदळली की मी हवेत उडून खाली पडले. खरंतर नेदरलँड मध्ये वाहतुकीचे नियम खूप काटेकोरपणे पाळले जातात. कोणीही सिग्नल तोडून जात नाही.पण त्या दिवशी हे कसं घडलं माहित नाही. मी रस्त्यावर पडले होते , पण शुद्धीत होते. कशीबशी उठून उभे राहायचा प्रयत्न करत होते . पण पुढच्या क्षणी काही कळायच्या आत रस्त्यातच कोसळले आणि माझी शुद्ध हरपली. जेव्हा थोडी शुद्धीत आले तेव्हा मी ॲम्बुलन्स मध्ये होते. पाच मिनिटात ॲम्बुलन्स आली होती म्हणे. इतक्या लवकर ॲम्बुलन्स आलेली कधी ऐकली पण नाहीये आणि पाहिली पण नाहीये .ते नेदरलँड मध्ये असल्यामुळे शक्य झालं किंवा कदाचित माझा जीव वाचणार होता म्हणून ते शक्य झालं.अर्धवट शुद्धीत असताना नेहाची काळजी वाटायला लागली होती. तिला घरी कोण घेऊन जाणार , श्रेयाला कसे समजणार अशा प्रश्नांचे डोक्यात काहूर माजायला लागले होते . तेवढ्यात नशीब चांगले की ॲम्बुलन्सच्या दारात एक ओळखीचा चेहरा आत डोकावताना दिसला . नेहाच्या वर्गातील मुलीची आई होती ती. ग्लानीतच असताना नेहाला आणि श्रेयाला तिच्या घरी घेऊन जायला सांगितले. मुलींच्या काळजीने जीव कासावीस झाला होता . परमेश्वराचा धावा करत होते. पण पुन्हा माझी शुद्ध हरपली. मला कसले तरी इंजेक्शन दिल्याचे आठवते आहे. अर्धवट शुद्धीत ॲम्बुलन्स मधल्या नर्सला विचारलं होतं की मी बरी आहे ना ?मला काही गंभीर झालं नाही ना? पण तिच्याशी बोलताना माझ्या डोळ्यावर सारखी ग्लानी येत होती . अर्धवट शुद्धीत असताना परमेश्वराकडे प्रार्थना करत होते. सुधीरच्या आणि मुलींच्या काळजीने जीवाचा थरकाप उडत होता. जीवाचे काही बरे वाईट झाले तर? माझ्या दोन चिमुकल्या मुलींचे काय होणार? या विचारांनी सारखे रडू येत होते. आता सुद्धा तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो . मी कधी हॉस्पिटलमध्ये पोचले समजले ही नाही. परंतु जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सुधीरला बघून रडूच कोसळले. आपण जिवंत आहोत याचे भान झाले. माझ्या शरीरावर सगळीकडे वेगवेगळी उपकरणे लावली होती. आपण असा प्रसंग फक्त सिनेमातून पाहिलेला असतो. माझ्या स्वतःच्या बाबतीत तो प्रत्यक्ष घडला होता. एका अद्भुत शक्तीने चौथ्यांदा माझे प्राण वाचवले होते .हॉस्पिटल मधून आल्यावर सुधीरला विचारले की तुला अपघाताबद्दल कसे समजले? त्याने जे वर्णन केले ते ऐकून तर माझ्या जिवाचा थरकाप उडाला. ज्या चौकात माझा अपघात झाला होता, त्या चौकात आमचे घर मालक उभे होते. काय योगायोग होता हा… त्यांनी अपघात होताना प्रत्यक्ष पाहिला होता. मी कारच्या पुढच्या काचेवर जबरदस्त आदळून हवेत उडून खाली पडले होते. कारच्या पुढच्या काचेचा चक्काचूर झाला होता. पण मला कुठलीही जखम झाली नव्हती. त्यांनी मला ओळखले. मी त्यांना पाहिल्याचे आठवत नाही.कदाचित तोपर्यंत माझी शुद्ध हरपून रस्त्यावर कोसळले असेन. सुदैवाने सुधीरचा फोन नंबर त्यांच्याकडे असल्यामुळे, लगेच त्याला फोन करून माझ्या अपघाताबद्दल माहिती दिली . तो पण खूप काळजीत पडला . लगेचच कार घेऊन ऑफिसमधून निघाला .(नेमका त्यादिवशी कार घेऊन तो गेला होता. सायकल असती तर लवकर पोहोचला असता) माझा अपघात आणि कोसळणारा पाऊस यामुळे रस्त्यात प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याला हॉस्पिटल मध्ये पोहोचायला बराच उशीर झाला. माझ्या अनेक चाचण्या करून झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटल मधून घरी परतलो. माझ्या मैत्रिणीनी श्रेया आणि नेहाला रात्रीचे जेवण देऊन घरी आणून सोडले. लहान नेहाला बघून रडूच कोसळलं. विचार केला एक्सीडेंट झाला तेव्हा ती जर सायकलवर माझ्यामागे बसलेली असती तर…. विचारांनी अंगात अक्षरशः कापरं भरलं. ती सुखरूप आहे बघून जीवाला हायसं वाटलं. रात्री कशीबशी झोपले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी बेड वरून उठायचा प्रयत्न केला, तेव्हा मला शरीर तसुभर पण हलवता येत नव्हते . बेडवरून उठता येत नव्हते.प्रचंड वेदना होत होत्या.शरीराला आतून जबरदस्त मार बसला होता. पंधरा मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर कशीबशी उठले.आता हे काय नवीन संकट आहे समजेना. डॉक्टरांनी सुधीरला या परिस्थितीची कल्पना दिली होती.त्यांनी सांगितलं होतं की तिला रात्री उठवा आणि काही असंबद्ध प्रश्न विचारा की ज्याच्यात आकडे असतील .ते तिला नीट सांगता आले पाहिजेत .नाहीतर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये येऊन मेंदूच्या तपासण्या करायला लागतील. काय सगळे भयंकर होते. सुदैवाने सुधीरने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची मला नीट उत्तर देता आली होती . अशा परिस्थितीत आठ दिवस काढले .संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या. जीवन मरणाच्या या प्रसंगातून बाहेर पडल्यावर परमेश्वराकडे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नव्हते. त्या आठ दिवसात मनात विचारांचे वेगळेच काहूर माजले होते. मृत्यू अगदी जवळून जाताना पाहिला होता… परंतु जाताना जणू तो मला काही सांगत होता — ‘परत जा… आयुष्याची कहाणी अजून अपूर्ण आहे’. त्या क्षणी मला उमगलं, हा अनुभव फक्त एक घटना नव्हती, ही तर एक खूण होती — की आयुष्यात काहीतरी कार्य अजून बाकी आहे. मी नि:शब्द झाले होते. मनात एक शांतता जाणवत होती.अचानक आपल्या घराची,आपल्या देशाची, आपल्या मातीची ओढ प्रकर्षाने जाणवायला लागली. सगळं सोडून लगेचच भारतात परत जावे असं वाटू लागलं. खरंतर नेदरलँड मध्ये घर घेऊन स्थायिक होण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. पण नियती काहीतरी वेगळं सांगत होती. परदेशात राहताना अनेक सुखं अनुभवली. तिथली प्रगती,गतिशीलता मनाला भारावून गेली. परंतु सर्व सुख सोयींनी भरलेलं आयुष्य सोडून प्रकर्षाने आपल्या मातीची ओढ वाटू लागली.काहीतरी अधुरं वाटू लागले.कदाचित घडलेला हा प्रसंग आम्हाला भारतात परत यायला कारणीभूत ठरला असावा.
हॉलंड मधील अपघातानंतर एक वर्षानी आम्ही भारतात परतलो. त्यानंतर सुधीरच्या कामानिमित्त दीड वर्षाकरिता जर्मनीमध्ये पण वास्तव्य झाले. भारतात परतल्यावर मी कायद्याची पदवी प्राप्त केली. आयुष्य सुरळीत चालू होतं . मृत्यूने परत एकदा माझ्यावर झडप घालायचा प्रयत्न केला .2015 साल होते ते. त्या काळात धाकटी मुलगी नेहा बॅडमिंटन खेळायची .तिच्या राज्यस्तरीय स्पर्धे करता आम्ही रत्नागिरीला गेलो होतो. आमच्या बरोबर माझी पुतणी रेवती (ती पण बॅडमिंटन खेळाडू होती) आणि दीर जयदीप होते.स्पर्धेदरम्यान संध्याकाळी आम्ही इतर खेळाडू आणि त्यांचे पालक असे आठ ते दहा जण समुद्रकिनारी जेट्टीवर फिरायला गेलो होतो. जेट्टी समुद्रापासून पंधरा ते वीस फूट उंच असावी. सूर्य मावळतीची वेळ होती. सगळीकडे छान संधिप्रकाश पडला होता. वातावरण छान होतं . जेट्टीवर फिरून परतायला लागलो तेव्हा अंधार पडायला लागला होता. माझ्या पुढे असलेल्या सगळ्यांना नीट खाली बघून चाला, जेट्टी वरचा रस्ता वळतो आहे अशा सूचना देत होते. मी पण जेट्टी वरून चालत होते. बारा वर्षाची रेवती माझ्या मागून चालत होती.तेवढ्यात मागून तिचा जोरात आवाज आला “अनुराधा काकू काय करतीयेस? पुढे बघ. मी एकदम दचकून थांबले आणि समोरचे दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी जेट्टीच्या टोकावर उभी होते. जर रेवतीने मागून आवाज दिला नसता तर माझे पुढचे पाऊल थेट समुद्रात पडलं असतं. मी इतक्या टोकावर उभी होते की एक क्षण जरी रेवतीने उशीर केला असता तर काय झाले असते याचा विचार न केलेलाच बरा. माझ्यात आणि मृत्यूमध्ये फक्त एक क्षणाचं अंतर होतं.मी तिथपर्यंत कशी पोहोचले हे अजिबात आठवत नाहीये. कुठल्यातरी तंद्रीमध्ये पुढे चालले होते. तोपर्यंत संपूर्ण काळोख पडला होता. खाली सगळा खडकाळ समुद्र होता. मला खरं तर पाण्याची खूप भीती वाटते आणि पोहता पण येत नाही. कुणाला कळायच्या आत मी समुद्रात पडले असते. रात्रीची वेळ असल्यामुळे पटकन कुणाच्या लक्षात पण नसते. पुढे काय झाले असते याची कल्पना न केलेलीच बरी . खडकाळ समुद्र, कपारी ,किर्र अंधार या सगळ्यांवर मात करून परत एकदा मरणाच्या दारातून सुखरूप परत आले होते .आता जेव्हा या घटनेचा विचार करते तेव्हा वाटतं की रेवतीचे माझ्याकडे लक्ष गेले नसते तर, या जगात असते की नाही माहित नाही . कदाचित असते तर कुठल्या स्थितीत असते? विचार केला तरी अक्षरशः मनाचा थरकाप उडतो.रेवतीच्या रूपात परमेश्वरच जणू काही माझ्या पाठीशी उभा होता. त्याने मला पाचव्यांदा जीवदान दिले होते. परमेश्वराच्या मनात माझ्या करता काय आहे, मला खरंच समजत नाही. कधी कधी जीवनात इतक्या उलटसुलट घटना घडतात, की आपण गोंधळून जातो. माझ्या आयुष्यातील या घटना तर मला पूर्णतः अनाकलनीय वाटतात. अशा वेळी मनात एक विचार येतो — “हे सगळं का घडतंय? देवाच्या योजनेत माझं स्थान काय आहे?”आपण कितीही विचार केला तरी परमेश्वराच्या योजनांची खोली आपल्या समजण्यापलीकडची असते. त्याचं मन, त्याचा हेतू — हे इतकं व्यापक आणि सूक्ष्म असतं की, हे कधीच स्पष्टपणे दिसत नाही. पण एक मात्र नक्की आहे ,तो माझ्या पाठीशी आहे.
इतक्या वर्षांच्या अनुभवातून आणि जीवघेण्या प्रसंगातून बाहेर पडल्यावर असं जाणवलं की, परमेश्वराने काहीतरी वेगळीच योजना आखून ठेवली असावी आणि कदाचित त्याच योजनेतून माझं जीवन हळूहळू एका नव्या दिशेने सुरू झालं. आयुष्यात निरनिराळे व्यवसाय आणि नोकरी केल्यामुळे बराचसा अनुभव गाठीशी होता. त्याचा उपयोग कुठेतरी करून घ्यावा ,असा विचार करत होते . पण परमेश्वराच्या मनात काहीतरी निराळंच होतं . 2019 मधील घटना आहे ही. करोनानी जगभर थैमान घालायला सुरुवात केली होती. सगळीकडे भीतीचे वातावरण होते. उद्या आपण या जगात असू का नाही याची कोणालाच शाश्वती नव्हती. अशा सगळ्या भयावह वातावरणात माझ्या 81 वर्षाच्या आते सासूबाईंना (कुंदा ) फिट आली आणि त्या बेडवरून खाली पडल्या. बघता बघता त्यांचा उजवा हात इतका सुजला की ताबडतोब डॉक्टरांकडे नेणं गरजेचं होतं. त्यांना लगेचच दीनानाथ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यांना ॲडमिट करायच्या तयारीनेच मी, श्रेया आणि दीर जयदीप दीनानाथमध्ये पोचलो. त्या वेळेला हॉस्पिटल मधील परिस्थिती खूपच गंभीर होती. कुणालाही आत जाण्यास परवानगी नव्हती. सगळीकडे मृत्यूचे तांडव चालू होते. ॲम्बुलन्सचे आवाज दर पाच मिनिटांनी कानावर पडत होते. दुर्दैव असं की त्यावेळी कुंदा आत्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घ्यायला बेड शिल्लक नव्हते. आम्हाला काय करावे ते सुचत नव्हते. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व चाचण्या करून घ्यायला सांगितल्या .या सर्व चाचण्या ज्या इमारतीमध्ये करायच्या होत्या ती इमारत फक्त करोना पेशंट करता राखीव होती. रात्रीची वेळ असल्यामुळे फक्त इमर्जन्सी असलेल्या चाचण्या या इमारतीत होत होत्या.तिथे जावे लागणार समजल्यावर ,मी आणि श्रेयानी फक्त एकमेकींकडे भीतीच्या नजरेने बघितले. इतके दिवस घरातून बाहेर न पडलेल्या आम्ही दोघी, थेट करोनाच्या जबड्यात चाललो होतो.आता आमच्यासमोर दोनच पर्याय शिल्लक होते, एक तर त्यांना घेऊन परत घरी जायचे, नाहीतर समोर उभ्या असलेल्या करोनाशी दोन हात करायचे. आम्ही दुसरा पर्याय निवडला. त्यांच्या वेदना सहनशीलतेच्या पलीकडे होत्या. माझं डोकं बधिर झालं होतं . कुंदा आत्यांच्या जीवाला आराम मिळाला पाहिजे , एवढेच फक्त प्राधान्य होते. आम्ही चाचण्या करून घेण्याकरता ज्या इमारतीमध्ये गेलो तेथील दृश्य बघून स्तब्ध झालो. साधारण वीस ते पंचवीस करोना पेशंटना ऑक्सिजन लावून ठेवले होते. हॉस्पिटलमध्ये उभे राहायला सुद्धा जागा नव्हती. मी जे काही दृश्य पाहिले त्यावरून खात्री पटली आपण स्वतःला मृत्यूच्या दारात आणून ठेवले आहे. हॉस्पिटलमध्ये अव्याहतपणे करोनाचे पेशंट येत होते. डॉक्टर, नर्सेस करोना पेशंटना वाचवण्याकरता जीवाचे रान करत होते . आताही जसाच्या तसा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आहे. खूप भयावह परिस्थिती होती ती. कमीत कमी 30 तरी सिरीयस पेशंट त्या हॉलमध्ये असावेत. रात्रीचे अकरा वाजले होते. त्या दोन तासात, मी जो काही जीवन मरणाचा खेळ पाहिला, तो शहारे आणणारा होता. माझ्यापासून जेमतेम दहा फुटाच्या अंतरावर एक करोना पेशंटचा मृत्यू झाला होता आणि त्याला गुंडाळत होते. हे दृश्य बघून जिवाचा अक्षरशः थरकाप उडाला. अजून एका कोपऱ्यातल्या बेडवर, करोना पेशंट जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत होता. त्याच्या घशातून जोरात शेवटची घरघर ऐकू येत होती. पुढच्या दहा मिनिटात त्याच्याभोवती पण करोनानी विळखा घातला. त्याचा मृत्यू झाला होता. माझ्या आयुष्यात अशा प्रसंगांना कधीच सामोरे गेले नव्हते. त्यावेळी डॉक्टर ,नर्सेस यांना मनातून अगदी साष्टांग नमस्कार घातला. ते तर सगळे दिवस रात्र मृत्यूशी दोन हात करत होते. आता तर खात्री झाली होती की आम्हा तिघींना करोना होणार आणि तो पण गंभीर स्वरूपाचा. मी तर त्यावेळी माझा मृत्यूच पाहिला. असा विचार मनात चालू असतानाच अजून एक साधारण माझ्याच वयाच्या करोना ग्रस्त स्त्रीला स्ट्रेचरवरूनआणले गेले. तिचा पल्सरेट खूपच कमी झाला होता. मला तो दिसत होता. स्त्रीला ज्या बेडवर ठेवले होते ,ती आमच्यापासून फक्त पाचच फुटावर होती. थोड्या वेळातच त्या स्त्रीला गडबडीने इमर्जन्सीत नेले. नंतर त्या स्त्रीचे काय झाले मला समजले नाही . करोनाच्या विळख्यातून ती स्त्री सुखरूप बाहेर पडावी अशी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना केली. तेवढेच माझ्या हातात होते. वातावरण खूपच गंभीर होते. शेवटी एक तासानंतर कुंदा आत्यांना एका बेडवर झोपवले. फक्त दोन मिनिटे आधी त्या बेडवरून एका करोना रुग्णाला रूममध्ये नेले होते. थोडक्यात करोना पेशंटच्या बेडवर कुंदा आत्या झोपल्या होत्या.आता तर खात्रीच पटली होती की आम्हाला करोना होणारच. थोड्यावेळाने त्यांच्या तपासण्या झाल्या. त्यांचे खांद्याचे हाड मोडले होते. त्यावेळेला ऑपरेशन करणे शक्य नव्हते. त्यांच्या हातावर तात्पुरते उपचार करून आम्हाला घरी जायला सांगितले. या सगळ्यात तीन तास गेले. घरी परतताना कोणाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. एक भयाण शांतता जाणवत होती. घरी आल्यावर आत्यांना त्यांच्या खोलीत क्वारंटाईन करून ,आम्ही दोघी पण क्वारंटाईन झालो. त्यावेळेला मन बधीर झाले होते. मध्यरात्र झाली होती . रात्रभर झोप लागली नाही. सारखे रडू येत होते. कोरोना होणार याची खात्री होतीच. पण झाला तर त्यातून सुखरूप बाहेर पडावे अशी फक्त इच्छा होती. एकीकडे वाटत होते, आपण हे काय करून बसलो? स्वतः होऊन मृत्यूला जवळ बोलावले होते. पण आता वेळ गेली होती. समोर आलेल्या संकटाशी सामना करावाच लागणार होता. मनात आले, माझा तर अजून खूप संसार बाकी आहे, मुली शिकत आहेत. आपल्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर काय करणार? अशा असंख्य विचारांनी परमेश्वराची प्रार्थना करत, पाच रात्री आम्ही दोघींनी न झोपता काढल्या. सहाव्या दिवशी तिघींनी कोरोना टेस्ट केल्या आणि आश्चर्याचा धक्का ….तिघींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. अजून एकदा खात्री करून घेण्यासाठी दुसऱ्या लॅबमधून परत टेस्ट करून घेतल्या. त्या पण निगेटिव्ह आल्या. मला तर रडूच कोसळले होते . काय हा परमेश्वराचा चमत्कार होता. परत एकदा मृत्यू अगदी जवळून गेला होता. परमेश्वरानी मला सहाव्यांदा जीवदान दिले होते. त्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुधीर नेमका कामानिमित्त सौदी अरेबियामध्ये गेला होता. कोरोनामुळे त्या देशातील सर्व विमानसेवा बंद होत्या. मी आणि श्रेया कुठल्या स्थितीतून जात आहोत, याची सुधीरला जाणीव पण होऊ दिली नव्हती. एक तर त्याला येणे शक्य नव्हते. लांब राहत असल्यामुळे आमच्या सगळ्यांची त्याला कायमच काळजी वाटायची.पण करोनापुढे कोणाचे काही चालत नव्हते. आमच्या तिघींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यावर घडलेला सर्व प्रसंग त्याला सांगितला . सर्व ऐकून त्याला तर जबरदस्त धक्का बसला .परंतु आम्ही सगळे सुखरूप कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडल्यामुळे तो खुश होता.
आता जीवन परत सुरळीत आणि सुखात चालू आहे .एवढ्या सगळ्या जीवघेण्या प्रसंगांना पन्नास वर्षात अनेकदा सामोरे गेले आहे. खरंतर आता माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. या सगळ्या अनुभवातून एक मात्र नक्की आहे परमेश्वराला माझ्याकडून काहीतरी चांगले कार्य करून घ्यायचे आहे.
‘माझ्या गोष्टीतील देव’ या आत्मकथनाच्या शेवटी, मनात दाटून आलेल्या काही भावना आणि संकल्प तुमच्याशी शेअर करावेसे वाटतात. ‘माझा’ हा लेख तुम्ही ‘आपला’ केलात म्हणून मला मन मोकळं करावसं वाटतंय. आयुष्यातील या सगळ्या जीवघेण्या प्रसंगानंतर माझ्यात खूपच सकारकात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि त्या ऊर्जेचा माझ्या माती करता, समाजाकरता काहीतरी उपयोग व्हावा, हेच माझ्या जीवनाचं ध्येय उरलं असावं असं मला वाटतं. एक,दोन वर्षात घडलेल्या काही अशक्य घटनांनी त्याला अजूनच बळ मिळालं. त्यातील एक घटना म्हणजे मला अचानकपणे स्फुरलेली कला… कधीच न जमलेली चित्रकला, करोनाच्या काळात माझा आधार कशी बनली, हा आजही मला एक चमत्कार वाटतो. करोनाच्या काळात घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आणि स्वस्थ बसणं माझ्या स्वभावात नाही .त्यामुळे काय करावं अशा विचारात असताना अचानक मला पेंटिंग करावं असं वाटू लागलं. खरंतर लहानपणापासूनच माझी चित्रकला अतिशय सुमार दर्जाची होती. पेंटिंग तर खूप लांबची गोष्ट झाली. त्यावेळी घरात फक्त कागद आणि पेन्सिल एवढेच उपलब्ध होते. ते घेऊन बहुदा माझ्या कलेच्या प्रवासाची सुरुवात झाली . आमची वर्ग मैत्रीण संगीता, ही एक उत्तम चित्रकार आहे. तिची आम्हाला पेंटिंग शिकायला खूप मदत झाली. मी आणि माझी मैत्रीण मनीषा एकमेकींना प्रोत्साहन देत चित्रे काढत होतो. विशेष म्हणजे माझा abstract आर्ट कडे ओढा जास्त होता. खरंतर abstract आर्ट म्हणजे काय, हे देखील मला माहित नव्हतं. तरीपण त्यात मी वेगवेगळे प्रयोग करत होते. नंतर मला त्याची इतकी गोडी लागली की डोक्यात सतत पेंटिंगचे विचार येऊ लागले.आणि मी पेंटिंग करत राहिले.
Abstract पेंटिंग करत असल्यामुळे माझ्या कल्पना शक्तीला भरपूर वाव मिळू लागला आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढला. मनात विचार येऊ लागला की पेंटिंग सारखी माझ्याकरता अशक्यप्राय असलेली गोष्ट करू शकते, तर मनात असलेल्या अजून बऱ्याच काही गोष्टी मला करता येतील आणि ज्याचा मला समाजाकरता पण उपयोग करता येईल.अजून पण एक आव्हानात्मक गोष्ट मागील दोन वर्षात घडली, ती म्हणजे पिलीव मध्ये बांधलेल आमचं घर… 12,13 वर्षांपासून बघितलेलं एक स्वप्न….बरेच वेळा ते अंधुक होत होतं, कधी हातातून निसटून जाईल असं वाटत होतं. परंतु आमची सगळ्यांची इच्छाशक्ती आणि परमेश्वराची कृपा,त्यामुळे हे स्वप्न पूर्णत्वाला आले. पिलीव सारख्या छोट्या खेड्यात, जिथे सगळं बांधकाम साहित्य मिळत नाही, ते 35 किलोमीटर दूर असलेल्या अकलूज या गावाहून आणायला लागत होतं. कुशल कामगार पण अकलूज वरून आणायला लागत होते. ही सगळी आव्हाने करोनाच्या उत्तरार्धात पेलवून, आमच्या सगळ्यांच्या स्वप्नातलं वेगळं असं टुमदार घर साकार झालं;आणि बहुदा त्यामुळेच आमचा पिलीवच्या मातीत परत जायचा मार्ग सुकर झाला. सुधीरने शेती करायचा घेतलेला निर्णय — हा फक्त एक बदल नव्हता; तो आमच्या दोघांच्या आयुष्याला नवं वळण देणारा क्षण होता. त्याच्या वीस वर्षांच्या परदेशतील वास्तव्यानंतर, शहराच्या गोंगाटापासून दूर, आपल्या मातीची ओळख जपणाऱ्या या गावात परत येणं, हे एका स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं पाऊल होतं. कधी मनात विचार येतो,पिलीवाच्या ज्या मातीतून मी आले ,त्याच मातीत माझं काहीतरी कार्य बाकी असेल का? म्हणून परमेश्वराने मला अनेक वेळेला जीवदान दिलं. कारण या मातीशी असलेलं हे नातं माझ्या रक्तात आहे. आणि म्हणूनच सेंद्रिय शेतीचा मार्ग आम्ही निवडलाय — रासायनिक विषांपासून मुक्त, आरोग्यदायी आणि टिकाऊ शेती. हे एक पाऊल आहे, निसर्गाच्या आणि सर्वांच्या भविष्याच्या भल्यासाठी.आणि यामुळेच कदाचित आमच्या बागेतील नैसर्गिक केशर आंब्याची विक्री आणि 100% शुद्ध,आरोग्यदायी घाण्याच्या (Cold-Pressed)तेल व्यवसायाला सुरुवात झाली. फक्त व्यवसाय करणे आहे हा आमचा हेतू नसून,जास्तीत जास्त लोकांपर्यंत उत्तम दर्जाची उत्पादने पोचवायचा आमचा मानस आहे.आम्ही जे स्वतः खातो, वापरतो — तेच विश्वासाने इतरांपर्यंत पोचवावं, हीच आमची खरी नीती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक बाटली, प्रत्येक फळ हे ‘आपल्या घरासाठी’ घेत असल्यासारखं आम्ही तयार करतो. या व्यवसायातून आम्ही स्थानिक लोकांना रोजगार पण उपलब्ध करून दिला आहे .मनात योजना तर खूप आहेत.काही तरी वेगळं, चांगलं करायच्या — फक्त स्वतःसाठी नाही, तर माझ्या गावासाठी, माझ्या मातीतल्या लोकांसाठी.कारण माणूस म्हणून ज्या भूमीवर आणि समाजात जन्माला आलो आहोत,त्या भूमीचं,समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो,अशी माझी भावना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या योजनांना सुधीरची भक्कम साथ आहे. त्याची शेतीतील मेहनत,आणि निसर्गाविषयीचा आदर — हे सगळं मला रोज नवं बळ देतं.
या प्रवासात माझी खरी प्रेरणा आहेत — माझे आई आणि वडील. त्यांची शिकवण आणि उत्तम संस्कार ही माझ्या आयुष्याची एक देणगी आहे. त्यांची सेवा करणं, त्यांच्या कष्टांचं चीज करणं, ही माझी खरी भक्ती आणि जबाबदारी आहे असं मला वाटतं.
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर झालेल्या अपघातानंतर माझ्या स्थिरावलेल्या मनाला जाणवलं की आपलं आयुष्य नुसतं जगायचं नसतं, ते व्यक्त व्हावं लागतं. आता मी चित्र काढते, ती मला ध्यानधारणेसारखीच वाटतात .कला माझा श्वास बनली आहे ,रंग माझी प्रार्थना झाले आहेत आणि प्रत्येक ब्रशचा स्पर्श मला सांगू लागलाय: “तू इथे आहेस, त्याला कारण आहे.”
कदाचित, मला वाचवलं गेलं याचं कारण असं असावं:
माझ्या वेदनेला सौंदर्यात रूपांतरित करण्यासाठी, माझ्या जगण्याला कथेत बदलण्यासाठी, आणि माझ्या कथेला अंधारात हरवलेल्या कोणासाठी तरी प्रकाश देण्यासाठी.
‘माझ्या गोष्टीतील देव’ ही सांगता असूनही, ती एका नव्या प्रवासाची मला सुरूवातच वाटते.🙏
सौ अनुराधा श्रीखंडे.
सहकार नगर, पुणे.
🙏 *आभार* 🙏
‘माझ्या गोष्टीतील देव’ या आत्मकथनपर लेखनप्रवासाला दिलेल्या प्रेम, प्रतिसाद आणि विश्वासाबद्दल माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि वाचकांचे मन:पूर्वक आभार.🙏
तुमच्या प्रेमळ प्रतिसादांनी, प्रोत्साहनाने आणि वेळोवेळी दिलेल्या अभिप्रायामुळे माझं मन अक्षरशः भरून आलं आहे.
मला विशेष आभार मानायचे आहेत ते माझ्या या प्रवासातील साक्षीदार, माझे गुरु अमृत पुरंदरे सर आणि माझी जिवलग मैत्रीण मनीषा दाते – कोंढाळकर या दोघांचे.
अमृत सरांनी ’You can do it’ हा विश्वास दाखविला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खरंतर हे मी लिखाण करू शकले. मनीषाने तर लिखाणाच्या प्रत्येक टप्प्यावर मला साथ दिली. तिची प्रेरणा, प्रोत्साहन, कायम असणारा पाठिंबा आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, हे मला लिखाण करताना खूपच उपयोगी पडले. आणि त्यामुळेच ही कथा आकाराला आली.🙏












