काजवा : लहानपणीची एक सुंदर आठवण! मला आठवते, दादा ने एकदा काडीपेटीमध्ये किडा पकडून आणला होता आणि मला सांगत होता एक मज्जा आणली आहे, रात्र झाली की मी एक जादू दाखवणार आहे सर्वांना पण तोपर्यंत कोणाला काही सांगू नको. आणि त्याने ती काडीपेटी रात्री अंधाऱ्या खोलीत अलगद उघडली आणि छोटीशी टॉर्च हवेमध्ये सैर वैर होऊन फिरू लागली. किती गमतीशीर असते ना लहानपण. आई-बाबांनी लगेच आम्हाला काजवा आणि त्याच्या प्रकाशाबद्दल माहिती दिली.. मी त्या दिवशी डोळे उघडे ठेवूनच झोपली असेन कदाचित, काहीतरी अद्भुत जादू पाहिल्याची भावना मनात घेऊन. आणि तेव्हा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की भविष्यात एखाद्या दिवशी “काजवा महोत्सव” पाहायला मिळेल.
महाराष्ट्र, हे नेहमीच आपल्या विविधतेने नटलेल्या उत्सवांसाठी प्रचलित आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीपासूनच पावसाळा कधी येणार याची हुरहूर लागलेली असते. यावर्षी कोणते गड किल्ले सर करायचे, किंवा कोणत्या धबधब्यांवर चिंब भिजायला जायचं , कोणत्या जंगलात फिरायला जायचं ,ह्याच प्लॅनिंग सुरू होते .पण दोस्त हो , ह्या अप्रतिम ट्रेकच्या शिवाय देखील पश्चिम घाट परिसर पावसापूर्वी एक खास घटनेने न्हाऊन निघतो. तुम्ही कधी, आकाश आणि झाडे तार्यांसारखी चमकताना पाहिले आहेत का ?? नाही, ही जादू नाही, हे आहे जुगनू (काजवा)…पावसाळा सुरू होण्यापूर्वी निसर्गाच्या वैभवाचे मनमोहक दर्शन घडवणाऱ्या या घटनेला ‘काजवा महोत्सव’ म्हणतात.
मी हे विहंगम दृश्य अनेकदा पाहिले आहे पण ह्या वर्षी माझ्या भाचीला ही जादू दाखवण्यास मी अतिशय उत्सुक होते. पुण्याजवळील राजमाची हे ठिकाण नेहमीच काजवा महोत्सवासाठी प्रसिद्ध असले तरी यंदा गर्दी आणि लांबलचक वॉक टाळण्यासाठी , लोणावळा जवळील ठोकरवाडी नावाच्या कमी ओळखीच्या जागेची आम्ही निवड केली. थोडा खाऊ , काही मोजके कपडे आणि अगदी जवळचे मित्रमंडळी घेऊन आम्ही प्रवासाला निघालो.
भरपूर नॉनस्टॉप गप्पा मारत मारत (गप्पा कसल्या , गॉसिप च ) दीड तासाचा प्रवास कधी संपला कळलेच नाही आणि आम्ही "पीएमजी कॅम्पिंग, ठोकरवाडी "ला पोहोचलो सुद्धा. छान फक्कड चहा आणि कुरकुरीत कांदा भजी देऊन आमचे स्वागत करण्यात आले . आहा, मस्त!! चहा पिऊन ताजेतवाने होऊन आमची गॅंग पोहोचली तलावा काठी . मगाशी गप्पा मारणारे सर्व मैत्रिणी आता मात्र शांत बसल्या होत्या , संथ पाण्याकडे पहात, ध्यानस्थ होऊन. लाटांचा दगडांवर आदळून होणारा खळखळ आवाज जणू काही सांगत होता त्यांना, थोडे रिलॅक्स व्हा.
काय सुंदर नजारा होता तो!
आम्ही बराच वेळ तिथेच रेंगाळलो, पण जसजसे ढग दाटू लागले, तसतसे पाण्यात सूर्यास्त पाहण्याची आमची आशा हळूहळू मावळली. निराश होऊन आम्ही आमच्या तंबूत परतलो आणि मुलांबरोबर खेळू लागलो. अचानक राखाडी ढगाना बाजूला सारून सूर्य बाहेर डोकावू लागला. मोठ्या उत्साहाने सर्वजण थक्क करणारा सूर्यास्त पाहण्यासाठी तलावाच्या कडेला धावले. एकेकाळी राखाडी असलेल्या आकाशाचे रूपांतर गुलाबी, जांभळ्या आणि केशरी रंगाच्या कॅनव्हासमध्ये झाले. स्काय ड्रामाचे हे सुंदर क्षण प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि आम्ही परत तंबूकडे आलो.
गावाकडे ( म्हणजेच शहराच्या थोड्या बाहेर) राहण्याचा सर्वात मोठा आनंद म्हणजे अगदी उबदारपणे प्रेमळत पणे आणि आत्मीयतेने दिले जाणारे स्वादिष्ट जेवण .आम्ही निवांत जेवण करत असतानाच , "हवेमध्ये काहीतरी चमकत आहे" अशी कुजबुज पसरू लागली आणि सर्वांनीच घाईघाईने जेवण संपवले .
पेट पूजा करून आम्ही डोंगराच्या दिशेने निघालो , अगदी दीड-दोन किलोमीटरचा वॉक असावा . एके ठिकाणी ,जिथे घनदाट झाडी होती, तिथे पोहोचल्यावर सर्वजण आश्चर्य उद्गार काढू लागले, "वाव तिकडे बघा" आणि आम्ही सगळे पाहतो तर काय लक्षावधी तारे आपल्या प्रकाशाच्या मोहक नृत्याने रात्र रंगवत होते .सर्वच झाडी आणि प्रत्येक काना कोपरा लयबद्ध पद्धतीने उजळून निघताना दिसत होता .अगदी दिवाळीच्या टीमटीमणाऱ्या लायटिंग सारखा.होय , हेच ते नाचणारे काजवे आणि हाच तो काजवा महोत्सव. संपूर्ण जंगल एखाद्या स्वप्नवत दृश्याप्रमाणे भासू लागले. काजव्यांना त्रास होऊ नये म्हणून टॉर्च लाईट जमिनीवर मारण्याचे संदेश दिले गेले, शक्यतो लाईट्स बंद करून आपल्या डोळ्यांनीच हा नजारा टिपून घ्या असे सांगण्यात आले. कोणतही छायाचित्र किंवा व्हिडिओ आपण अनुभवत असलेल्या गोष्टीचे मर्म टिपू शकणार नाही, मला शंका आहे डीएस्एल्आर कॅमेरा देखील ह्याला न्याय देऊ शकणार नाही. त्या क्षणी डोळ्यांचे पारणे फिटणारे दृश्य पाहून मी धन्य झाले. निसर्गाची किमया!
काजव्यांची झगमगाट डोळ्यात साठवून आम्ही तंबूकडे परतण्याचा प्रवास सुरू केला. जसं अंधार गडद होत गेला, तसे तसे काजव्यांचे चमकणे अधिक चैतन्यमय होत गेले आणि एक गंमत झाली, आम्ही टेन्ट मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत असतानाच चक्क टेंट वरून आम्हाला लाईट पास होताना दिसू लागले. काही काजवे कॅम्प साइट पर्यंत पोहोचले होते . अगदी झोप लागेपर्यंत आमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते. अशी तेजस्वी स्वप्ने घेऊन,नैसर्गिक कंदिलांच्या चादरी गुंडाळून आम्ही शांत झोपी गेलो.
काजवा का चमकतो आणि त्या मागचा सायन्स काय आहे ?
काजवा हा एक प्रकारचा पतंग असून त्याच्या पाठीवर एक विशिष्ठ प्रकारचा प्रकाश निर्माण करणारा अवयव असतो. रात्रीच्या अंधारात हे छोटेसे कीटक चमकतात आणि त्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण परिसर दैदिप्यमान होतो .काजवांचा हा प्रकाश नेमका कसा आणि का निर्माण होतो यामागे विज्ञान आहे, परंतु तो अनुभवणे म्हणजे जणू जादूच! काजव्यांच्या शरीरात एक विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होते( केमिकल लोचा 😉 ) म्हणून ते प्रकाशमान होतात. या प्रतिक्रियेला ‘बायोल्युमिनेसेन्स’ म्हणतात. त्यांच्यात ल्युसिफेरिन नावाचा पदार्थ आणि ल्युसिफेरस नावाचे सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य असते. त्यांच्या पोटात असलेल्या या रसायनांमध्ये ऑक्सिजन मिसळला की प्रकाश निर्माण होतो. जोडीदार शोधण्यासाठी आणि जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी नर काजवे हा प्रकाश उत्सर्जित करत असतात. या प्रकाशाचा उपयोग इतर भक्षकांना सिग्नल देण्यासाठीही करतात की ते खाण्यास चवदार नाहीत. प्रत्येक किड्याची प्रकाश चमकवण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि एकत्रितपणे लयबद्धतेने जेव्हा हे चमकू लागतात तेव्हा प्रकाश नृत्य सारखे नमुने तयार होतात. मादी काजवा अंडी जमिनीत जमा करतात आणि प्रौढ होण्यास जवळजवळ वर्षभराचा कालावधी लागतो म्हणजेच पुढच्या वर्षी ह्याच सुमारास चमकण्यासाठी ते तयार होतात.
* दुसऱ्या दिवशी*
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गरमागरम अद्रक चहा पिऊन ताजेतवाने झाल्यानंतर आम्ही पाण्याच्या दिशेने मॉर्निंग वॉक साठी निघालो .पश्चिम घाट रानमेवा साठी ओळखला जातो. वाटेत आम्हाला अगदी हाताला येतील असे कैरी आणि आंब्याने लगडलेली झाडे दिसली. काळी मैनाने भरलेले झाडे ही दिसले. आहा, मेजवानीच होती ती! अशी आंबट गोड फळे स्वतः तोडून खाण्यात काही और मजा असते, नाही? अशा पद्धतीने चकाट्या पेटत आम्ही पाण्याजवळ पोहोचलो. काही मुले पाणी विहार करण्यासाठी आपली साखर झोप मोडून ब्रह्म मुहूर्तावर ऑलरेडी तिकडे पोहोचली होती. आम्ही अगदी ओंजळ भरभरून सगळी फळे जमा केली, गुलाबाच्या शेती जवळ फोटोग्राफी केली ,आणि कॅम्प साईट च्या दिशेने निघालो जिथे गरमागरम मिसळ आमची वाट पाहत होती. पोहोचताक्षणीच सर्वांनी मिसळीवर ताव मारला आणि अजून एक चहाचा राऊंड झाला. भरपूर रानमेवा घेऊन आणि असंख्य आठवणी जमा करून आमचा पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला.
निसर्गरम्य वातावरणात काजव्यांचा प्रकाशमय मुक्त विहार पाहून नैसर्गिक सौंदर्याचा आणि आश्चर्याचा प्रश्न पडतोच , शिवाय पर्यावरणाबद्दल कौतुक वाढते आणि लोकांना निसर्गाशी सखोल पातळीवर कनेक्ट करण्यास प्रोत्साहन मिळते. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन अनुभव घ्याच, पण त्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचेही भान ठेवा.
हे जग आश्चर्याने भरलेले आहे! मी दिवाळी साजरी केली, (उन्हाळ्यात 😉) चमकत्या नियॉन पिवळ्या दिव्यांना पाहत, तुम्हाला देखील हे अनुभवायचे आहे का?
इतर काही ठिकाणे, जिथे हा वार्षिक काजवा महोत्सव आयोजित केला जातो (सामान्यत: मे च्या तिसऱ्या आठवड्यापासून जूनच्या दुसर्या आठवड्यापर्यंत). ट्रेकिंग किंवा हायकिंगच्या काठिण्य पातळीच्या आधारे उतरत्या क्रमाने या ठिकाणांची यादी खाली दिली आहे:
१. कळसूबाई
2. भंडारदरा
3. राजमाची
4. इगतपुरी
5. पुरुषवाडी
6. ठोकरवाडी, वगैरे
तर मंडळी, प्रवास करत रहा आणि निसर्गाला जपत रहा!
पुणे