Masale Bhat Recipe in Marathi (मसाले भात रेसिपी)
मसाले भात रेसिपीसाठी साहित्य
- २ वाट्या तांदूळ
- शेंगदाणे अर्धी वाटी
- काळा मसाला १ चमचा
- दालचिनीचे ४-५ तुकडे
- ९-१० काळे मिरे
- अर्ध्या इंचाचा आल्याचा तुकडा
- ४ मिरच्यांचे तुकडे
- मीठ, कढीलिंब, कोथिंबीर
- ओले किंवा कोरडे खोबरे
- तेल
मसाले भात रेसिपी कृती
प्रकार 1
प्रथम अर्धा तास आधी तांदूळ धुऊन ठेवावेत. एकीकडे तांदळाच्या तिप्पट पाणी, आधण आणण्यास ठेवावे.नंतर पातेले तापत ठेवून. त्यात दोन डाव तेल घालावे.तेल तापल्यावर, त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी.त्यामध्येच कढीलिंब, दालचिनी, मिरे, मिरचीचे तुकडे, दोन वेलदोड्याचे दाणे परतून घ्यावेत. लगेच दाणे व तांदूळही टाकावेत.तांदूळ परतल्यावर आधणाचे पाणी ओतावे. त्यात बारीक केलेले आले, मसाला, मीठ घालून हलवावे.प्रथम गॅस मोठा ठेवावा. थोडेसे पाणी आटल्यावर मंद गॅस करून झाकण ठेवावे.भात खाली लागत असेल तर गॅसवर तवा ठेवावा.तवा चांगला गरम झाल्यावर भाताचे पातेले ठेवावे. म्हणजे खाली न लागता भात गरम राहतो.आधणाचे पाणी ओतल्यापासून साधारण पंधरा ते वीस मिनिटांत भात छान होतो.मसाले भात मोकळा करावा. सरावाने पाण्याचे प्रमाण जमते. नुसता मसाले भात रात्रीच्या जेवणासाठी करावयाचा असल्यास तांदळाचे प्रमाण व इतरही प्रमाण थोडे वाढवावे.
प्रकार 2
नुसते दाणे घालून मसाले भात करण्याऐवजी, फ्लॉवर, बटाटा, कांदा, कोबी, वांगी, मटार, तोंडली, दोडके, यांपैकी कोणतीही भाजी घालून भात करावा. त्यासाठी भाजीचे लांबट तुकडे एक वाटी घ्यावेत. फ्लॉवर घालायचा असल्यास त्याची मोठी फुले तोडून घालावीत.शक्य असेल तर त्या भातात काजूचे तुकडे, बेदाणा घालावा. वरून ओले किवा कोरडे खोबरे व कोथिंबीर घालावी.तसेच मिरचीचे तुकडे घालण्याऐवजी मिरची, आले, दालचिनी, मिरे, जिरे, कोरडे खोबरे वाटून (मिक्सरमध्ये बारीक करावे) घालावे. मग काळा मसाला नाही घातला तरी चालतो.