उत्तम आरोग्य मिळवा आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी या सोप्या टीप्स फॉलो करा.

1) कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.

2)दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.

3)जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या.

4)रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या.

5)रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही.

6)व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या.

7)दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या.

8)नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे.

9)तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा.

10)पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

11)मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा.

12)शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या. आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा. जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा अँझायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका.

13)आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्राणायाम व ध्यानधारणा करणे, रोजनिशी लिहिणे, छंद जोपासणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Related Stories