शीर खुर्मा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

शीर खुर्मा ईदीच्या दिवशी सकाळच्या नमाजानंतर न्याहारीत बनवण्याची प्रथा आहे. सारे कुटुंबीय एकत्र बसून आनंदाने याची चव चाखतात आणि हो दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे तोंड गोड करायला सुद्धा शीर खुर्माच्या वाट्या अग्रभागी सरसावतात.तर या रमदानच्या पवित्र महिन्यात आपल्या मुस्लिम मित्रमैत्रिणींना शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि घरी बनवलेल्या शीर खुर्माचा आनंद जरूर घ्या !
ईद मुबारक
Sheer Khurma Recipe

बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिटे
कितीजणांसाठी बनेल : ५-६
साहित्य:

    • १ लिटर घट्ट सायीचे दूध ( म्हशीचे दूध )
    • १/४ कप = ६० ग्रॅम्स साखर
    • ३० ग्रॅम्स बारीक शेवया
    • तूप
    • १० बदाम , रात्रभर पाण्यात भिजवून
    • ६ खारका , रात्रभर पाण्यात भिजवून
    • १०-१२ काजू , रात्रभर पाण्यात भिजवून
    • १ टेबलस्पून पिस्ते ( न खारवलेले ) , रात्रभर पाण्यात भिजवून
    • १ टेबलस्पून चारोळ्या
    • १ टेबलस्पून मनुका
    • २ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे पातळ काप
    • १ टीस्पून वेलदोड्याची जाडसर कुटून पावडर
    • १ टेबलस्पून केवडा जल
    • थोडे केशराचे धागे

कृती:
1)एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात दूध तापवण्यास ठेवावे. दुधाला उकळी फुटली की ते ढवळून आच मंद करावी . मधे मधे सतत ढवळत राहावे जेणेकरून दूध उतू जाणार नाही .

2) आपण दुसऱ्या गॅसवर सुका मेवा तुपावर खमंग परतून घेऊ. १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात बदामाचे, काजूचे, पिस्त्याचे आणि खारकांचे काप परतून घेऊ. बदाम आणि पिस्त्यांच्या साली काढून मगच त्यांचे काप करायचे आहेत . त्यातच चारोळी आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालून मंद आचेवर परतून घेऊ. गरज वाटल्यास अजून १-२ टीस्पून तूप घालावे. ३ मिनिटे मंद आचेवर परतल्यानंतर एका वाटीत काढून घ्यावे. त्याच पॅनमध्ये जून १ टेस्पून तूप घालून शेवटी मनुका परतून घ्याव्यात . मनुका छान फुलेपर्यंतच परताव्यात आणि वाटीत काढून घ्याव्यात.

3)सुका मेवा परतल्यानंतर १ टेबलस्पून तूप घालून मंद आचेवर शेवया परतून घ्य्वयात . शेवया परतताना अजिबात घाई करू नये नाहीतर त्या करपतात आणि फेकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही ! मंद आचेवर एकसारखा खरपूस तांबूस रंग येईपर्यंत शेवया परतून घ्याव्यात .

4)शेवया आणि सुका मेवा तयार आहे . आता दुधाकडे जरा लक्ष देऊ. दूध बारीक आचेवर जवळजवळ १२ मिनिटे तापल्यानंतर घट्ट व्हायला लागते . जवळ जवळ पाऊण पटीपर्यंत कमी होऊन दूध घट्ट झाले पाहिजे . आता साखर घालून २ मिनिटे मंद आचेवर साखर विरघळू द्यावी.

5)आता सुका मेवा , मनुका आणि शेवया घालून नीट दुधात एकत्र करून घ्यावे. आच मंदच ठेवावी. शीर खुर्मा आपण अजून ५ मिनिटे आचेवर शिजवून घेतला आहे. हा फार घट्ट किंवा फार पातळ नसावा. आता वेलची पावडर आणि केशराचे धागे घालून १ मिनिट मंद आचेवर शिजू द्यावा.

6)नंतर केवडा जल घालून , एकत्र ढवळून , गॅस बंद करावा . शीर खुर्मा वाढेपर्यंत झाकून ठेवावा .

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu