चिकन जालफ्रेझी

चिकन जालफ्रेझी

साहित्य : मॅरिनेशन साठी
१ किलो चिकन,
३ टेबल स्पून टोमॅटो केचप,
लिंबाचा रस (साधारण २ लिंबांचा रस)(इकडे मोठी लिंबं रसदार मिळतात. त्यामुळे मी एकच घेतलं.)
२ टी स्पून लाल तिखट
मीठ
साहित्य : ग्रेव्हीसाठी
प्रत्येकी २ टी स्पून आलं, लसूण पेस्ट,
२ टेबल स्पून टोमॅटो प्युरी,
३ कांदे अगदी बारीक चिरुन,
२ अंडी फेटून,
१ टी स्पून हळद
२ टेबल स्पून हिरव्या मिर्च्या अगदी बारीक चिरुन,
१ टी स्पून बादशहा (किंवा कुठलाही) चिकन मसाला
तेल,
मीठ.

कृती :
चिकन स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळवून टाका. मॅरीनेशन चं सगळं साहित्य एकत्र करुन चिकन ला चोळून ठेवा. साधारण २ तास झाकून ठेवा. एका कढईत ३ टेबल स्पून तेल तापत ठेवा आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या. कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो प्युरी घाला. तेल सुटायला लागलं की त्यात आलं, लसूण पेस्ट घाला. थोडं परतून नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या घाला. मग त्यात हळद आणि चिकन मसाला घाला. थोडं परतवून त्यात चिकनचे मॅरीनेट केलेले तुकडे घाला. सगळं मिश्रण मस्तपैकी परतवून झाकण ठेवा.साधारण १५ मिनिटात चिकन शिजत आल्यानंतर त्यात १ कप पाणी घाला.
पुन्हा झाकण ठेवा आणि चिकन पूर्ण शिजवा. झाकण उघडल्यावर मस्त रसरशीत चिकन तयार पण थांबा पिक्चर अभी बाकी है फेटलेली २ अंडी त्यात घाला. मस्तपैकी ढवळा. गरम असल्यामुळे अंडी लगेच शिजतील. छान ढवळल्यामुळे अंडी एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील. रश्श्याचं टेक्स्चर पूर्ण बदलेल पण घाबरु नका. झाकण ठेवा आणखी एक वाफ काढा. आता चिकन जालफ्रेझी एकदम तय्यार एका छानशा भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. तोंडाला पाणी नक्कीच सुटणार  …….

Related Stories