मेहंदी लावणं प्रत्येक मुलीला खूप आवडतं, मग ती मॉडर्न असो किंवा मग साधीसुधी राहणारी एखादी तरूणी मेहंदीचा सुगंध मनाला वेड लावून जातो, शांत करतो तर तिचा लालभडक अन् कधी काळा कुळकुळीत रंग डोळ्यांना विलक्षण आनंद देतो. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त मेहंदी शकुनाचे प्रतीक आहे.मेहंदीला भारतीय समाजात खूप मोठे स्थान आहे. स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामधील मेहंदी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणताही सण, समारंभ असो त्यामध्ये स्त्रिया मेहंदी लावणे पंसत करतातच, पण खास करून लग्नात मेहंदी अनिवार्य असते. भारतभर संपूर्ण हिंदू धर्मामध्ये लग्न कार्यांत मेहंदीला विशेष महत्त्व असते. मेहंदी लावण्याची परंपरा तशी फार पूर्वीची आहे. खूप आधीपासून स्त्रिया मेहंदी लावत आहेत. पण काळ बदलला तशी पद्धत आणि डिजाईन सुद्धा बदलली. पण एक गोष्ट आजही स्त्रियांना हवीहवीशी वाटते ती म्हणजे डार्क मेहंदी.आपली मेहंदी अगदी उठून आणि खुलून दिसावी ही स्त्रियांची इच्छा असते. जर तुम्ही देखील असे उपाय शोधत असाल ज्यातून मेहंदी अधिक डार्क होऊ शकते तर आज तुम्हाला या लेखातून त्याबद्दल खूप माहिती मिळेल. चला तर जाणून घेऊ कोणते आहेत हे उपाय
1)सर्वात आधी करा ही गोष्ट
मेहंदी लावण्याआधी सर्वात प्रथम आपल्या हाताना वॅक्स करा. असे केल्याने केस दूर होतात आणि सोबत त्वचेवरील मृत पेशी सुद्धा निघून जातात. यामुळे मेहंदी हातांवर अधिक जास्त चांगल्या पद्धतीने खुलते. जर तुम्हाला वॅक्स करून 1-2 दिवस झाले आहेत तर मेहंदी लावण्याआधी प्रथम स्कीनला एक्सफोलिएट करा.जेणेकरून त्वचेवर जमा मृत पेशी साफ होऊन जातील. स्कीन पोर्सची क्लिनिंग होईल आणि आपली तुमची त्वचा मेहंदीला चांगल्या प्रकारे शोषून घेईल.
2)साखरेचे पाणी
मेहंदी सुकल्यानंतर सुकलेल्या मेहंदीवर साखरेचे पाणी जरूर लावा. एका वाटीत तुम्हाला साखर घ्या. साखर विरघळल्यानंतर तयार पाणी कापसाच्या मदतीने मेहंदीच्या हातावर लावा. यामुळे तुमची मेहंदी हाताला अधिक काळ चिकटून राहिल आणि रंगण्यास मदत होईल. म्हणूनच आपण पार्लर किंवा बाहेरुन मेहंदी लावून आल्यानंतर साखरेचे पाणी लावण्याचा सल्ला हमखास दिला जातो
3)मेहंदीवर लावा पेन किलर बाम किंवा द्या लवंगाची धुरी
मेहंदी कोरडी झाल्यानंतर मेहंदी काढून टाका पण पाण्याने हात धुण्याआधी थोडा वेळ मेहंदीवर पेन किलर बाम लावा. सर्दी झाल्यावर आपण ज्या बामचा वापर करतो तोच मेहंदीवरही वापरायचा आहे. आपल्या मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी हा एक साधासोपा पण रामबाण असा घरगुती उपाय आहे. याशिवाय एका तव्यावर एक ते दोन चमचा लवंगा गरम करत ठेवा. जस जशा लवंगा गरम होऊ लागतील तसा त्यातून धूर येण्यास सुरूवात होईल. त्या लवंगाच्या धुरीवर आपले मेहंदीचे हात धरा, असं केल्याने हातावरील मेहंदीचा एकदम काळा कुळकुळीत रंग येईल.
4)नारळ तेल
मेहंदी रंगण्यासाठी हातावर नारळ तेल देखील लावले जाते. तेलाच्या घर्षणामुळे मेहंदीला रंग चढतो. ज्यावेळी तुम्ही हातावरची सुकलेली मेहंदी काढायला जाता. त्यावेळी तुम्हाला हातावर नारळाचे तेल घ्यायचे आहे आणि हातवर चोळायचे आहे. हातावर तेल असल्यामुळे हात थोडे गरम झाल्यासारखे वाटेल. या उष्णतेमुळेच तुमची मेहंदी अगदी सुरेख रंगेल.
5)पानात वापरला जाणारा काथ्या
पानात वापरला जाणारा काथा हा मेंहदीला रंग आणण्यासाठीही वापरला जातो. खायच्या पानामध्ये काथा नावाचा पदार्थ वापरला जातो. हा काथाच तुमचे तोंड लाल करतो हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. म्हणूनच काथ्याचा उपयोग मेहंदीमध्ये करतात. मेहंदी भिजवताना त्यामध्ये काथा टाकला जातो. त्यामुळे मेहंदी आपसुकच लालचुटूक होते.